अनुज जोशी
खेड : सूर्याच्या प्रखर किरणांनी जणू आसमंत पेटून उठलाय… कोकणात उन्हाची तीव्रता अंगाची लाही लाही करतेय… पण या रणरणत्या तप्त वातावरणातही डोळ्यांना आणि मनालाही दिलासा देणारा एक निसर्गाचा चमत्कार डौलाने फुलतोय… खेड हे रत्नागिरी जिल्ह्यातील हे छोटंसं पण निसर्गसंपन्न गाव… आणि इथे, उन्हाच्या झळांनाही न घाबरता, आपल्या सृष्टीसौंदर्याचं देणं खुलं करत उभा आहे… बहाव्याचा एक देखणा वृक्ष… (Bahava)
तप्त उन्हातही ही पिवळी पानं आणि चुटूक फुलं, जणू सोन्याची सरसरती साखळीच… एकेक पाकळी हवेत नाचत खाली पडते, आणि त्या क्षणासाठीही निसर्ग कवितेसारखा भासत राहतो… उन्हातही बहावा सावली देतो… सौंदर्य देतो… आणि एक क्षणभर का होईना, पण विसरायला लावतो उन्हाचा तीव्रपणा… खेडमध्ये निसर्ग अजूनही आपलं सौंदर्य मोकळेपणाने उधळतोय… आणि अशा या झाडांच्या संगतीत उन्हाची झळसुद्धा क्षणभर शमते… (Bahava)
असे म्हटले जाते, बहावा फुलला की ६० दिवसांनी पाऊस पडतो. याला पावसाचा "नेचर इंडीकेटर" असेही म्हणतात. या वर्षी हा लवकर फुलला आहे. आता साधारण २८ मे नंतर पाऊस पडेल. या झाडाला शॉवर ऑफ फॉरेस्ट असेही म्हणतात आणि या वृक्षाचा अंदाज अचूक असतो.
रणरणत्या उन्हात बहाव्याचा हा देखणा वृक्ष पाहिल्यानंतर कवी इंदिरा संत यांच्या कवितेच्या ओळी ओठावर रेंगाळू लागतात.
नकळत येती ओठावरती
तुला पाहता शब्द वाहवा,
सोनवर्खिले झुंबर लेउन
दिमाखात हा उभा बहावा !!