Latest

सातार्‍याचा पाणीप्रश्न यावर्षीपासून संपुष्टात

Arun Patil

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : सातार्‍यासह पंधरा गावांना पाणीपुरवठा करणार्‍या कास धरणाचे काम पूर्ण झाल्याने यावर्षीपासून धरणात जादा पाणी साठवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यावर्षी 0.3 टीएमसी पाणी साठवण्यात येणार आहे. कास धरणाची पाणी साठवण क्षमता पाचपट करण्यात आली आहे. धरणात अतिरिक्त पाणीसाठा होणार असल्याने लगतच्या 15 गावांसह सातारा शहराचा पाणी प्रश्न निकाली निघाला.

सातारा शहराच्या प्रामुख्याने पश्चिम भागास कास धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सायपन पध्दतीने शहरात पाणी येत असल्यामुळे या पाणी पुरवठा योजनेचा खर्च फार कमी आहे. जुने कास धरण 0.1 टीएमसी होते. सातारा शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेवून या धरणाची उंची वाढवणे आवश्यक होते. गेली दहा वर्षांपासून कास धरणाची उंची वाढवण्याचे प्रयत्न सुरु झाले. सुरुवातीला या कामासाठी सुमारे 39 कोटींची तरतूद करण्यात आली होती.

निधी मंजूर झाला पण प्रत्यक्ष कामास उशीर झाला. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी या प्रकल्पाच्या कामात लक्ष घातले. प्रकल्पाची किंमत वाढल्याने त्यासाठी लागणारा अतिरिक्त निधी त्यांनी उपलब्ध करुन दिला. धरणांची उंची वाढवण्याचे काम पूर्णत्वास जात असताना स्थानिकांचेही विषय समोर आले. त्यांच्या मागण्याही मार्गी लावण्यात आल्या. शहरात वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु होवून पाण्याच्या टाक्या, जलवाहिन्यांची कामे पूर्णत्वाला गेली.

दरवर्षी डीएसआर वाढत असल्याने प्रकल्पाची किंमत वाढत गेली. धरण तसेच रस्ते मिळून या प्रकल्पाची किंमत सुमारे 95 कोटी इतकी झाली. कास धरणाच्या घळई भरणाचे काम वर्षभर रखडले होते. नुकतेच हे काम पूर्ण झाले आहे. यावर्षीपासून धरणात क्षमतेच्या जवळपास निम्मा पाणीसाठा करण्यात येणार आहे. यावर्षी 0.3 टीएमसी (250 दशलक्ष घनफूट) पाणीसाठा करण्यात येणार आहे. मात्र त्यानंतर पुढील वर्षांपासून 0.5 टीएमसी (500 दशलक्ष घनफूट) पाणीसाठा करण्यात येणार आहे.

कास धरणात यावर्षीपासून अतिरिक्त पाणीसाठा निर्माण होणार असल्याने सातारा शहरासोबतच कास पठार परिसरातील 15 गावांचा पाणीप्रश्न संपुष्टात येणार आहे. सातारा नगरपालिकेला दरवर्षी करावी लागणारी पाणीकपात करावी लागणार नाही. एक दिवसांचा शटडाऊन करण्याची वेळ पुन्हा येणार नाही. भविष्यातील जवळपासून 40 वर्षांपर्यंत पाणीटंचाई जाणवणार नाही, असे अधिकार्‍यांचे मत आहे.

सातारा नगरपालिकेकडून कास धरण परिसर पर्यटनाच्यादृष्टीने विकसित होणार आहे. पर्यटनाच्या अनुषंगाने काही बदल करण्यात येणार आहेत. मुख्याधिकारी अभिजीत बापट त्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे कास पुष्प पठारानंतर कास धरण या परिसरातील पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरु शकतो. धरणाच्या कामाचे कंत्राटदार अशोक सावंत यांनी निर्धारित वेळेत काम पूर्ण केल्याने समाधान व्यक्त होत आहे.

उरमोडी उपविभागाचे कार्यकारी अभियंता अमर काशीद म्हणाले, कास धरणाच्या घळभरणीचे काम विक्रमी वेळेत पूर्ण झाले. उंची वाढवल्याने पूर्वीच्या तुलनेत पाचपट अधिक पाणीसाठा धरणात होणार आहे. संबंधित गावांसह सातारा शहरास आगामी काही वर्षे पाणीटंचाई भासणार नसल्याचे सांगितले.

किरकोळ कामांसाठी निधी उपलब्ध होणार कधी?

कास धरणाचे काम पूर्ण झाले असले तरी काही किरकोळ कामे रखडली आहेत. त्यासाठी निधीची आवश्यकता आहे. हा निधी वेळेत उपलब्ध झाला तर राहिलेली कामे पावसाळ्याआधी पूर्ण होवू शकतील. मात्र त्यासाठी पुन्हा प्रयत्न करणे आवश्यक आहे. वेळेत निधी उपलब्ध झाला तर रस्त्यांसारखी किरकोळ कामे मार्गी लागून स्थानिकांना दिलासा मिळेल. धरणाच्या उर्वरित कामासाठी निधी मिळावा, अशी मागणी होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT