Latest

नाशिकमध्ये सीसीटीव्ही बाबत महत्वाचा निर्णय ; ‘या’ ठिकाणी असणार कॅमेर्‍यांचा वॉच

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहराची सुरक्षितता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नाशिक शहरासह विविध महत्त्वाची कार्यालये आणि पाण्याच्या टाक्यांच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून, त्याची सुरुवात महाआयटीमार्फत मनपाच्या राजीव गांधी भवन या मुख्यालयापासून झाली आहे. त्याचबरोबर मनपाच्या विभागीय कार्यालयांसह 121 जलकुंभांच्या ठिकाणी कॅमेर्‍यांचा वॉच राहणार आहे.

नाशिक शहरात तीन-साडेतीन वर्षांपासून कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, निधीच्या नावाखाली कॅमेरे बसविण्याचे काम मिळालेल्या महाआयटीकडून कानाडोळा केला जात होता. याबाबत राज्य शासनाने महाआयटी कंपनीची कानउघाडणी केल्यानंतर अखेर मनपा मुख्यालय राजीव गांधी भवनापासून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास सुरुवात झाली. 'भयमुक्त नाशिकसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची घोषणा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून शहरभर कॅमेरे बसविण्याचा तसेच स्मार्ट सिटीच्या कार्यालयात कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटरची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी महाआयटीला कंत्राट देण्यात आले होते. परंतु, निधी मिळत नसल्याचे कारण पुढे करत कॅमेरे बसविण्यास महाआयटीकडून विलंब केल जात होता. 47 कोटींचा उर्वरित निधी प्राप्त झाल्यानंतरच कॅमेरे बसविण्याचे काम सुरू करण्याचे महाआयटीने स्मार्ट सिटी कंपनीला कळविले होते. यासंदर्भात शासनापर्यंत तक्रारी गेल्यानंतर मुंबईत प्रधान सचिवांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत तोडगा काढण्यात आला. त्यानंतर मंगळवारी (दि.14) महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनच्या प्रवेशद्वारासमोर सीसीटीव्ही कॅमेरा बसवून या कामाला सुरुवात करण्यात आली.

पुन्हा रस्ते खोदण्याची वेळ
पहिल्या टप्प्यात महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणासह विभागीय कार्यालये, जलकुंभांच्या ठिकाणी 121 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे कंपनीमार्फत सांगण्यात आले. शहरातील 40 सिग्नल्सवर सीसीकॅमेरे बसविण्यात येणार असून, केबल टाकण्यासाठी पुन्हा रस्ते खोदावे लागणार आहेत. आधीच मनपाच्या रस्त्यांची एमएनजीएल कंपनीने वाट लावली आहे. त्यात पुन्हा रस्ते खोदावे लागणार आणि त्यात आता पावसाळा सुरू झाल्याने त्या पार्श्वभूमीवर रस्ते खोदणे उचित ठरेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्मार्ट कंपनीने आयुक्तांकडे रस्ते खोदण्याची परवानगी मागितली आहे. त्यावर आता आयुक्त काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT