रत्नागिरी : शनिवार, रविवार आणि सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अशा सलग 3 दिवस सुट्ट्या आल्याने या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक रत्नागिरीत दाखल झाले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे, आरेवारे बीच तर दापोली हर्णे, गुहागर बीच, मार्लेश्वर आदी ठिकाणे पर्यटकांच्या गर्दीने फुलली आहेत.
सलग 3 दिवस सुट्ट्या आल्याने रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्रच पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. महाराष्ट्रासह देशातील विविध भागातील पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. धार्मिकस्थळ असलेले गणपतीपुळे, मार्लेश्वर या ठिकाणी गर्दी वाढली आहे. त्याचबरोबर आरे-वारे बीच, भाट्ये बीच, भगवती किल्ला, गुहागर बीच, दापोलीतील हर्णे, कर्दे बीच, आंजर्लेतील कासव महोत्सव, राजापुरातील कशेळी बीच आदी ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत आहे. त्याचबरोबर भगवती किल्ल्यावर नव्याने झालेली शिवसृष्टी पाहण्यासाठीसुद्धा पर्यटकांची एकच गर्दी केली आहे.
पर्यटक वाढल्याने जिल्ह्यातील बहुतांश हॉटेल्स, लॉजींग हाऊसफुल्ल झाली आहेत. तसेच रेस्टारंट, आईसक्रीम पार्लर मध्ये ही पर्यटकाचीं मोठी गर्दी दिसून येत आहे. पर्यटकांची संख्या वाढल्याने त्याचा परिणाम सीएनजी गॅसवर झाला आहे. अनेक गॅस पंपात सीएनजी संपल्याचा फलक पहायला मिळत आहे. त्यामुळे पंपावर सीएनजी वाहनांच्या लांबच्या लाब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. महामार्गावरही वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ पहायला मिळत आहे.