रत्नागिरी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील तारांगणाच्या आवारातील भारतरत्न पुरस्काराने सन्मानित सहा महापुरुषांच्या शिल्पाचे तिरंगा इफेक्टमध्ये लोकार्पण केले. रिमोटचे बटण दाबल्यानंतर भगवा, सफेद, हिरव्या अशा तिरंगा रंगाच्या धूरांनी आकाशात झेप घेतली. त्याचवेळी पाऊस नावाच्या फटाक्यांची रोषणाईसुद्धा झाली.
रत्नागिरी नगर परिषद महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत कोकण विभागातील भारतरत्न सन्मानित महापुरुषांचे अर्धपुतळे तारांगण आवारात उभारले आहेत. उपमुख्यमंत्र्यांनीच या महर्षी धोंडो केशव कर्वे, पांडुरंग वामन काणे, विनोबा भावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लता मंगेशकर आणि क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांच्या अर्धपुतळ्यांच्या निर्मितीसाठी निधी दिला. गुरुवारी त्यांच्याच उपस्थितीत या शिल्पांचा लोकार्पण सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिमोटचे बटण दाबल्यानंतर शिल्पांच्या सभोवताली तिरंगी रंगाचे धूर आकाशात झेपावले. त्याचबरोबर पाऊस नावाच्या फटाक्यांची आतषबाजी झाली. उपमुख्यमंत्री दुपारी 1.15 वा.च्या सुमारास तारांगणाच्या आवारात आल्यानंतर त्यांचे ढोल-ताशांसह तुतारीच्या गजरात स्वागत झाले. अधिकार्यांसह पक्षीय नेत्यांची त्यांच्या स्वागतासाठी झुंबड उडाली. त्यानंतर शिल्पांच्या लोकार्पण कोनशीलेचे अनावरण केले.
माळनाका येथील श्रीमान हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणाच्या प्रांगणात ही सहा शिल्पे विराजमान झाली आहेत. मुंबईतील जे.जे.स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांकडून जुन्या वाहनांच्या सुट्या भागांचा वापर करून हे पुतळे तयार करण्यात आले आहेत. हे पुतळे बनवणार्या विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रत्येक पुतळा 12 फूट उंच आणि प्रत्येकी 4 टनाचा आहे. ही शिल्प बनवण्यासाठी विद्यार्थ्यांनी तब्बल 9 महिने अहोरात्र परिश्रम घेतले. जे.जे.स्कूल ऑफ आर्टचे शिक्षक शशिकांत काकडे, विजय बोंदर, विद्यार्थी विजय पाटील यांचा उपमुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.
या कार्यक्रमाला पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह गृह राज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण उर्फ भैया सामंत, माजी मंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, माजी आमदार रवींद्र फाटक, नगर परिषद प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त तुषार बाबर, मुख्याधिकारी वैभव गारवे, माजी आ.संजय कदम, शिवसेनेचे नेते सुदेश मयेकर, जयसिंग उर्फ आबा घोसाळे, राजेंद्र महाडिक, विजय खेडेकर, निमेश नायर, महिला नेत्या स्मितल पावसकर, शिल्पा सुर्वे आदी उपस्थित होते.