दापोलीत सात नगरसेवकांसह सुनील तटकरेंची सोडली साथ. Pudhari File Photo
रत्नागिरी

खालिद रखांगे यांनी सात नगरसेवकांसह सोडली सुनील तटकरेंची साथ

पुढारी वृत्तसेवा

दापोली; प्रवीण शिंदे

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांचे विश्वासू दापोली नगर पंचायतीचे उप नगराध्यक्ष खालिद रखांगे यांनी सुनील तटकरे यांची साथ सोडली आहे. रखांगे यांनी आठ पैकी सात नगर सेवकांचा स्वतंत्र गट स्थापन केला आहे. या गटाला जिल्हाधिकारी यांनी मान्यता देखील दिली आहे असे समजते. त्यामुळे दापोलीत राष्ट्रवादी पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे. सुनील तटकरे यांची केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस कमिटीच्या चेअरमनपदी वर्णी लागली आहे. हा दिवस तटकरे यांचेसाठी आनंदाचा असला तरी दापोलीत सात नगरसेवकांनी त्यांची साथ सोडल्याने पक्षाची मोठी हानी झाली आहे.

रखांगे यांच्या नेतृत्वाखाली सात नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल

आघाडी सरकारमध्ये सुनील तटकरे असताना दापोली नगर पंचायत निवडणूक ही तटकरे यांचे मार्गदर्शनाखाली जिंकली होती. एकूण आठ नगर सेवकांचे पाठबळ तटकरे यांचे पाठीशी होते. त्या पैकी आता साधना बोत्रे या एकमेव नगरसेवक सुनील तटकरे यांचे सोबत आहेत. तर खालिद रखांगे हे या नव्या गटाचे गटनेते आहेत. दापोली नगर पंचायतीमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची सेना अशी नगर पंचायतीवर सत्ता आहे. ही सत्ता मोडीत निघावी आणि युतीची घडी बसावी असे प्रयत्न राजकीय वर्तुळात काही दिवसांपासून सुरू होते. त्यामुळे बहुदा खालिद रखांगे यांना हे मान्य नसावे यामुळे देखील रखांगे यांनी हे पाऊल उचलले असावे असं बोललं जात आहे. रखांगे यांनी राष्ट्रवादी सोडल्याने नगराध्यक्ष ममता मोरे यांना हा सुवर्ण काळ असून आता बोटावर मोजण्या इतके विरोधक नगर पंचायतीत राहिले आहेत. खालिद रखांगे यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडल्याने याची चर्चा सर्वत्र सुरू असुन हा गट आगामी काळात नेमका कुठे विलीन होतोय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. रखांगे यांनी वेगळा निर्णय घेतल्याने दापोली शहरात अजित पवार आणि सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी संपुष्टात आली आहे, असे बोलले जात आहे. तर निवडणुकीच्या तोंडावर रखांगे यांनी घेतलेला हा निर्णय महायुतीसाठी डोकेदुखीचा ठरणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT