Latest

सोलापूर : आंतरराज्य टोळीतील दरोडेखोर अटकेत; सहा गुन्ह्यांचा छडा

Arun Patil

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर ग्रामीण पोलिसांनी आंतरराज्य टोळीतील सनी देवल ऊर्फ सुरेश काळे (वय 25, रा. पानमंगरूळ, ता. अक्कलकोट हल्ली रा. सुकी पिंपरी, ता. पुर्णा, जि. परभणी) याला गजाआड केले. त्याच्याकडून आणखी चार साथीदारांची नावे निष्पन्न झाली आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील शिरवळ, हन्नूर, चपळगाव, पानमंगरूळ, तडवळ व सौंदणे येथील दरोडे त्यांनी टाकल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. त्याच्याकडून 39.1 तोळ्याचे सोन्याचे दागिने व 8 तोळे चांदीचे दागिने असा 18 लाख 76 हजार 800 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.

सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी परभणी पोलिसांकडून अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात दाखल दरोडाप्रकरणी सनी देवल याला तपासासाठी वर्ग करण्यात आले होते. चौकशीत त्याच्याकडून सहा गुन्हे निष्पन्न झाले.

यामध्ये अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ येथे राहणार्‍या शांताबाई दत्तात्रय कोळेकर (वय 60) यांच्या घरावर 29 ऑक्टोबर 2021 रोजी पहाटेच्या सुमारास 6 अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकण्यात आला होता. यामध्ये कोळेकर यांचे पती दत्तात्रय कोळेकर यांना जबर मारहाण करून 3 लाख 16 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लांबविली होती. तसेच त्यांच्या शेजारी राहणार्‍या सविता माने या महिलेसदेखील जबर मारहाण करून तिच्या घरातील 2 लाख 80 हजार 500 रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले होते. दोन्ही मिळून 5 लाख 96 हजार 500 रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला होता. याबाबत अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना संशयित आरोपी सनी देवल यास परभणी पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात पकडल्याची माहिती मिळाली. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी त्यास अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात दाखल दरोड्याच्या गुन्ह्यात वर्ग करून घेतले. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी काळे याच्याकडे त्याच्या नातेवाईकांना घेऊन कौशल्यपूर्ण तपास केला.

यावेळी त्याने साथीदारांच्या मदतीने वेगवेगळ्या ठिकाणी दरोडे टाकल्याचे कबूल केले. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या ताब्यातून विविध गुन्ह्यातील 39.1 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व 8 तोळे वजनाचे चांदीचे दागिने असा मुद्देमाल जप्त केला. त्याच्याविरुध्द सोलापूर जिल्ह्यातील मंद्रूप, कामती, अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाणे तसेच पूर्णा पोलिस ठाणे, पालम पोलिस ठाण्यातदेखील दरोड्याचे गुन्हे दाखल असून त्यामध्ये तो फरार असल्याचे सातपुते म्हणाल्या.

ही कामगिरी अप्पर पोलिस अधिक्षक हिम्मंत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप, अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याचे निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक रविंद्र मांजरे, सहायक फौजदार ख्वाजा मुजावर, हवालदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, समीर शेख, अक्कलकोट उत्तरचे अमंलदार प्रविण वाळके, हेमंत चिंचोळकर, अनिस शेख, चिदानंद उपाध्ये, बिरण्णा वाघमोडे, सिताराम राऊत यांनी केली.

बोरामणीच्या गुन्ह्याचा शोध घेताना मिळाल्या अट्टल गुन्हेगारांच्या तीन टोळ्या

बोरामणी येथे काही दिवसापूर्वी दरोडा टाकून खून केल्याच्या संवेदनशील गुन्ह्याचा तपास करताना सोलापूर ग्रामीण पोलिसांना अट्टल गुन्हेगारांच्या तीन टोळ्या मिळाल्या. बोरामणी येथील दरोडा टाकून खून केलेल्या गुन्हेगारांची एक टोळी, बार्शी येथे दरोडे टाकून अनेक दिवसापासून फरार असणार्‍या गुन्हेगारांची दुसरी टोळी हाती लागली होती. आता अक्कलकोट तालुक्यात दरोडे टाकणार्‍या गुन्हेगारांची ही तिसरी टोळी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पकडली आहे. या तिन्ही टोळ्यांमधील सर्वच गुन्हेगार हे अट्टल गुन्हेगार असून गेल्या अनेक महिन्यांपासून हे फरार होते.

दरोड्याचे दागिने सनीची बायको वापरायची

अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ येथील दरोड्यात लुटलेल्या सोन्याच्या दागिन्यांमधील दागिने आरोपी सनी देवलची बायको गळ्यात घालून फिरत होती. याचा फोटो सोशल मिडीयावर पडल्यानंतर याची कुणकुण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना लागली होती. त्यावेळी पोलिस पथकातील काही अनुभवी कर्मचार्‍यांनी या गुन्हेगारांच्या वस्त्यांमध्ये जाऊन तिथे काही दिवस राहून सर्व माहिती काढून सनी देवलला सांगितल्यानंतर त्याने गुन्हे कबूल केले व जमिनीमध्ये पुरून ठेवलेल्या दागिन्यांची माहिती पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी दागिने जप्त केले.

पानमंगरूळ येथे झालेल्या गोळीबारातील फिर्यादी, आरोपी हेच दरोड्यातील संशयित

अक्कलकोट तालुक्यातील पानमंगरूळ येथे 6 नोव्हेंबर 2021 रोजी ग्रामपंचायतीसमोरच गोळीबार करून एकाच्या खूनाचा प्रयत्न करण्यात आला होता. या गोळीबारीमध्ये गंभीर जखमी झालेला फिर्यादी हा जखमी अवस्थेतच रुग्णालयातून पळून गेला होता. त्यामुळे पोलिसांनी फिर्यादीची चौकशी करण्यास सुरुवात केली असता या गुन्ह्यातील फिर्यादी व आरोपी यांनीच शिरवळसह इतर ठिकाणी दरोडा टाकल्याची माहिती पोलिसांना मिळाली. विविध दरोड्याच्या गुन्ह्यातील ऐवजाची वाटणी करताना या गुन्हेगारांमध्ये वादावादी होऊन गोळीबार करून खूनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यातील जखमी फिर्यादी हादेखील इतर दरोड्यांच्या गुन्ह्यात संशयित आरोपी आहे. त्याचाही पोलिस शोध घेत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT