कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेवक राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर होताच अज्ञातांनी काँग्रेस कमिटी कार्यालयावर दगडफेक केली. शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांचा मोठा फौजफाटा कार्यालयाबाहेर दाखल झाला.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीतील काँग्रेसकडे देण्याचा निर्णय झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून उमेदवार निश्चित होत नव्हता. काँग्रेसकडून शनिवारी रात्री उशिरा माजी नगरसेवक राजेश लाटकर यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. लाटकर यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर रात्री साडेबाराच्या सुमारास कार्यकर्ते स्टेशन रोडवरील काँग्रेस कमिटी कार्यालयाबाहेर आले. त्यांनी कार्यालयावर दगडफेक केली. कार्यालयाच्या भिंतीवर असलेल्या हात या चिन्हाला काळे फासले. कार्यालयाच्या भिंंतीवर चव्हाण पॅटर्न, हॅशटॅग चव्हाण अशी अक्षरे लिहून कार्यकर्ते पसार झाले. ही माहिती मिळताच काही अंतरावर असणार्या शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
काँग्रेस पक्षाकडून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून अनेकजण इच्छूक होते. काँग्रेस निरीक्षकांसमोर त्यांनी मुलाखती दिल्या होत्या. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेले आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर महाविकास आघाडीसोबत राहिलेल्या लाटकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस पदाधिकार्यांच्या समर्थकांकडून ही दगडफेक झाली असावी. अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. उमेदवारीनंतर काँग्रेस कमिटीच्या कार्यालयावर झालेल्या दगडफेकीमुळे काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे.