बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा : हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. त्यात शेगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयातील माजी विद्यार्थी जनकराज पखरेतिया भरमौर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. ते आमदार झाल्याचा बुलढाणा जिल्ह्यातील समकालीन वर्गमित्रांना विशेष आनंद झाला आहे.
हिमाचल प्रदेशातील रहिवासी जनकराज पखरेतिया यांनी १९९५-९७ यावर्षी शेगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयात नववी व दहावीचे शिक्षण घेतले होते. पुढचे शिक्षण सरोल (जि.चंबा हिमाचल प्रदेश) येथील नवोदय विद्यालयात झाले. वैद्यकीय शिक्षण घेऊन इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज शिमला येथे न्युरोसर्जरी वरिष्ठ प्रोफेसर म्हणून सेवा देत असतानाच राजकीय क्षेत्राकडे वळलेल्या डॉ. जनकराज यांनी तीन महिन्यांपूर्वी सेवेचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी भरमौर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली.
त्यात काँगेसचे उमेदवार ठाकूर सिंह भरमोरी यांना ४,६०० मतांनी हरवून ते विजयी झाले. डॉ. जनकराज पखरेतिया यांचे मित्र बुलढाणा जिल्ह्यातील अतूल बोंद्रे, गणेश पवार, प्रमोद लहाळे, शंकर शिंदे, विजय सरकटे, दीपक कांबळे, गजानन राऊत, संदिपान कराटे आदी विविध क्षेत्रात मोठ्या हुद्द्यावर आहेत. आपला मित्र हिमाचलमध्ये आमदार झाल्यामुळे या सर्वांच्याच आनंदाला उधाण आले आहे.
हेही वाचा :