Latest

रत्नागिरी : बारसू रिफायनरीसाठी स्थानिक अनुकूल

Arun Patil

रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा : राजापूर तालुक्यातील बारसू येथे हरित रिफायनरी प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला प्रकल्प परिसरातील सुमारे 3 हजार एकर जमीन मालकांनी आपली जमीन प्रकल्पाला देण्यासाठी तयारी दर्शवली असून सोमवारी सात-बारासह संमतीपत्रेच एमआयडीसी अधिकारी व जिल्हाधिकारी यांना सादर केल्याने प्रकल्पाचा मार्ग मोकळा होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

बारसू येथे होऊ घातलेल्या हरित रिफायनरीच्या माती व ड्रोन सर्वेक्षणाबाबत ग्रामस्थांमध्ये संभ्रमावस्था दूर करण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल व एमआयडीसीच्या अधिकार्‍यांची बैठक पार पडली. या बैठकीला प्रकल्प परिसरातील अकरा गावातील सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य आदी पदाधिकार्‍यांना निमंत्रित करण्यात आले होते. या पदाधिकार्‍यांनी प्रकल्पाला सहमती दर्शवल्याची माहिती सहमुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. मणिकनेर यांनी दिली. राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्तावित असणार्‍या ग्रीन रिफायनरीच्या ड्रोन व मातीच्या प्री फिजिबिलिटी सर्वेक्षणाला काही नागरिकांनी विरोध केला, मात्र त्यांचा गैरसमज दूर करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

ग्रामस्थांमधील संभ्रम दूर व्हावा यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकार्‍यांच्या विशेष बैठकीचे आयोजन रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. या पदाधिकार्‍यांना प्रकल्पाबाबत मार्गदर्शन करण्यात आले असून बहुतांश पदाधिकार्‍यांनी या प्रकल्पाला सहमती दर्शवल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या बैठकीला एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. मणिकनेर, जिल्हा पोलिस अधिक्षक मोहितकुमार गर्ग, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवी कटकधोंड, आमदार राजन साळवी, उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, माजी जि.प. सदस्य दीपक नागले, माजी प.सं. सदस्य सुभाष गुरव, नाटेतील पं.स. सदस्य उन्नती वाघरे, धोपेश्वर सरपंच दत्ताराम करंबेळकर, उपसरपंच स्नेहा उगले, नाटे सरपंच योगिता बनकर, उपसरपंच पुरुषोत्तम थलेश्री यांच्यासह एकूण अकरा ग्रामपंचायतीमधील सरपंच, उपसरपंच व सदस्य, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे माजी सदस्य उपस्थित होते.

यावेळी एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. मलिकनेर यांनी सर्वेक्षणाबाबत माहिती दिली. या प्रकल्पासाठी सुमारे साडेपाच हजार एकर जमिन आवश्यक आहे. तर ऑईल डेपोसाठी सुमारे अकराशे एकर जमिन अपेक्षित आहे. त्यासाठी ड्रोन व मातीचे प्राथमिक सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षण अहवालानंतरच रिफायनरीचा मार्ग मोकळा होणार आहे. या परिसरातील काही स्थानिक ग्रामस्थांमध्ये अद्याप संभ्रम आहे. तो लवकरच दूर करण्यात येईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

बैठकीवेळी रिफायनरीअंतर्गत येणार्‍या ग्रामपंचायतीतील पाठिंबा देणार्‍या सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांनी विविध मागण्या सादर केल्या. त्याचप्रमाणे रिफायनरीमध्ये प्राधान्याने ग्रामस्थांना रोजगार देण्यात यावा याची मागणी करण्यात आली.

जमीन मालकांच्या भूमिकेचे स्वागत : आ. साळवी

बारसू, धोपेश्वर रिफायनरीसाठी विरोध होत आहे, असे चित्र उभे केले जात असले तरी वस्तूस्थिती तशी नाही. बारसू, धोपेश्वर रिफायनरीसाठी प्रकल्पस्थळातील आमची सुमारे तीन हजार एकर जमीन घ्या, अशी संमतीपत्र जमीन मालकांनी सात-बारासह एमआयडीसी अधिकारी व जिल्हाधिकार्‍यांना सोमवारी सुपूर्द केली. या जमीन मालकांच्या भूमिकेचे आपण स्वागत करतो, असे आ. राजन साळवी म्हणाले. त्याचबरोबर प्रकल्पामध्ये ग्रामस्थांना संपूर्ण सहकार्य मिळेल, अशी ग्वाही एमआयडीसी अधिकार्‍यांनी दिल्याचेही त्यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT