Latest

श्रीरामपूर : वादळ-वार्‍यासह अवकाळीचा कहर सुरूच ! पिकांचे मोठे नुकसान

अमृता चौगुले

श्रीरामपूर(नगर); पुढारी वृत्तसेवा : वादळ-वार्‍यासह अवकाळी पावसाचा कहर सुरुच आहे. श्रीरामपूर, राहुरी, राहाता, संगमनेर शहरांसह तालुक्यात काल ( शुक्रवारी अवकाळीने तुफान हजेरी लावल्याने शेतकरी बांधवांची चांगलीच धावपळ उडाली. पावसासह वादळ-वार्‍याने घरांची पडझड झाल्याने पुन्हा नुकसानीचे सावट समोर आल्याचे दारुण वास्तव समोर येत आहे.

राहुरी : शहरासह वांबोरी व तालुक्यात काही भागात वादळ, वार्‍यासह अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. शेतकर्‍यांसह सामान्य नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. मोठी झाडे वादळच्या तडाख्यात सापडून रस्त्यावर, शेतात उन्मळून पडली. छत उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. तीन दिवसांपासून तालुक्यात अवकाळीने थैमान घातले आहे.

दोन दिवसांपूर्वी सायंकाळी शहरासह तालुक्यात काही भागात वादळी वार्‍यासह अवकाळीने हाहाकार केला. पुन्हा काल सकाळी 11 वाजे दरम्यान तालुक्यात केंदळ, चणकापूर, मांजरी, वळण, ब्राम्हणी, उंबरे आदी गावांमध्ये जोरदार वादळी वार्‍यासह आलेल्या अवकाळीने अक्षरशः थैमान घातले. अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाली.

शेत मालाचे प्रचंड नुकसान झाले. काही रस्त्यांवर झाडे पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. विद्युत वाहिनीचे पोल पडल्याने परिसरात विद्युत पुरवठा खंडित झाला. वादळाने काही घरे पडली. कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 1 तास सुरू असलेल्या वादळ, वार्‍यासह पावसाने अनेकांच्या संसाराची दाणादाण उडाली. शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

वळण : राहुरी तालुक्याच्या पूर्व भागात शुक्रवारी सकाळी साडे अकरा, पावणे बारा वाजेच्या दरम्यान झालेल्या तुफान वादळी, अवकाळी पावसाने अनेकांच्या घरांवरची पत्रे उडाली. विजेचे पोल वाकडे होऊन काही ठिकाणी विद्युत तारा तुटून पडल्या. मोठ-मोठी वृक्ष उन्मळून रस्त्यावर पडली. झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. मोठ्या प्रमाणात कैर्‍यांची गळती झाल्याने झाडांखाली अक्षरशः सडा पडला होता. अवकाळी व वादळाने परिसरात विद्युत पुरवठा खंडित.

राहुरी- मांजरी रस्त्यावर वळण ते मानोरी दरम्यान अनेक ठिकाणी झाडे पडल्याने पाच तास रस्ता बंद होता. वळण, मानोरी परिसरात वादळी पावसाने हाहा कार उडविला. यामुळे शेतकरी व सर्वसामान्यांचे धावपळ उडाली. वळण येथे लक्ष्मण शंकर जाधव या शेतकर्‍याच्या छपराशेजारी दोन्ही बाजूने असलेले मोठ-मोठे लिंबाचे झाडे उन्मळून पडल्याने छपराची भिंत पडून नुकसान झाले, मात्र सुदैवाने जीवित हानी झाली नाही. संजय चव्हाण यांच्या घराच्या छतावरील पत्रे दूरवर उडून गेल्याने ते बेघर झाले.

मानोरी येथे आप्पासाहेब कारभारी बाचकर यांच्या घरावरील 12 पत्रे दूरवर उडून पडले. महाडूक सेंटर येथे सुभाष गायकवाड यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. पंचनामे करून तात्पुरता निवारा उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा गायकवाड व जाधव यांनी व्यक्त केली.

झाडे व तारा तुटल्याने रहदारी पूर्णतः बंद होती. वादळ व पावसानंतर चार तास अधिकार्‍याने गांभीर्याने दखल घेत कार्यवाही न केल्याने बराचवेळ रहदारी ठप्प होती. रस्ता बंद झाल्याने राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानास जाणार्‍या मतदारांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागला. या भागात विद्युतपुरवठा आठ दिवसांपासून पुर्णपणे विस्कळीत झाला असताना आता तारा तुटल्याने विद्युत पुरवठा केव्हा सुरळीत होणार, याबाबत ग्रामस्थ संभ्रम अवस्थेत आहेत.

राहाता : वादळ, वार्‍यासह ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह मुसळधार अवकाळीने काल सकाळी सव्वा अकराच्या सुमारास शहरासह परिसरात दाणादाण उडविली. द्राक्ष, चिकू, आंबा, टरबूज, खरबूज, कांदा आदी शेतात उभ्या पिकांना मोठा फटका बसला. शेतकरी बांधवांच्या हाता- तोडांशी आलेला घास पावसाने हिरावला आहे. आधीच आर्थिक संकटात असलेल्या बळीराजाला आता अवकाळीने अधिक संकटात लोटले आहे. शुक्रवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास शहरासह परिसरात अवकाळीने अनपेक्षित मुसळधार हजेरी लावली.

कोल्हार : कोल्हार भगवतीपूर परिसरात सकाळी जोरदार अवकाळी पाऊस बरसला. अर्धा तास झालेल्या या जोरदार पावसाने चोहिकडे पाणीच- पाणी झाले. कोल्हार भगवतीपुरचा आठवडे बाजार होता. अचानक सुरू झालेल्या अवकाळीने बाजारातील भाजी विक्रेते व दुकानदारांची चांगली धावपळ झाली. पाऊस थांबल्यानंतर काही वेळेतच कडक ऊन पडले. पुन्हा दुपारी 4 वाजेनंतर रिमझिम पाऊस बरसला. अवकाळीने कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे नुकसान झाले.

संगमनेर : शहरासह गुंजाळवाडी परिसरात शुक्रवारी दुपारी अवकाळी पावसासह तुरळक स्वरूपात गारा पडल्या. वादळी- वार्‍याने आरगडेमळा येथे भाऊसाहेब सोमनाथ आरगडे यांच्या दोन खोल्यांचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले. तालुक्यात ठिक- ठिकाणी अवकाळीने हजेरी लावली. अचानक वादळ, वार्‍याला सुरूवात झाली. काही क्षणात वार्‍याचा वेग प्रचंड वाढल्याने धावपळ उडाली.

पिकांचे नुकसान झाले. अधिकार्‍यांनी नुकसानग्रस्त वस्तूंचे पंचनामे करावे, अशी मागणी आरगडे यांनी केली. तुरळक गाराही पडल्याने पिकांना चांगलाच फटका बसला. शहरासह परिसरात झालेल्या वादळ- वार्‍यामुळे शहरानजीक राहणे मळा, जगताप मळा, लक्ष्मीनगरसह अनेक ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर पडली. काही ठिकाणी विजांच्या तारा पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याने संताप व्यक्त झाला.

कोपरगाव : शहरासह तालुक्यात वादळ, वारा अन् विजांच्या कडकडटासह 15 मिनिटे अवकाळी पाऊस पडला. शहरात रस्त्यावरून पाणी वाहिले. कांदा भिजल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. काही दिवसांपासून उष्णतेची लाट आहे. तापमान 35 ते 38 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. कधी ऊन तू कधी आभाळ भरून येते. ऊन सावलीचा खेळ सुरु असताना अवकाळीचा तडाखा सुरु असल्याने बळीराजा हैराण झाला आहे.

'अवकाळी'ने केली शेतकर्‍यांची अवकळा..!

वादळ, वारे अशात जोरदार अवकाळी पाऊस आल्याने शेतात सोंगलेली व काढलेली पिके झाकून ठेवण्यास शेतकर्‍यांची एकच धांदल उडाली. अवकाळीने कांदा, द्राक्ष, आंबा, चिकू फळबाग शेतकर्‍यांची चिंता अधिक वाढली आहे. काढणीस आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. जणू 'दुष्काळात तेरावा महिना' अनुभवण्याची वेळ शेतकरी बांधवांवर येणार असल्याचे दिसते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT