लांजा : तालुक्यातील देवधे-पुनस-हरचिरी मार्गावर पुनस तिठा येथे रस्त्याच्या बाजूला रविवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे एक नवजात पिल्लू आढळून आले असून, या पिल्लाला लांजा वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.
तालुक्यातील पूर्व व पश्चिम भागातील घनदाट जंगलमय भागांमध्ये बिबट्यांचा वावर असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळी देवधे-पुनस-हरचिरी मार्गावर काही नागरिकांना एक लहान प्राणी दिसून आला. नागरिक व काही वाहन चालकांनी त्यास जवळून पाहिले असता हे बिबट्याचे पिल्लू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बिबट्याचे नवजात पिल्लू आढळल्याची माहिती नागरिकांनी लांजा वनविभागाला दिल्यानंतर लांजा वनविभागाच्या कर्मचार्यांनी पुनस तिठा येथे जाऊन या पिल्लाला ताब्यात घेतले व त्याच्या प्रकृतीची पाहणी करून त्याला वनाधिवासात सोडले. रस्ता ओलांडत असताना किंवा पाऊस पडत असल्याने हे बिबट्या चे पिल्लू वाट चुकल्याने रस्त्याच्या बाजूला राहिल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला.