चिपळूण : चिपळुणातील एक बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याचे जोरदार चर्चिले जात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर भाजप संपूर्ण राज्यातच स्वबळाची तयारी करीत आहे. त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आपला हक्काचा नेता असावा, या द़ृष्टीने भाजपने तयारी केली असून, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीतदेखील भाजप आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूणमध्ये देखील राजकीय घडामोडी घडण्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे त्याला मूर्तरूप कधी येणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.
चिपळूणची विधानसभेची निवडणूक रंगतदार झाली. महायुतीकडून आ. शेखर निकम, तर त्यांच्याविरोधात कोरी पाटी असलेले महाविकास आघाडीचे प्रशांत यादव यांनी निवडणूक लढविली. निकम आणि यादव यांच्यामध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला आणि महायुतीचे निकम यांनी या निवडणुकीत बाजी मारली. त्यानंतर चिपळूणमधील राजकारण काहीसे थंडावलेे; मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राजकीय पक्षांनी चिपळूणवर लक्ष केंद्रीत केले आहे. याआधी शिंदे शिवसेनेचे नेते व उद्योगमंत्री उदय सामंत, त्यानंतर त्यांचे बंधू व राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी प्रशांत यादव यांची भेट घेतली. यानंतर अनेकांनी भुवया उंचावल्या. यादव हे शिंदे सेनेत प्रवेश करणार अशी चर्चादेखील उठली. यानंतर चिपळूणमधील माजी आ. रमेश कदम हे देखील शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार म्हणून चर्चिले गेले. तब्बल दोनवेळा उदय सामंत यांनी रमेश कदम यांची भेट घेऊन थंडगार पन्ह्याचा आस्वाद घेतला, तर आता पुढच्या पावसाळ्यात ठाकरे शिवसेनेचे नेते आ. भास्कर जाधवांच्या शेतात लावणीला जाणार, असे उद्योगमंत्री सामंत यांनी वक्तव्य करून राजकीय गोटात खळबळ उडवून दिली आहे.
या पार्श्वभूमीवर आता चिपळुणातील एक बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याचे चर्चिले जात आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर या संदर्भात त्यांची बैठक झाल्याचे देखील बोलले जात आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी चिपळूणकडे मोर्चा वळविल्याचे पुढे येत आहे.
नुकताच शिंदे शिवसेनेची जिल्हा कार्यकारिणीची बैठक चिपळूणमध्ये झाली. या बैठकीत गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी, आपण चिपळूण व गुहागरकडे लक्ष देणार असल्याचे सांगून या दोन्ही ठिक़ाणी शिवसेनेचा आमदार विजयी होण्याच्या दृष्टीने पाऊले उचलणार, असे जाहीर बैठकीत सांगितले. यामुळे जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपा या महायुतीमधील पक्षांमध्ये सत्तेसाठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर चिपळुणातील एक बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याचे चर्चिले जात आहे. या बाबत नुकतीच प्राथमिक बैठक पार पडल्याचे सांगण्यात येत आहे; मात्र अद्याप संबंधित राजकीय पुढार्यांकडून याचा दुजोरा देण्यात आला नसला तरी राजकीय गोटात जोरदार चर्चा सुरू आहे.