Latest

सोलापूर जिल्ह्याच्या 45 लाख लोकसंख्येसाठी 4,847 पोलिस

अमृता चौगुले

सोलापूर : अमोल व्यवहारे :  सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या ही जवळपास 45 लाखांच्यावर असून या लोकसंख्येच्या सुरक्षिततेचा भार पेलण्यासाठी केवळ 4 हजार 847 पोलिस कर्मचारी आहेत. सोलापूर ग्रामीण पोलिस दल आणि सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाला मंजूर असलेली अधिकारी व कर्मचार्‍यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे सध्या गुन्हेगारीच्या अनेक घटनांत वाढ झाली असून, याचा ताण त्याच अधिकारी व कर्मचार्‍यांवर पडत आहे. विशेष म्हणजे शहर व ग्रामीण पोलिसांकडील चालक कर्मचार्‍यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. याचा परिणाम पोलिसांच्या कार्यावर होत असून गुन्ह्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे.

सोलापूर शहराची लोकसंख्या 13 लाखांच्यावर असून, यासाठी सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाकडे आठ पोलिस ठाणे व विविध प्रकारांच्या 10 शाखा असून, यामध्ये अधिकारी व कर्मचारी मिळून 2224 पदे मंजूर आहेत. त्यामध्ये एक पोलिस आयुक्त, तीन पोलिस उपायुक्त, 7 सहायक पोलिस आयुक्त, 27 पोलिस निरीक्षक, 47 सहायक पोलिस निरीक्षक, 47 पोलिस उपनिरीक्षक, 1996 पोलिस कर्मचारी व 96 चालक कर्मचारी मंजूर आहेत. आयुक्तालयामध्ये सध्या 1820 कर्मचारी व 60 चालक कर्मचारी हजर असून सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक मिळून 16 पदे, तर चालक कर्मचार्‍यांची 36 पदे रिक्त आहेत.

सोलापूर ग्रामीण जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास 32 लाखांच्यावर आहे. या लोकसंख्येसाठी सोलापूर ग्रामीण पोलिस दलामध्ये 25 पोलिस ठाणे, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर यासह विविध प्रकारच्या 10 शाखांमधून अधिकारी व कर्मचारी मिळून 2699 पदे मंजूर आहेत. त्यामध्ये एक पोलिस अधीक्षक, एक अप्पर अधीक्षक, 9 पोलिस उपअधीक्षक, 27 पोलिस निरीक्षक, 53 सहायक पोलिस निरीक्षक, 70 पोलिस उपनिरीक्षक, 2538 कर्मचारी आणि 85 चालक कर्मचार्‍यांची पदे मंजूर आहेत. सध्या सोलापूर ग्रामीण पोलिस दलामध्ये अधिकारी व कर्मचारी मिळून 147 पदे रिक्त आहेत, तर केवळ 16 चालक कर्मचारी हजर असून 69 चालकांची पदे रिक्त आहेत.
सोलापूर शहर आयुक्तालयामध्ये मंजूर पदांच्या संख्येपेक्षा 227 कर्मचारी व 36 चालक कर्मचार्‍यांची संख्या कमी आहे. सोलापूर ग्रामीण पोलिस दलामध्ये मंजूर पदांच्या संख्येपेक्षा 147 कर्मचारी व 69 चालकांची कमी आहे. आयुक्तालय व ग्रामीण पोलिस दलामध्ये अधिकारी व कर्मचार्‍यांची अनेक पदे रिक्त असल्यामुळेच पोलिसांवर कामाचा ताण वाढत चाललेला आहे.
पोलिस दलावर मोर्चे, आंदोलने, व्हीआयपी बंदोबस्त, सण, उत्सव, सभा-संमेलने, रस्ते वाहतूक, वाढते गुन्हे, गुन्हेगारीचे बदलते स्वरूप, रात्रगस्त, गुन्ह्यांचा तपास, वारी बंदोबस्त यामुळे पोलिसांवर मोठा ताण पडतो आहे. कायद व सुव्यवस्था राखताना अपुर्‍या मनुष्यबळामुळे पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते.

कामाच्या व्यापामुळे पोलिसांना कधीकधी 12 तासांपेक्षाही जास्त तासांची ड्युटी करावी लागते. अनेक वेळा त्यांच्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द केल्या जातात. परिणामी कामाच्या अतिताणामुळे पोलिसांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ लागले आहेत. आहे त्या मनुष्यबळाच्या जोरावर ग्रामीण पोलिस दलाकडून कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच वर्षभरातून पंढरपुरात भरणार्‍या चार वारी बंदोबस्ताचे उत्कृष्ठपणे नियोजन करुन निर्विघ्न वारी पूर्ण करण्यात येतात. राज्य शासनाकडून वेळोवेळी पोलिस भरती घेण्यात येते. परंतु, पोलिस कर्मचार्‍यांची संख्या वाढविण्यात येत नाही. लोकसंख्येच्या मानाने पोलिस कर्मचार्‍यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. संख्या वाढली तर आपोआपच कामाचा ताण कमी होईल व पोलिस कर्मचार्‍यांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ व्यवस्थित राहणार आहे.

लोकसंख्येच्या तुलनेत विभाजन नाही
सन 1992 साली सोलापूर ग्रामीण पोलिस दलाचे विभाजन करून सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आली. हे विभाजन होताना लोकसंख्येच्या तुलनेत पोलिस दलाचेही विभाजन झाले नाही. ग्रामीण पोलिस दलातील निम्मे पोलिस अधिकारी, कर्मचारी व कार्यालयीन विभाग हा सोलापूर शहरासाठी देण्यात आला. त्यामुळे 10 लाख लोकसंख्येसाठी दिलेले अधिकारी व कर्मचारी इतकेच अधिकारी व कर्मचारी हे 30 लाख लोकसंख्या असलेल्या ग्रामीण जिल्ह्याला ठेवण्यात आले. प्रकार हा कार्यालयीन कर्मचार्‍यांमध्ये झाला असल्याने सोलापूर ग्रामीण पोलिस दलाकडे आयुक्तालयाच्या मानाने कमी कार्यालयीन कर्मचारी आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT