Latest

बहार-विशेष :  चेहरा वेगळा, मुखवटा तोच

अमृता चौगुले

'आपण मित्र निवडू शकतो, पण आपल्याला शेजारी निवडण्याचा अधिकार नसतो.' भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे हे विधान आजही तंतोतंत लागू पडते. याचे कारण म्हणजे आपला सख्खा शेजारी पाकिस्तान. गेल्या महिनाभरात पाकिस्तानमध्ये घडलेल्या घडामोडी भारतासाठी जेवढ्या धोकादायक तेवढ्याच चिंताजनक म्हटल्या पाहिजेत. इम्रान खान यांचे सरकार जाऊन तेथे आता शाहबाज शरीफ पंतप्रधान बनले आहेत.

'राव गेले, पंत चढले' असेच त्याचे वर्णन करावे लागेल. पाकिस्तानचे खरे सत्ताधीश कोण? याचे सदासर्वकाळ उत्तर म्हणजे लष्कर. लष्कराच्या इशार्‍यावरच त्या देशात लोकशाहीचा मुखवटा उभा केला गेला आहे. इम्रान खान यांनी नया पाकिस्तानची हाक देऊन 18 ऑगस्ट 2018 रोजी सरकार स्थापन केले आणि 10 एप्रिल 2022 रोजी त्यांना अविश्वास ठराव संमत झाल्यामुळे पायउतार व्हावे लागले. म्हणजेच 3 वर्षे, 7 महिने ते सत्तेवर होते. नवाझ शरीफ यांना शह देण्याच्या हेतूने लष्करानेच इम्रान खान यांना सत्तेवर बसवले. मात्र, नंतर इम्रान खान यांनीही लष्कराला आपले रंग दाखवायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांची गच्छंती झाली. अविश्वास ठराव मंजूर होऊन सत्ताच्युत होणारे ते पाकिस्तानचे पहिलेच पंतप्रधान ठरले. त्यांनी सत्तेवर आल्यानंतर लष्करासह सगळ्यांशीच वैर पत्करले. नया पाकिस्तान साकारायचा, तर त्यासाठी लागणारा पायाशुद्ध अग्रक्रम त्यांना ठरवता आला नाही.

खेरीज आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या विधायक प्रेरणाही त्यांना रुजवता आल्या नाहीत. क्रिकेटपटू म्हणून ते भलेही अव्वल असतील. पण, राजकीय नेते म्हणून त्यांचा वकुब अतिसामान्यच राहिला. येथे हेही लक्षात घेतले पाहिजे की, पाकिस्तानची निर्मिती 1947 झाली तेव्हापासून तिथे एकाही पंतप्रधानाला आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. खरे तर पाकिस्तान हा दक्षिण आशियातील एक भुकेकंगाल देश आहे. तरीदेखील त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण भू-राजकीय स्थानामुळे आणि जगातील तो एकमेव अण्वस्त्रधारी मुस्लिम देश असल्यामुळे तिथल्या राजकीय घडामोडींकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असते. या देशाच्या पूर्वेला आपला भारत, वायव्येला अफगाणिस्तान, नैऋत्येला इराण, तर ईशान्येला चीन आहे. पाकच्या उत्तरेचा ताजिकिस्तान त्या देशाला वाखानच्या भूभागाने जोडला गेला आहे.

पाकिस्तानच्या दक्षिणेला अरबी समुद्र आणि ओमानाचे आखात असून, त्या देशाला 1046 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. पाकिस्तान देश ओमानशी सागरी सरहद्दीने जोडला गेला आहे. म्हणजेच, हा देश भौगोलिकद़ृष्ट्या दक्षिण आशिया आणि मध्यपूर्व आशिया यांच्यातील महत्त्वपूर्ण दुवा होय. हे एकदा समजावून घेतले म्हणजे पाकिस्तानातील घडामोडींवर संपूर्ण जगाचे लक्ष का असते, याचा उलगडा होऊ शकतो.

एका माळेचे मणी

पाकिस्तानात आता नवे सरकार स्थापन झाले असले; तरी त्यामुळे त्यांचा भारताबद्दलचा द़ृष्टिकोन बदलेल, अशी भाबडी आशा ठेवण्यात अर्थ नाही. कारण, सत्तेवर येत असतानाच तिथले नवे वझीर-ए-आझम म्हणजेच पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी काश्मीरचे तुणतुणे जोरकसपणे वाजवले आहे. 'शितावरून भाताची परीक्षा' या उक्तीनुसार या गृहस्थांची आगामी वाटचाल कशी असेल, याची कल्पना यायला हरकत नाही. शाहबाज हे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे बंधू होत. त्यांनी यापूर्वी तीनदा पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे मुख्यमंत्रिपद भूषवले आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले आहेत. तसे ते नवाझ शरीफ यांच्यावरही झाले आहेत. पनामा पेपर्स जेव्हा उजेडात आले तेव्हा नवाझ शरीफ यांना तिथल्या न्यायालयाने पंतप्रधान पदावरून बडतर्फ केले आणि तुरुंगवासाची शिक्षादेखील सुनावली. मात्र नंतर तब्येतीच्या कारणास्तव त्यांना लंडनमध्ये उपचार घेण्याची अनुमती देण्यात आली व तेव्हापासून नवाझ शरीफ हे लंडनमध्येच आहेत.

नवाझ शरीफ यांनी मात्र, भारताशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी थोडेफार प्रयत्न केले होते. मात्र, त्यांना त्याची किंमत चुकवावी लागली. कारण, लष्कराने लगेच त्यांना त्यांची जागा दाखवून देताना आपले माप इम्रान खान यांच्या पारड्यात घातले होते. सांगण्याचा मुद्दा असा की, भारताशी सहकार्य वा उत्तम संबंध राखण्याचा साधा प्रयत्नदेखील तिथल्या राज्यप्रमुखाच्या अंगलट येऊ शकतो. जसे की, आपली सत्ता जाणार याची कल्पना येताच इम्रान खान यांनी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात भारताचे तोंड फाटेपर्यंत कौतुक केले होते. त्यामुळेच मरियम नवाझ यांनी (शाहबाज यांची पुतणी आणि नवाझ शरीफ यांची कन्या) 'तुम्हाला भारताचा एवढा पुळका आला असेल, तर तिकडेच जाऊन स्थायिक व्हा.' असे खडे बोल इम्रान खान यांना सुनावले होते.

पाकिस्तान मुस्लिम लीग नवाझ गटाच्या मरियम या तालेवार नेत्या आहेत. भारताशी शत्रुत्व हेच पाकिस्तानातील कोणत्याही राजकीय नेत्याचे मुख्य भांडवल असते. त्यामुळेच तारस्वरात भारतविरोधी गरळ ओकण्याला त्यांना पर्याय नसतो. भारताकडून सातत्याने युद्धात मार खाऊनही पाकिस्तानची गुर्मी कायम आहे. यालाच म्हणतात 'सुंभ जळाला तरी पीळ कायम.' शाहबाज शरीफ यांच्याकडून वेगळी अपेक्षा करण्यात अर्थ नाही, याचे कारण आपल्याला पाकिस्तानच्या या किडलेल्या व्यवस्थेत सापडते. मुळात स्वातंत्र्याच्या वेळी दोन्ही देशांतील संबंधांमध्ये ज्या मूलभूत समस्या निर्माण झाल्या होत्या, त्या आजही कायम आहेत. इम्रान खान असोत, नवाझ शरीफ असोत किंवा आता शाहबाज शरीफ. हे सगळे भारतासाठी वेगळे चेहरे असले, तरी त्यांची भारताबाबतची नियत सारखीच राहिली आहे. शाहबाज शरीफ यांनीही सिंहासनावर आरूढ होताना, त्यांनी पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांप्रमाणेच काश्मीरच्या मुद्द्यावरून आपली मळमळ व्यक्त केली आहे.

'मला भारतासोबत शांतता हवी आहे, पण काश्मीरचा प्रश्न आधी सोडवावा लागेल.' अशी मुक्ताफळे त्यांनी उधळली आहेत. वास्तविक, काश्मीर ही भारताची अंतर्गत बाब आहे. पाकिस्तानचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, अशी भारताची सुस्पष्ट भूमिका आहे. जागतिक पातळीवर या भूमिकेला मान्यताही मिळालेली आहे. पाकिस्तान वगळता अन्य कोणत्याही देशाने त्यावर फारशी खळखळ केलेली नाही. शिवाय कोणत्याही प्रकारची चर्चा करायची असेल, तर पाकिस्तानला आधी सरकारी पाठबळ असलेल्या दहशतवादाचा नायनाट करावा लागेल. तिथेच तर 'घोडे पेंड खाते.' कारण असे करणे पाकिस्तानसाठी केवळ अशक्य आहे. जागतिक दहशतवादाचे उगमस्थान म्हणूनच पाकिस्तानकडे पाहिले जाते. शाहबाज शरीफ हे वैयक्तिक पातळीवर शांतताप्रिय व्यक्ती आहेत, असे मानले तरी, पाकिस्तानमध्ये लष्कराची भीती बाळगणे ही प्रत्येक राजकीय पक्षाची अगतिकता आहे. काश्मीरप्रश्न नेहमी धगधगत ठेवणे आपले परमकर्तव्य आहे, असे तिथले लष्कर मानत आले आहे. शिवाय असे केल्यामुळे पाकिस्तानच्या वार्षिक बजेटमधून लष्कराला वर्षानुवर्षे अफाट पैसा मिळत आला आहे. भारतासोबतचे ताणले गेलेले संबंध हाच पाकिस्तानी लष्कराच्या अस्तित्वाचा मुख्य आणि एकमेव आधार आहे.

काळवंडलेली कारकीर्द

पाकिस्तानी लष्कर आपले अस्तित्व टिकवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते, हे यापूर्वी अनेकदा सिद्ध झाले आहे. निवडून आलेले पंतप्रधान किंवा सरकार हा आंतरराष्ट्रीय समुदायाला दाखवण्यासाठीचा एक मुखवटा आहेत. त्यांचा पक्ष आणि मोठा भाऊ नवाझ शरीफ यांचे लष्कराशी असलेले संबंधही खूप कटू राहिले आहेत. अशा परिस्थितीत लष्कराशी चांगले संबंध ठेवणे ही त्यांची हतबलता आहे. त्यामुळे शाहबाज शरीफ यांच्या कार्यकाळात काही वेगळे घडेल, असे वाटत नाही. निदान भारताच्या द़ृष्टिकोनातून तरी नाही. शाहबाज शरीफ, पाकिस्तान पीपल्स पार्टीचे आसिफ अली झरदारी आणि बिलावल भुट्टो, जमियत उलेमा-ए-फजलचे प्रमुख मौलाना फजलुर रहमान ही सगळी मंडळी वादग्रस्त आहेत. भारताबद्दलचे त्यांचे विचारही पूर्वग्रहदूषित आहेत. शाहबाज शरीफ यांच्याबद्दल त्याबाबतची कितीतरी उदाहरणे देता येतील.

हे गृहस्थ जेव्हा पाकिस्तानात पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी दहशतवादी हाफिज सईदच्या जमात-उल-दावा या दहशतवादी संघटनेला कोट्यवधी रुपये दिले होते. ही भारतासाठी चिंतेची बाब होय. हाफिज सईद हा 2008 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचे केव्हाच स्पष्ट झाले आहे. जून 2013 मध्ये मुख्यमंत्री असताना शाहबाज शरीफ यांनी हाफिज सईदच्या दहशतवादी संघटनेला सरकारी तिजोरीतून सुमारे 6 कोटी रुपये दिले होते. हा पैसा जमात-उल-दावाचे सर्वांत मोठे केंद्र असलेल्या मरकज-ए-तैयबासाठी देण्यात आला होता. शाहबाज शरीफ आणि हाफिज सईद यांचे संबंध मैत्रीपूर्ण असल्याचे मानले जाते. सध्या हाफिज सईद दहशतवाद फैलावल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या कोट लखपत तुरुंगात 36 वर्षांची शिक्षा भोगत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याला आणखी दोन खटल्यांमध्ये 31 वर्षांची शिक्षा झाली आहे. आता शाहबाज शरीफ पंतप्रधान झाल्यानंतर हाफिज सईद तुरुंगातच राहणार की त्याला अभय मिळणार, हा भारताच्या द़ृष्टीने चिंतेचा विषय ठरणार आहे. कारण सईद याने सातत्याने भारताविरोधात विघातक कारवाया करण्याचा सपाटा लावला होता.

शिक्षा हा वरवरचा देखावा

हाफिज सईद याला ठोठावण्यात आलेली शिक्षा हासुद्धा केवळ देखावा असल्याचे लपून राहिलेेले नाही. त्यामागचे कारण म्हणजे फायनान्सिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्सचा दणका. या संस्थेने पाकिस्तानला जून 2018 मध्येच ग्रे लिस्ट अर्थात करड्या यादीत टाकले आहे. दहशतवाद पोसणे आणि त्यासाठी पैसा खर्च करणे याच्याशी संबंधित कारवायांवर या संस्थेची कडक
नजर असते. पाकिस्तानचे नशीब बलवत्तर म्हणून या संस्थेने अजून त्या देशाला काळ्या यादीत टाकलेले नाही.
ऑक्टोबर 2018, 2019, 2020, एप्रिल आणि ऑक्टोबर 2021 मध्ये झालेल्या आढावा बैठकांतही पाकिस्तानला काडीचाही दिलासा मिळालेला नाही. आता नव्या सरकारला यंदाच्या जूनमध्ये पुन्हा एकदा एफएटीएफचा सामना करावा लागणार आहे. एफएटीएफने ग्रे लिस्टमध्ये टाकल्यामुळे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक यांसारख्या संस्थांकडून कर्जे घेण्यावर आपोआपच मर्यादा येत आहेत. त्यामुळे या ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानची वळवळ सुरू आहे. ते करायचे, तर अहोरात्र चालणारा दहशतवादाचा कारखाना त्या देशाला बंद करावा लागेल. ते सुतराम शक्य नाही.

'धरले तर चावतेय आणि सोडले तर पळतेय' अशी पाकिस्तानची अवस्था झाली आहे. हे कमी म्हणून की काय, 'मूडीज' या न्यू यॉर्कस्थित जागतिक पत मापन संस्थेने पाकिस्तानच्या आर्थिक परिस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पुढील दोन महिने विविध वस्तू आयात करता येतील एवढाच परकीय चलनसाठा पाकिस्तानच्या गंगाजळीत आहे. ढासळलेली आर्थिक परिस्थिती, गगनाला भिडलेली महागाई आणि अफाट चलन फुगवटा ही पाकिस्तानपुढील सध्याची आव्हाने आहेत. त्यांच्याशी भिडायचे, तर लष्करावरील खर्चाला कात्री लावावी लागेल. शिवाय आर्थिक शिस्त पाळावी लागेल. शाहबाज शरीफ यांना या गोष्टी कितपत जमतील याबद्दल शंकाच आहे. त्यापेक्षा भारताची भीती सामान्य जनतेला दाखवणे, लष्करापुढे नमते घेणे आणि सुखाने राज्य करणे, हे केव्हाही श्रेयस्कर. दुसरे असे की, शाहबाज शरीफ हेही किती काळ सत्तेवर राहतील याबद्दल शंकाच आहे. कारण, पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि शरीफ यांचा मुस्लिम लीग हे राजकारणात परस्परांचे कट्टर वैरी आहेत.

'नव्याचे नऊ दिवस' या उक्तीनुसार काही काळ सरकार चालवण्यासाठी ही 'विळ्याभोपळ्याची मोट' बांधली जाईलही. तथापि, त्यावरील नवतेचा वर्ख उडून गेल्यावर पुन्हा या सरकारातही लठ्ठालठ्ठी सुरू होऊ शकते. त्यामुळे 'सावध ऐका पुढल्या हाका' या उक्तीनुसार भारताला पाकिस्तानातील घडामोडींवर बारीक नजर ठेवूनच पुढील वाटचाल करावी लागणार आहे. एरवी पाकिस्तानसारख्या दरिद्री देशाची फार दखल घ्यायची गरज नाही. तथापि, त्या देशाने अनेक लबाड्या आणि भानगडी करून अण्वस्त्रे तयार केली आहेत. जगाला बेचिराख करून टाकणारी ही अस्त्रे उद्या एखाद्या दहशतवादी संघटनेच्या हाती पडली, तर त्यातून सर्वांत पहिला धोका भारताला असू शकतो.

पंतप्रधानपदी निवड होताच शाहबाज शरीफ यांनी, चीन हा पाकिस्तानच्या सुख-दुःखाचा खरा भागीदार असल्याचे प्रतिपादन केले आहे. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरवर वेगाने काम करण्याच्या गरजेवर त्यांनी विशेष भर देण्याचे सूतोवाच केले आहे. चीन-पाकिस्तान कॉरिडॉरबाबत भारताने आधीच आपले विचार स्पष्ट केले आहेत. अशा परिस्थितीत शाहबाज शरीफ यांनी चीनची तळी उचलून भारताच्या जखमेवर मीठ चोळायला सुरुवात केली आहे. दुसरे म्हणजे शाहबाज हे राजकारणात नवखे नाहीत. त्यांच्या एकूण वक्तव्यांवरून असे दिसून येते की, भारत-पाकिस्तानबाबतची परिस्थिती जैसे थे राहील. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध लवकर सुधारण्याची चिन्हे नाहीत. एकीकडे 'चीन' आणि दुसरीकडे 'पाकिस्तान' हे आपल्या देशासाठी 'राहू' आणि 'केतू' ठरले आहेत. त्यामुळे काळाची पावले ओळखून भारताला पूर्वीप्रमाणेच आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानला एकाकी पाडण्याच्या रणनीतीवर काम करावे लागणार आहे. गेल्या काही वर्षांत पाकिस्तानशी व्यवहार करण्याची ही पद्धत अत्यंत प्रभावी ठरली आहे. त्याच मार्गाने भारताला भविष्यातील वाटचाल करावी लागेल. पाकिस्तानातील सत्तांतराचा हाच अन्वयार्थ आहे.

पाकिस्तानात आता शाहबाज शरीफ यांचे नवे सरकार स्थापन झाले असले; तरी त्यामुळे भारताबद्दलचा द़ृष्टिकोन बदलेल, अशी भाबडी आशा बाळगण्यात अर्थ नाही. कारण, सत्तेवर येत असतानाच नव्या पंतप्रधानांनी काश्मीरचे तुणतुणे जोरकसपणे वाजवले आहे. त्यावरून भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध लवकर सुधारण्याची चिन्हे नाहीत. एकीकडे चीन आणि दुसरीकडे पाकिस्तान हे आपल्या देशासाठी राहू आणि केतू ठरले आहेत. काळाची पावले ओळखून भारताला आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानला एकाकी पाडण्याच्या रणनीतीवर काम करावे लागेल.

डॉ. योगेश प्र. जाधव 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT