खेड : गावातील संपूर्ण ग्रामस्थांचाच विरोध असल्यामुळे मुरडे गावात सुरू झालेला बिअरबार तातडीने बंद करा, अन्यथा मी कारवाई करेन, असा आदेश गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मुरडे गावच्या सरपंचांकरवी देऊनही बार मालकाने अद्याप बार बंद केला नाही. त्यामुळे गावात असंतोष उफाळला असून मंत्र्यांच्याही आदेशाला न जुमानणार्या बार मालकावर नक्की कोणाची कृपा आहे अशी चर्चा मुरडे गावात सुरु आहे.
खेड तालुक्यातील मुरडे गावात “सावंत ब्रदर्स“ नावाने माजी सरपंच प्रताप सावंत यांनीच बिअर बार सुरू केला आहे. हा बार सुरू करताना ग्रामपंचायतीचीही दिशाभूल करून पोलिसांचा खोटा अहवाल सादर केला आहे.
याबाबत मुरडे ग्रामस्थांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या जामगे येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले. यावेळी मंत्र्यांनी ग्रामस्थांच्या तक्रारीचा विचार करता हा बार ताबडतोब बंद करावा असे आदेश दिले, आणि हा निरोप संबंधित बार मालकाला कळवण्यास सरपंचांना सांगितले. गृहराज्यमंत्र्यांचा बार बंदीचा आदेशाचा निरोप घेऊन सरपंच दशरथ खामकर हे बार मालकाकडे गेले. मात्र बारमालक सावंत यांनी गृहराज्यमंत्र्यांचेच आदेश धुडकावत मला पोलिस अधीक्षकांचे आदेश दाखवा; तरच मी बार बंद करेन, असे उद्दामपणाचे उद्गार काढले. माजी सरपंचांच्या अशा वागण्यामुळे मुरडे गावात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे बारमालकाच्या पाठीवर नक्की कोणाचा वरदहस्त आहे ? असा प्रश्न विचारला जात आहे.
मुरडे गाव हे भारतरत्न पां. वा. काणे यांचे जन्मगाव असून या गावाला 2007 साली तंटामुक्त गाव पुरस्कार मिळाला आहे. पूर्वीपासूनच मुरडे गावातील वातावरण सलोख्याचे आणि शांतताप्रिय आहे. असे असताना या गावचे माजी सरपंच यांनीच गावात बिअरबार आणि परमिट रुम सुरू केले आहे. या बारची परवानगी मिळवण्यासाठी रत्नागिरी पोलीस अधीक्षकांनी शाळा, मंदिर, ग्रंथालय, सार्वजनिक ठिकाणांच्या अंतराबाबत तसेच ग्रामपंचायतीच्या परवानगी बाबत जो अहवाल दिला आहे तोच मुळी चुकीचा असल्याची बाब आम्ही निवेदन देऊन सरकारी यंत्रणांच्या निदर्शनास आणून दिली आहे. योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे. खेड तहसीलदार यांच्यामार्फत हे निवेदन देण्यात आले, गृहराज्य मंत्री योगेश कदम यांना देखील भेटून याबाबत माहिती दिली मात्र याबाबत ठोस कारवाई झालेली नाही अशी खंत भाजपचे रत्नागिरी जिल्हा चिटणीस शशांक सिनकर यांनी दिली आहे.