Ratnagiri Sumargad Landslide Stairs Broken
खेड: तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेला सुमारगड एक ऐतिहासिक व शिवप्रेमींचा लाडका किल्ला. सध्या मुसळधार पावसामुळे मोठ्या संकटात सापडला आहे. गेल्या पंधरा दिवसांतील जोरदार पावसामुळे या किल्ल्याच्या वरच्या भागात दरड कोसळून महत्त्वाच्या लोखंडी शिड्या तुटल्या आहेत. परिणामी, सुमारगडावर जाणारा एकमेव सुरक्षित मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे शिवभक्तांची गडावर जाण्यासाठी मोठी अडचणीचे ठरणार आहे.
सुमारगड हा केवळ एक दुर्ग नाही, तर तो इतिहास, पराक्रम आणि निसर्गसौंदर्य यांचा अनोखा संगम आहे. या गडाच्या चारही बाजूला दगडात कोरलेल्या पाण्याच्या टाक आहेत. अतिवृष्टीमुळे शिड्यांचे नुकसान होऊन गड चढणे अत्यंत धोकादायक बनले आहे. पूर्वी या अडचणीच्या वाटांवर वाडीमालदे गावातील शिवप्रेमी दात्यांनी लोखंडी शिड्या बसवल्या होत्या. ज्यामुळे हजारो पर्यटक आणि भक्तांना गड दर्शन सुलभ झाले होते. मात्र, आता त्या शिड्यांची पुनर्बांधणी गरजेची झाली आहे.
गडाच्या संवर्धनासाठी आणि मार्ग पुन्हा खुला करण्यासाठी शासकीय पातळीवर तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. स्थानिक शिवप्रेमी, पर्यटक, आणि गडप्रेमी संघटनांनी शासनाकडे तक्रार आणि विनंती केली. लवकरात लवकर शिड्या बसवून गडाचा मार्ग सुरळीत करावा, अशी मागणी केली जात आहे.
विशेष म्हणजे, सुमारगड हा दापोली विधानसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी या घटनेकडे त्वरित लक्ष देऊन आवश्यक निधी आणि मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे.
शिवकालीन गडांचे रक्षण आणि संवर्धन हे आपल्या सांस्कृतिक जबाबदारीचा भाग आहे. त्यामुळे सुमारगडाचा मार्ग लवकरात लवकर पूर्ववत करण्यात यावा, हीच आज लाखो गडप्रेमींची आणि शिवभक्तांची एकमुखी मागणी आहे, असे मत महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र आखाडे यांनी व्यक्त केले आहे.