चिपळूण : कोकणात सर्वाधिक पाऊस पडत असला तरी, ऑक्टोबरपासून पावसाचे प्रमाण कमी होते. कातळ जमीन आणि छोट्या जमिनीच्या तुकड्यांमुळे शेतकर्यांना संरक्षित पाण्याचा लाभ मिळावा, या उद्देशाने पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या पुढाकाराने कृषी विभागाने राबविलेली ‘कोकण जलकुंड’ योजना शेतकर्यांसाठी वरदान ठरत आहे. चिपळूण तालुक्यातील ढोक्रवली? येथील युवा शेतकरी राजेंद्र धाकटू गावकर यांनी ही योजना यशस्वी केली आहे.
दरम्यान, राजेंद्र गावकर हे वडील धाकटू गावकर यांच्या नावे असलेली शेती करतो. 2024-25 या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेत ‘कोकण जलकुंड’ मंजूर झाले. आता पावसाने ते तुडुंब भरले आहे. पूर्वी दीड-दोन किलोमीटरवरून पाण्याचे पिंप मोटरसायकलीवरुन वाहून आणावे लागे, पण आता शेतातच पाणी साठवल्याने काजू बागेला जीवन मिळाले आहे.
याबाबत तालुका कृषी अधिकारी म्हेत्रे म्हणाले, कोकणात पाऊस मुबलक पडतो; मात्र जानेवारीपासून पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. जलकुंडांमुळे आता 52 हजार लिटरपर्यंत संरक्षित पाणी उपलब्ध होत आहे. या साठ्याचा सिंचन आणि फवारणीसाठी मोठा उपयोग होत असून, शेतकर्यांना थेट फायदा मिळतो आहे. चिपळूण तालुक्यात आतापर्यंत 60 जलकुंड पूर्ण झाली असून, सुमारे 10 लाख रुपये खर्च झाला आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले म्हणाले, पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील शेतकर्यांना जलकुंडांच्या माध्यमातून फायदा मिळाला आहे. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेमधून 96 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. प्रत्येकी 5 मीटर लांब, 5 मीटर रुंद आणि 2 मीटर खोल अशा या जलकुंडांत 52 हजार लिटर पाणी साठते. 25 गुंठ्याला एक याप्रमाणे प्रती हेक्टर चार जलकुंड देता येतात, असे ते म्हणाले.