संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील संजय गांधी नगरमध्ये राहणार्या एका तरुणाने परिचयातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पीडित मुलीने रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संतोष रामू धोत्रे याच्या विरोधात विनयभंगासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्या कायद्यान्वय्ये (पोक्सो) गुन्हा दाखल केला. दरम्यान आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत शहर पोलिसांनी सांगितले की, संगमनेर नगरपालिकेच्या थोरात क्रीडा संकुलाजवळील संजयगांधीनगरमध्ये राहणार्या संतोष धोत्रे या तरुणास 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने दुचाकी शिकविण्याची विनंती केली होती. त्याने तिला दुचाकी चालविण्याचे शिकविताना तिच्याशी जवळीक साधली. 'तू मला खूप आवडते, तुझे लग्न होत नाही तोपर्यंत माझ्याशी संबंध ठेव,' असे म्हणत तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
या प्रकाराने घाबरलेल्या पीडित मुलीने तेथेच दुचाकीवरून उतरून घराकडे पळ काढला. घडलेला प्रकार तिने आईला सांगितला. यानंतर संतप्त झालेल्या तिच्या आईने रात्री उशिरा शहर पोलिसांत तक्रार देण्याचा निर्णय घेतला. यानंतर मुलीच्या आईने संगमनेर शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संतोष रामू धोत्रे (रा. संजय गांधीनगर) याच्या विरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्या कायद्याचे (पोक्सो) कलम 12 नुसार गुन्ह्याची नोंद केली. दरम्यान, धोत्रे यास गजाआड केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक निकिता महाले यांच्याकडे देण्यात आल्याचे सांगण्यात आले.