राजापूर : राजापूर भूमी अभिलेख कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराचा फटका तालुक्यातील शेतकर्यांना बसत आहे. कर्मचारीच कार्यालयात उपलब्ध नसल्याने सर्वसामान्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. सहा सहा महिने या कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही सर्वसामान्य जनतेला जमिनीच्या नकाशासहीत अन्य कागदपत्रे मिळत नसल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
राजापूर तहसील कार्यालयाच्या बाजुलाच असणार्या या राजापूर तालुका भूमी अभिलेख कार्यालयात कायम फक्त एखाद दुसरा कर्मचारी हजर असतो. मात्र बाकीचे टेबल फक्त शोभेची असल्यासारखी आहेत. येथील उपस्थित कर्मचार्याला याबाबत विचारणा केली असता सर्वजण मोजणीला गेले आहेत, बाहेर गेले आहेत अशी उत्तरे कायम मिळत आहेत. या कार्यालयाच्या तालुका भूमी अभिलेख अधिकारी यांची केबिन तर कायमच रिकामी असल्याचा नागरिकांचा सुर आहे. याबाबतही चौकशी केली असता मॅडमनी माझ्याकडे चार्ज दिला आहे, असे थातूरमातूर उत्तरे इथे उपस्थित असणारा कर्मचारी देत सर्वसामान्यांची बोळवण करत असल्याच्या तक्रारीही सर्वसामान्य जनतेतून करण्यात येत आहेत. या कार्यालयात एकुण मंजूर पदे किती रिक्त किती याबाबातही काहीच माहिती मिळत नसल्याने तालुका भूमी अभिलेख कार्यालय शोभेचे बाहुले बनून राहिले आहे.
सर्वसामान्याना अपमानास्पद वागणूक मिळत असताना येथील उपस्थित कर्मचारी जमिन दलालांसाठी मात्र पायघड्या घालून तैनात असल्याचा सुर शेतकरीवर्गातून ऐकू येत आहे. बर्याचदा कर्मचारी हे चहा पिण्याच्या निमित्ताने सतत इतरत्र फिरताना दिसत असले तरी कार्यालयात उपस्थित असणारे कर्मचारी मात्र बिनधास्तपणे सगळे मोजणीला गेले असल्याचा निर्वाळा देत असतात . साहेब नाहीत अथवा आज मॅडम नाहीत. त्यामुळे हालचाल रजिस्टर उपलब्ध नाही. त्यांच्या केबीनमध्ये असते, अशी उत्तरे या कर्मचार्यांकडून मिळत असल्याने राजापूर तालुका भूमी अभिलेख कार्यालयाला कोणी वाली आहे की नाही? असा सवाल सर्वसामान्य जनतेतून विचारण्यात येत आहे. बर्याचदा हे कार्यालय कर्मचार्यांविना असल्याने नागरिकांना अनेकदा हेलपाटे मारावे लागत आहे. सहा सहा महिने कार्यालयाचे उंबरटे झिजवूनही जमिनीचे नकाशे व इतर कागदपत्रे मिळत नसल्याने सर्वसामान्य जनतेतून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.