पुढारी ऑनलाईन डेस्क : Maharashtra Assembly Polls | विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून मधुरिमाराजे यांनी मंगळवारी अर्ज दाखल केला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार घेऊन पुढे जायचं आहे. समाजसेवेचा वारसा जपत आलेलो आहोत. श्री शाहू छत्रपती महाराजांनी तसेच मालोजीराजेंनी समाजकारण करताना नेहमी प्रोत्साहन दिले. यावेळी लोकाग्रहास्तव मी निवडणूक रिंगणात उतरले आहे, अशी प्रतिक्रिया मधुरिमाराजे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर दिली.
निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्यांच्या नेत्यांवरील प्रचंड रेट्यामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेवक राजेश लाटकर यांना दिलेली उमेदवारी ४८ तासांत बदलण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढवली होती. सोमवारी रात्री उशिरा मधुरिमाराजे यांना कोल्हापूर उत्तरचे तिकीट देत असल्याचे पत्र जारी केले होते. त्यानंतर काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींवर पडदा पडला.
विधानसभेच्या रिंगणात आमच्या कुटुंबातील कोणीही उतरणार नाही, असा आमचा निर्णय होता. एका सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळावी, अशी भूमिका खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांची होती. दुर्दैवाने उमेदवारीवर एकमत झाले नाही. त्यामुळे मधुरिमाराजे यांच्यावर ही जबाबदारी आलेली आहे. उमेदवारीची आम्ही मागणी केली नाही. काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती म्हणून शेवटच्या क्षणी निर्णय घ्यावा लागला, असे मालोजीराजे छत्रपती यांनी सांगितले.
१९६७ मध्ये छत्रपती विजयमाला महाराणीसाहेब यांना शेतकरी कामगार पक्षाकडून लोकसभेसाठी उमेदवारी.
२००४ मध्ये मालोजीराजे यांना काँग्रेसकडून विधानसभेसाठी उमेदवारी.
२००८ मध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून संभाजीराजे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी.
२०२४ मध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज यांना काँग्रेसकडून उमेदवारी.
२०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीत मधुरिमाराजेंना काँग्रेसची उमेदवारी.