मासेमारी 
रत्नागिरी

कोकण किनारपट्टीवर पर्ससीन जाळ्यांच्या मासेमारीस बंदी

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवरील एकाही पर्ससीन नेट नौकेला मासेमारी करण्याचा परवाना देण्यात आलेला नाही. कोकणातील सात जिल्ह्यांमधील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई शहर आणि उपनगरात सुमारे 1850 नौका पर्ससीन जाळ्यांनी मासेमारी करतात. या नौकांकडे नोंदणी प्रमाणपत्र आणि बंदर प्रमाणपत्र आहेत; परंतु चालू हंगामात त्यांना पर्ससीन जाळ्याने राज्याच्या समुद्र क्षेत्रात मासेमारी करण्यास परवान्यांचे नूतकनीकरण करून देण्यात आलेले नाही.

पारंपरिक मच्छीमारांचे हित जपण्यासाठी आणि सागरी किनार्‍याच्या पर्यावरण रक्षणासाठी राज्याच्या 12 नॉटीकल मैलपर्यंतच्या समुद्र क्षेत्रात मासेमारी करण्याचे परवाने सहायक मत्स्य व्यवसाय विभागाकडून देण्यात आलेले नाहीत. कोकणातील ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये पर्ससीन नेट मासेमारी होत नाही. या ठिकाणी गिलनेट आणि कव जातीची मासेमारी केली जाते, त्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या मासेमारीवर कोणताही परिणाम होणार नाही. परंतु उर्वरित पाच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्ससीन नेट नौका आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुमारे 500, मुंबई शहर व उपनगरात 700, रायगड 500 आणि सिंधुदुर्गात 150 परवाना असलेल्या आणि नसलेल्या पर्ससीन नेट नौका आहेत. पर्ससीन जाळ्याची किंमत 25 ते 30 लाख रुपये इतकी असते. एका नौकेवर दोन जाळी असतात. अचानक मासेमारी परवाने न मिळाल्याने नौका मालक धास्तीत आहेत. राज्याच्या समुद्र क्षेत्रात मासेमारी करण्याचा परवाना नसल्याने या नौका राज्याच्या समुद्र क्षेत्राबाहेर म्हणजेच केंद्राच्या अधिकार क्षेत्रातील खोल समुद्रात जावून मासेमारी करत आहेत. केंद्र शासनाच्या अधिकार क्षेत्रातील म्हणजे 12 नॉटीकल मैलच्या पुढे जावून मासेमारी करण्यासाठी खर्चातही वाढ होते. त्यामुळे मासळी मिळण्याचा चांगला रिपोर्ट मिळाला नाही तर नौका मालकांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होते.

मत्स्य उत्पादन वाढीसह किनार्‍याचे पर्यावरण सुरक्षित रहावे, यासाठी डॉ.व्ही.एस.सोमवंशी यांनी अहवाल दिला आहे. हा अहवाल शासनाने स्विकारला असून अहवालानुसार प्रत्येक जिल्ह्यातील पर्ससीन नेट मसेमारी नौकांचे प्रमाण कमी करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार राज्य शासनाने नवीन मत्स्य धोरण निर्माण करण्यसाठी एक समिती नेमली आहे. या समितीच्या निर्णयानंतरच आता पर्ससीन नेट मासेमारीचे परवाने दिले जाण्याची शक्यता आहे. सोमवंशी अहवलानुसार रत्नागिरी जिल्ह्यात 183 पर्ससीन व मिनी पर्ससीन नेट नौकांना मासेमारी परवाने देण्याची शिफारस आहे. पर्ससीन नेट नौकांची मासेमारी ज्या ठिकाणी चालते त्या ठिकाणची पर्ससीन नौकांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. परंतु चालू मोसमात कोणत्याही पर्ससीन मासेमारीला परवाना देण्यात आलेला नाही. त्यामुळे या नौकांचे परवाने संपुष्टात आले आहेत.

पर्ससीनऐवजी ट्रॉलिंग जाळ्यांचा पर्याय

राज्याच्या समुद्र क्षेत्रात मासेमारी करणार्‍या नौकांचे परवाने नूतनीकरण करून देण्यात आलेले नाहीत. लाखो रुपये खर्चून नौका बांधण्यात आल्या असल्याने अधिक नुकसान नको यासाठी काही पर्ससीन नेट नौका मालक पर्ससीनऐवजी ट्रॉलिंग मासेमारीचे परवाने घेऊ लागले आहेत. ट्रॉलिंग मासेमारीला राज्याच्या समुद्र क्षेत्रात मासेमारी करण्यास सहायक मत्स्य व्यवसाय विभागाकडून परवाने मिळत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT