रत्नागिरी : नूतन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे स्वागत करताना पोलिस अधीक्षक नितीन बगाटे. 
रत्नागिरी

Ratnagiri News : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी नियोजनबद्ध आराखडा करणार

नूतन जिल्हधिकारी मनुज जिंदल यांची ग्वाही

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी ः जिल्ह्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे येथे पर्यटनाला चालना देणे शक्य आहे. पर्यटकांचा ओढा जिल्ह्यात कायम राहावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पर्यटनासह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध आराखडा येत्या काही काळात तयार केला जाईल. राज्य सरकारच्या माध्यमातून विकासनिधी उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, अशी ग्वाही नूतन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली. तर आपल्या घरांप्रमाणे जिल्ह्यातील शहरे, गावे स्वच्छ ठेवण्यावर नागरिकांनी भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

आयएएस मनुज जिंदल यांनी गुरुवारी रत्नागिरी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. रत्नागिरी जिल्हा निसर्गसौंदर्याने सजलेला आहे. येथे पर्यटनातून रोजगारनिर्मिती होऊ शकते, यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार आहोत. कचर्‍याचे योग्य नियोजन घरामधूनच झाले तर आपला परिसर स्वच्छ ठेवण्याला यश मिळेल असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात नवीन उद्योग येऊ घातले आहेत. त्यांना आवश्यक सोयीसुविधा देण्याचे नियोजन यापुढील काळात केले जाईल. सर्व शासकीय विभागांना एकत्र करून जिल्ह्याचा नियोजनबद्ध विकास आराखडा आपण तयार करणार आहोत. पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून सरकारकडून निधी उपलब्ध करून ती विकासकामे कशी मार्गी लागतील यावर आपण भर देणार आहोत. आंबा, मच्छी व्यवसाय वाढीबरोबरच कृषी क्षेत्रात काम करण्याची संधी आहे. कृषीमध्ये नवीन तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न राहील. जनतेच्या समस्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय 24 तास खुले आहे. जनतेने समस्या आपल्याकडे थेट मांडाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी जिंदल यांनी केले.

शासनाच्या विविध योजना राबवताना सर्व विभागांमध्ये समन्वय आवश्यक आहे. एक योजना अनेक विभागांच्या सहकार्याने राबवली जाते. यासाठी संबंधित विभागांमध्ये एकसूत्रता गरजेची आहे. यासाठी महिन्यातून एकदा सर्व विभागांचा एकत्रित आढावा घेतला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी जिंदल यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह विविध अधिकार्‍यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT