‘दादां‌’च्या राष्ट्रवादीनेही शड्डू ठोकले 
रत्नागिरी

Ratnagiri News : ‘दादां‌’च्या राष्ट्रवादीनेही शड्डू ठोकले

चिपळुणात स्वबळावर लढण्याची तयारी; महायुती होण्याची शक्यता मावळली

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण शहर : भाजपच्या कोकण विभागीय मुंबईतील विशेष बैठकीनंतर चिपळुणातील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्याही रविवारी झालेल्या बैठकीमध्ये आगामी चिपळूण नगर परिषद निवडणुकीत महायुती न झाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वीच दादांच्या राष्ट्रवादीने शड्डू ठोकला आहे. त्यामुळे चिपळुणात महायुती होण्याची शक्यता मावळली असल्याचा अंदाज राजकीय अभ्यासकांनी वर्तवला आहे.

रविवारी दुपारी आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या चिपळुणातील कार्यकर्ता, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात आ. निकम यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. यामध्ये झालेल्या चर्चेत, महायुती करण्यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घ्यावा. युती होत नसेल तर स्वबळावर निवडणुका लढवण्याची तयारी कार्यकर्त्यांनी दर्शवली. या बैठकीमध्ये आमदार शेखर निकम यांनी सांगितले की, इच्छुक उमेदवारांचे अर्ज पक्षाकडे मागवले जातील त्यासाठी पार्लमेंटरी बोर्ड स्थापन करण्यात येईल. याचे प्रमुख प्रांतिकचे उपाध्यक्ष शौकत मुकादम असतील.

या बैठकीमध्ये आमदार शेखर निकम यांनी मार्गदर्शन करताना अनेक महत्त्वाचे विषय मांडले. प्रांतिक उपाध्यक्ष शौकत मुकादम यांनी, कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून निवडणुकीमध्ये पेटून उठून काम केले पाहिजे. बॅनर लावून पक्ष मोठा होत नसतो. घरोघरी मतदारांशी संपर्क साधली पाहिजे. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता आपल्याला निवडणुकीमध्ये कोणतीही अडचण येणार नाही असे ते म्हणाले. तसेच तालुका अध्यक्ष नितीन ठसाळे, सरचिटणीस जयंद्रथ खताते, शहराध्यक्ष मिलिंद कापडी आदींनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन उदय ओतारी यांनी केले. यावेळी न.प.च्या 14 प्रभागांचा आढावा कार्यकर्त्यांकडून घेण्यात आला. बैठकीला माजी सभापती पूजा निकम, नीलेश कदम, रिहाना बिजले, आदित्य देशपांडे, किशोर रेडीज, मनोज जाधव, सचिन पाटेकर, शिवानी पवार, वर्षा जागुष्टे, डॉ. राकेश चाळके, दिशा दाभोळकर, वैभव रेडीज आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT