Latest

सांगली : गुळावरही जीएसटी; अधिसूचनेमुळे संभ्रम दूर

backup backup

सांगली; पुढारी वृत्तसेवा : गुळावरील 'जीएसटी'चा संभ्रम अखेर केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेने दूर झाला आहे. दि. 18 जुलैपासून गुळाला 5 टक्के जीएसटी लागू होत आहे. पॅकिंगमधील दही, ताक, लस्सी, अन्नधान्य, डाळीवरही 5 टक्के जीएसटी लागू होत आहे. मात्र याचा फटका ग्राहकांना बसणार आहे.

आत्तापर्यंत अन-ब्रँडेड किंवा ब्रँडवरील अधिकार सोडून दिलेले खाद्यपदार्थ, धान्य इत्यादींवर जीएसटी सवलत दिली जात होती. जीएसटी परिषदेच्या 47 व्या बैठकीमध्ये त्यात सुधारणा करण्याची शिफारस करण्यात आली. त्यामुळे प्री-पॅकेज आणि प्री-लेबल केलेले विशिष्ट खाद्यपदार्थ, धान्य यांना सवलतीमधून वगळण्यासाठी शिफारस केली होती. प्री-पॅक केलेले, प्री-लेबल केलेले दही, लस्सी आणि ताक यांचीही सवलत मागे घेण्यात आली. त्यामुळे आता पूर्व पॅकिंग व पूर्व लेबल लावलेल्या अन्नधान्य आदी वस्तू पुरवठा करताना किरकोळ पॅकवर दि. 18 जुलैपासून 5 टक्के जीएसटी लागू होत आहे.

जीएसटीच्या सवलतीच्या शेड्युलमध्ये गुळाचा समावेश होता. मात्र गूळ हा 250 ग्रॅम, 500 ग्रॅम, 1 किलो, 5 किलो पॅकिंगमध्ये
बाजारात विक्रीला येतो. त्यामुळे आता गुळालाही 5 टक्के जीएसटी लागणार आहे.

संबंधित व्यापार शनिवारी बंद : शरद शहा

सांगली चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा म्हणाले, गुरुवारी मुंबईत सर्व व्यापारी संघटनांची बैठक झाली आहे. गूळ, दही, ताक, लस्सी तसेच अन्नधान्यांवर लागू केलेल्या 5 टक्के जीएसटीच्या निषेधार्थ शनिवारी (दि. 16) संबंधित वस्तुंचा देशव्यापी व्यापार बंद राहणार आहे. शासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा विचारही व्यापारी संघटनांच्या बैठकीतून पुढे आला आहे.

यांना सवलत

  • 25 किलो किंवा त्याहून जास्त प्रमाणात असलेल्या पॅकेजमधील वस्तू ज्याचा 'ब्रँड'चा क्लेम सोडून दिला आहे.
  • सुटे विकले जाणारे विशिष्ट खाद्यपदार्थ, धान्य
  • ज्याचे पॅकिंगवर चिन्ह /खूण नाही असे खाद्य पदार्थ, धान्य
  • ग्राहकासमोर त्याने सांगितल्याप्रमाणे केलेल्या पॅकिंगमधील वस्तू
  • अनोंदणीकृत ब्रँड वस्तू ज्या पूर्व पॅकिंग वस्तू व पूर्व लेबल लावलेल्या लीगल मेट्रोलॉजी कायद्याच्याच्या कक्षेत येत नाहीत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT