Latest

विम्बल्डन सेंटर कोर्टची शताब्दी

Shambhuraj Pachindre

निमिष वा. पाटगावकर : विम्बल्डनच्या 'सेंटर कोर्ट'ला यंदा शंभर वर्षे झाली. इतिहासप्रेमी इंग्लंडमध्ये आठव्या शतकातला पब अजून कार्यरत आहे. पंधराव्या-सोळाव्या शतकातील तर कित्येक वास्तू आजही दिमाखात उभ्या आहेत. त्यामानाने 'सेंटर कोर्ट' हे तरुणच मानले पाहिजे. कितीही वर्षे जुने झाले तरी 'सेंटर कोर्ट'चा महिमा तसाच राहील.

जून महिना लागला की, आपल्याला पावसाचे वेध लागतात. आषाढापासूनच 'हिरवळ दाट चोहीकडे' दिसायला सुरुवात होते. जून आणि हिरवळ याचे नाते फक्‍त निसर्गापुरते मर्यादित नाही. टेनिस जगतासाठी ते पार विम्बल्डनपर्यंत आहे. टेनिस ग्रँड स्लॅममध्ये जरी ऑस्ट्रेलियन, फ्रेंच आणि अमेरिकन ओपन स्पर्धा असल्या तरी ज्याला स्पर्धेचा राजेशाही थाट म्हणता येईल, अशी एकमेव स्पर्धा म्हणजे विम्बल्डन. नुसता राजेशाही थाटच नव्हे, तर राजाश्रयही या स्पर्धेला लाभलेला आहे. 'ड्यूक ऑफ केंट' हे विम्बल्डनचे आयोजन करणार्‍या क्लबचे 1969 पासून अध्यक्ष आहेत.

इंग्लडच्या इतिहासात या वर्षी दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. एक म्हणजे इंग्लंडची राणी एलिझाबेथ हिने 6 फेब्रुवारी रोजी इंग्लंडच्या सम्राज्ञीपदाची सलग 70 वर्षे पूर्ण केली आणि विम्बल्डनच्या सेंटर कोर्टने यंदा शंभरी पार केली. जगावर राज्य गाजवणार्‍या साम्राज्याच्या राणीचा पदग्रहणाचा सोहळा ब्रिटिश लोकांसाठी उत्साहाचा होता, पण हा एकाच व्यक्‍तीचा सन्मान होता, तर दुसरीकडे टेनिसप्रेमींच्या मनावर राज्य करणारा सेंटर कोर्टच्या शताब्दीचा सोहळ्यात या सेंटर कोर्टचे अनेक राजे आणि राण्या सहभागी झाले होते. विम्बल्डनच्या कालावधीतील मधला रविवार सुटीचा असतो. पण यंदा विम्बल्डनच्या सेंटर कोर्टच्या शतक महोत्सवाचा समारंभ रविवारी साजरा झाला.

सर्व ग्रँड स्लॅम स्पर्धांत विम्बल्डन आणि त्यातही सेंटर कोर्ट का वेगळे ठरते? एक म्हणजे हिरव्यागार मखमलीवर कुठच्याही वॉशिंग पावडरच्या जाहिरातीत दिसतात, त्यापेक्षा जास्त पांढरेशुभ्र कपडे घातलेले खेळाडू, सुटाबुटातले सभ्य प्रेक्षक, लालचुटूक स्ट्रॉबेरी आणि व्हीपक्रीमचा आस्वाद घेणारे प्रेक्षक, असे नेत्रसुख दुसर्‍या कुठच्या स्पर्धेत दिसत नाही. आणि दुसरे मुख्य कारण म्हणजे आज नैसर्गिक गवतावर खेळल्या जाणार्‍या स्पर्धा कमी झाल्या आहेत. तेव्हा ग्रासकोर्टवरच्या स्पर्धा कमी असल्याने त्यात प्रावीण्य मिळवायला सरावही मर्यादित आहे.

जसे हॉकी गवतावरून ऍस्ट्रोटर्फवर गेले तसेच टेनिसही बहुतांशी ठिकाणी कृत्रिम पृष्ठभागावर गेले. याला मुख्य कारण म्हणजे निगा राखण्यातली सुलभता. गवतापेक्षा कृत्रिम पृष्ठभाग सांभाळणे केव्हाही कमी कष्टाचे आणि खर्चाचे असते. विम्बल्डनच्या सर्व कोर्टवर जे गवत राखले जाते, ते जीवापाड मेहनतीने राखले जाते. दोन आठवड्यांच्या या स्पर्धेसाठी वर्षभर मेहनत या गवतावर घेण्यात येते. त्यातून सेंटर कोर्टला तर तळहातावरच्या फोडासारखे जपले जाते.

1922 साली विम्बल्डनचे सेंटर कोर्ट वॉर्पल रॉडवरून सध्याच्या चर्च रोडच्या जागेत आले आणि तिथून गेली शंभर वर्षे हे सेंटर कोर्ट टेनिस जगताचे स्वप्नपूर्तीचे स्थान बनले आहे. 1940 साली दुसर्‍या महायुद्धात या सेंटर कोर्टवर टेनिसच्या बॉलच्या ऐवजी बॉम्बगोळ्यांचा वर्षाव झाला. तेव्हा सेंटर कोर्टचा जो भाग या बॉम्ब वर्षावात उद्ध्वस्त झाला, तो दुरुस्त व्हायला 1947 साल उजाडले. यानंतर मात्र विम्बल्डनच्या या गाभार्‍याला धक्‍का लागला तो फक्‍त सुधारणांसाठी. 1979 साली प्रेक्षकांची क्षमता वाढवली आणि 2009 साली या सेंटर कोर्टवर उघडबंद करता येईल असा छपराचा कळस चढवण्यात आला. यामुळे आता पाऊस सेंटर कोर्टवर रसभंग करत नाही. ही नैसर्गिक गवताची कोर्ट सांभाळायची म्हणजे प्रचंड मेहनत असते. काही वर्षांपूर्वी विम्बल्डन गवतावरून कृत्रिम पृष्ठभागावर हलवण्याबाबत चर्चा चालली होती, पण परंपरेच्या बाबतीत आग्रही असणार्‍या साहेबांनी गवताची परंपरा राखण्याचे ठरवले. विम्बल्डनसाठी जे तृण वापरले जाते, त्याला जगात दुसरीकडे क्वचितच इतके महत्त्व असेल. यॉर्क शायरच्या 'स्पोर्टस् टर्फ रिसर्च इन्स्टिट्यूट'ने 2001 साली या जातीच्या गवताची शिफारस केली कारण या गवतावर मिळणारा बाऊन्स आणि गवत जमिनीला पकडून ठेवण्याची क्षमता. विम्बल्डनची स्पर्धेसाठी वापरली जाणारी 18 कोर्टं आणि सरावासाठीची 22 कोर्टं अशी जवळपास 40 कोर्टं तयार करायला हा क्लब पूर्ण वर्षभर कार्यरत असतो. आपल्याकडे जसे पेणचे गणपती मूर्तिकार गणेशोत्सव पार पडला की, लगेच पुढच्या गणेशोत्सवाच्या मूर्ती बनवायला घेतात तसेच विम्ब्लडनचे कोर्ट कारागीर स्पर्धा संपली की, लगेच पुढच्या वर्षीच्या स्पर्धेच्या तयारीला लागतात.

स्पर्धेच्या दोन आठवड्यात खेळाडूंच्या बुटांनी घासून घासून झिजलेले आणि तुटलेले गवत पहिल्यांदा मुळापासून उपटून टाकण्यात येते. मग वेळ असते ती कोर्टच्या जमिनीच्या मशागतीची आणि पेरणीची. साधारण एक टन तृणांच्या बियाण्यांची पेरणी खताबरोबर केली जाते. या पेरणीवर दमटपणा झिरपेल असे आच्छादन घातले जाते. पेरलेल्या बियाण्याला योग्य तापमान आणि पाणी मिळेल याची व्यवस्था करत एक आठवडा ही कोर्टं झाकून ठेवलेली असतात. नवीन गवत उगवले की, हिवाळ्याच्या सुरुवातीला त्याची प्रथम छाटणी होते आणि मग सर्व कोर्टवर मिळून साधारण सहा टन मातीचा थर घातला जातो, जेणेकरून कोर्टच्या पृष्ठभागाची लेव्हल राखायला पुढे मदत होते. साधारण मार्च उजाडला की, विम्बल्डनच्या तयारीचा वेग वाढायला लागतो. दर दोन आठवड्याला एक मिलीमीटर अशी छाटणी करत हिवाळ्यातली 13 मिलीमीटरची उंची 8 मिलीमीटरवर आणण्यात येते. साधारण मेच्या सुमाराला जेव्हा ऑल इंग्लड क्लबचा मेम्बर्स डे असतो, तेव्हा ही कोर्टं जवळपास तयार झालेली असतात. मेमध्ये सेंटर कोर्टसह सगळी कोर्टं आखणीचा मेकअप करून तयार असतात. जून महिना उजाडताच या कोर्टना पाणी मर्यादित दिले जाते. जेणेकरून तिसर्‍या आठवड्यात जेव्हा स्पर्धा सुरू होते तेव्हा कोर्टचा पृष्ठभाग टणक झालेला असतो. अशा वर्षभर निगराणी केलेल्या कोर्टचे स्पर्धेच्या सुरुवातीला उद्घाटन होते, ते सेंटर कोर्टवर आधीच्या वर्षीच्या विजेतेवीराच्या सामन्याने. ग्रास कोर्टवर खेळणे ही वेगळीच कला आहे. विम्बल्डनच्या सेंटर कोर्टचे अनेक अनभिषिक्‍त सम्राट आहेत. पुरुष खेळाडूंच्या यादीत सध्याचा सम्राट निर्विवादपणे रॉजर फेडरर आहे, ज्याने 8 वेळा विम्बल्डन जिंकले आहे. पीटसॅम्प्रस 7 वेळा, जोकोव्हिच 6 वेळा, बोर्ग 5 वेळा, मॅकेन्रो आणि बेकर 3 वेळा, तर रॉड लिव्हर, जॉन न्यूकोम्ब, कॉनर्स, एडबर्ग, नदाल आणि मरे दोन वेळा जिंकून या सेंटर कोर्टचे सम्राट बनले होते. सेंटर कोर्टच्या सम्राज्ञीविषयी बोलायचे, तर मार्टिनान वरातिलोव्हा 9 वेळा, सेरेना विल्यम्स आणि स्टेफीग्राफ 7 वेळा, बिली जीन किंग 4 वेळा, व्हीनस विल्यम्स 5 वेळा तर क्रिसएव्हर्ट 3 वेळा या सेंटर कोर्टच्या सम्राज्ञी होत्या. सेंटर कोर्टच्या या शताब्दी सोहळ्याला हे सर्व सेंटर कोर्टचे सम्राट आणि सम्राज्ञी आवर्जून उपस्थित राहिले होते. रॉजर फेडरर तर यंदा दुखापतीमुळे खेळत नसला तरी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिला होता. विम्बल्डनची आणि त्यातून सेंटर कोर्टची महतीच इतकी मोठी आहे.

खेळाडूंनाच नाही, तर टेनिसप्रेमींना सेंटर कोर्टवर सामना बघायची संधी आयुष्यात एकदा जरी मिळाली तरी आयुष्य सार्थकी लागल्यासारखे वाटते. मी जेव्हा पहिल्यांदा सेंटर कोर्टवर सामना बघितला तेव्हा अगदी बेसलाईनच्या वरच्या पहिल्या रांगेत बसायला मिळाल्याने 'आजि म्यां ब्रम्ह पाहिले' अशी अवस्था झाली होती. विम्बल्डन स्पर्धाच नाही, तर त्या स्पर्धेचे तिकीट मिळवणे हाही एक इव्हेन्ट असतो. ज्यांना ऑनलाईन किंवा पब्लिक बॅलटमध्ये तिकिटे मिळत नाहीत, त्यांच्यासाठी तिकीट मिळवणे हा एक मोठा कार्यक्रम असतो कारण ज्या दिवशी विम्बल्डनला हजेरी लावायची आहे, त्याच्या आदल्या रात्री अक्षरश: तंबू ठोकून रात्रपाळी करावी लागते. सेंटर कोर्ट, कोर्ट 1 आणि कोर्ट 2 या महत्त्वाच्या कोर्टची रोज साधारण प्रत्येकी फक्‍त 500 तिकिटे विक्रीला असतात. बाकी ग्राऊंडपास विकायला असतात, ज्यात तुम्ही बाकीच्या कोर्टवरचे सामने बघू शकता. विम्बल्डनला जाऊन सेंटर कोर्टवर सामना न पाहणे म्हणजे अंबाबाईच्या देवळात जाऊन बाकीच्या देवळांचे दर्शन घेण्यासारखे आहे. अशा या विम्बल्डनच्या गाभार्‍याला म्हणजे सेंटर कोर्टला यंदा शंभर वर्षे झाली. इतिहासप्रेमी इंग्लंडमध्ये आठव्या शतकातला पब अजून कार्यरत आहे. पंधराव्या-सोळाव्या शतकातील तर कित्येक वास्तू आजही दिमाखात कार्यरत आहेत. त्यामानाने 'सेंटर कोर्ट' हे तरुणच मानले पाहिजे. परंपरा आणि इतिहास जीवापाड जपणार्‍या इंग्लंडमध्ये सेंटर कोर्टही वयाची अशी अनेक शतके पुरी करेल यात वाद नाही आणि कितीही वर्षे जुने झाले तरी 'सेंटर कोर्ट'चा महिमा तसाच राहील.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT