Latest

संस्कृतमध्येच बोलणारी गावं!

Arun Patil

जगातील आद्य व्याकरण शुद्ध भाषा म्हणजे संस्कृत. अनेक भारतीय भाषांची जननी असलेली संस्कृत ही अतिशय समृद्ध अशा ज्ञानभांडाराची भाषा आहे. एके काळी संस्कृत ही बोलीभाषाही होती. प्राचीन भारतातील अनेक ग्रंथ याच भाषेत आहेत. वेद-उपनिषदे, रामायण-महाभारत, पुराणे, सहा वेदांगे व सहा दर्शने यांच्यापासून गणित, खगोलशास्त्र, यंत्रशास्त्र, कृषिशास्त्र, आयुर्वेद व कामशास्त्रापर्यंतच्या अनेक विषयांचे प्राचीन ग्रंथ संस्कृतमध्येच आहेत. सध्याच्या काळातही कुणी संस्कृतमध्येच दैनंदिन व्यवहार करीत असतील असे आपल्याला वाटणार नाही. मात्र, आपल्या देशात काही गावे अशी आहेत जिथे रोजचे व्यवहार याच देववाणीत होतात. या गावांची ही माहिती…

मत्तूर : कर्नाटकात बंगळूरपासून सुमारे 300 किलोमीटरवर असलेले हे एक शांत, टूमदार गाव आहे. तुंगा नदीच्या काठावरील हे गाव शिमोगापासून 8 किलोमीटरवर आहे. तेथील लोक दैनंदिन जीवनात संस्कृत भाषेतच बोलत असल्याने ते प्रसिद्ध आहे. पाच हजारांची लोकसंख्या असलेल्या या गावातील उच्च शिक्षित लोकच नव्हे तर सर्वसामान्य दुकानदार, मजूर आणि अगदी लहान मुलंही सफाईदारपणे संस्कृत बोलतात.

झिरी : मध्य प्रदेशात राजगढ जिल्ह्यातील सारंगपूर तालुक्यात हे गाव आहे. इंदूरपासून उत्तरेला 150 किलोमीटरवर हे दुर्गम गाव आहे. या गावाची लोकसंख्या एक हजार आहे. या परिसरात सहसा स्थानिक मालवी भाषा बोलली जाते, पण या गावातील लोक संस्कृतमध्येच संभाषण करतात. सुशिक्षित-अशिक्षित, स्त्री-पुरुष, प्रौढ-बालक, श्रीमंत-गरीब असे सगळेच संस्कृतमध्ये बोलतात.

ससाना : ओडिशाच्या किनारपट्टीजवळील गजपती जिल्ह्यात हे दुर्गम गाव आहे. तेथील प्रत्येक घरात एक तरी संस्कृत पंडित आढळतोच. येथील संस्कृत पंडित सरकारी संस्कृत माध्यमाच्या शाळांमध्येही अध्यापन करतात. संस्कृत भाषेतच शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी या भागात आहेत.

बाघुवार : मध्य प्रदेशात नरसिंहपूर जिल्ह्यातील करेली तालुक्यात हे गाव आहे. या गावाला बाघुवार बघवार असेही म्हटले जाते. या गावातील बहुसंख्य लोक हे संस्कृतमधूनच संवाद साधतात.

गणोरा : राजस्थानमध्ये बन्सवाडा जिल्ह्यातील घातोल तालुक्यात हे गाव आहे. या गावातील लोक अस्खलित संस्कृतमध्येच एकमेकांशी बोलतात. या गावात संस्कृत शाळा व महाविद्यालयही आहे. खरे तर या शाळेमुळेच मुलं संस्कृत शिकली व शिक्षकांच्या प्रोत्साहनाने एकमेकांशी तसेच घरी कुटुंबीयांशीही संस्कृत बोलू लागली आणि नंतर अवघे गावच संस्कृतमय झाले!

मोहद : मध्य प्रदेशातच बुर्‍हाणपूर जिल्ह्यात मोहद हे गाव आहे. महेश्वरपासून ते 25 किलोमीटरवर आहे. या गावातील बहुसंख्य लोक संस्कृतमध्येच दैनंदिन व्यवहार करतात. त्यामध्ये आबालवृद्ध अशा अनेक ग्रामस्थांचा समावेश आहे.

होसाहळ्ळी : कर्नाटकातील हे गावही मत्तूरप्रमाणेच तुंगा नदीच्या काठावर असून तेथील लोकही संस्कृत बोलतात. कर्नाटकी संगीताच्या साथीने गायन व कथाकथन करण्याच्या गामका कलेमुळे येथील लोक संस्कृत बोलू लागले.

पटियाला : नावावरून अनेकांना हे गाव पंजाबमधील असावे असे वाटेल, पण हे गाव आहे आसामचे. या गावातील सर्व लोक देशाची प्राचीन आणि अभिजात भाषा बोलतात. हे गाव करीमगंज जिल्ह्यातील राताबारी विधानसभा मतदारसंघात येते. इथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्ती एकमेकांशी संस्कृतमध्ये बोलते. गावात सुमारे 60 कुटुंबे राहतात, ज्यात सुमारे 300 लोक आहेत. त्यांना संस्कृत भाषेचा खूप अभिमान आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT