लांजा : मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा शहरातील अतिक्रमणे 3 जुलैपर्यंत हटवा आणि न हटवल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा सक्त इशारा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या वतीने अतिक्रमण करणार्यांना देण्यात आला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाला सुरुवात होऊन पाच ते सहा वर्षांचा कालावधी लोटला असून, लांजा शहरामध्ये महामार्गाचे काम रखडलेल्या स्थितीमध्ये आहे. लांजा शहरातील महामार्ग कामाला गती देण्याच्या दृष्टीने महामार्ग प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. महामार्ग राष्ट्रीय प्राधिकरण विभागाने लांजा शहरात महामार्गावर अतिक्रमण केलेल्याना सूचना वजा आवाहन केले आहे. लांजा शहरात महामार्गावरील टपर्या, दुकाने व अन्य अतिक्रमणे ही 3 जुलैपर्यंत स्वतःहून हटवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच प्राधिकरणाकडून देण्यात आलेल्या सूचनेमध्ये महामार्गाची हद्द ही गटाराच्या बाहेर पाच ते सहा फूट असून पुलाखालील असणारी सर्वप्रकारची अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. त्यामुळे संबंधित सर्व टपरी, दुकान, चालक यांनी तत्पूर्वीच सर्वप्रकारची अतिक्रमणे हटवावीत, अन्यथा महामार्ग प्रशासनाकडून दिलेल्या कालावधीनंतर पोलिस बंदोबस्तात असणारी सर्व प्रकारची अतिक्रमणे हटवण्यात येतील. त्यानंतर अतिक्रमण करणार्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील. याची सर्व अतिक्रमण करणार्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महामार्ग प्राधिकरण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान, लांजा शहरात रखडलेल्या महामार्ग चौपदरीकरण कामाला गती देण्यासाठी महामार्ग विभाग सतर्क झाला आहे.