Latest

देशातील पहिल्या वॉटरटॅक्सीचा मान नवी मुंबईला

Arun Patil

नवी मुंबई ; पुढारी वृतसेवा : देशात पहिली रेल्वेसेवा मुंबई-ठाणे दरम्यान सुरू झाली. त्यानंतर देशात त्याचे जाळे विस्तारले. मुंबईतून सुरू होणार्‍या सुविधांचा प्रसार आणि अनुकरण संपूर्ण देशात होते हे आजवर दिसून आले आहे. आज देशातील पहिल्या वॉटर टॅक्सी सेवेचा शुभारंभही नवी मुंबईतून होत आहे, याचा अभिमान असल्याचे गौरवोद‍्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी बेलापूर जेट्टी आणि बेलापूर-मुंबई वॉटर टॅक्सीसेवेच्या उद्घाटन प्रसंगी काढले. दरम्यान दोन-तीन वर्षांत समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करणार असून हा क्रांतिकारक टप्पा असेल, असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत बेलापूर येथून सुरू करण्यात आलेल्या वॉटर टॅक्सीचा आणि बेलापूर जेट्टीच्या उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्री आणि केंद्रीय बंदरे, व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार,ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, बंदरे विकास मंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खा. राजन विचारे, आ. रवींद्र फाटक, आ. मंदा म्हात्रे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा, मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह वरिष्ठ शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र सागरी मंडळाला (महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड) 25 वर्षे पूर्ण झाल्याने त्यांच्या कार्याचा आढावा घेणार्‍या चित्रप्रदर्शनाचे, तिकीट काऊंटरचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, नवी मुंबई विमानतळासोबतच नवी मुंबई स्पोर्ट्स सिटी म्हणून विकसित होत आहे. त्यामुळे येथे पायाभूत सुविधांचा राज्य शासनामार्फत विकास केला जात आहे. गुंतवणूक करताना उद्योजक पायाभूत सुविधांचा विचार करतात, त्यादृष्टीनेही या सर्व कामांना वेगळे महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रसंगी धाडसी निर्णय घेऊ : अजित पवार

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, गेट वे ऑफ इंडियाजवळ केंद्र शासनातर्फे आणखी एक प्रकल्प प्रस्तावित आहे. तो लवकर सुरू व्हावा, यासाठी सर्व मिळून प्रयत्न करू. नागरिकांना नवनवीन सुविधा देणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रसंगी धाडसी निर्णय घ्यावे लागतील. एमएमआर क्षेत्राला लागून खाडी आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई,जेएनपीटी, मिरा-भाईंदर तसेच कल्याण या ठिकाणी जलवाहतुकीला चालना देऊन या सुविधेचा लाभ घेता आला पाहिजे.

नगरविकास मंत्री शिंदे म्हणाले, या सेवेमुळे ठाणे, कल्याण, नवी मुंबईकरांना जलवाहतूक सेवा उपलब्ध झाली तर रस्त्यावरची वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. ठाणे-मुंबई सेवाही लवकरच सुरू होईल.

केंद्रीय नौवहन मंत्रालयाकडून राज्यात 131 प्रकल्प

सागरकिनारपट्टी जिल्ह्यात सागरमाला प्रकल्पांतर्गत विविध पायाभूत सुविधांचे काम सुरू आहे. त्यातून सागरतटीय जिल्ह्यांतील लोकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न आहे. रोजगारनिर्मिती करून आर्थिक विकासाचे चक्र गतिमान करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोरोना काळातही बेलापूर जेट्टीचे काम सुरू राहिले. नवी मुंबई ते दक्षिण मुंबईला जोडणार्‍या या जलवाहतूक सेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचण्यास मदत होईल. रस्त्यावरची वाहतूक कोंडी कमी होईल.

याशिवाय, आणखी काही जेट्टी मुंबई हार्बर भागात प्रस्तावित आहेत. केंद्रीय नौवहन मंत्रालयाकडून बंदर विकास, मत्स्यव्यवसाय विकास, जेट्टीचे निर्माण, कौशल्य विकास अशा विविध प्रकल्पांवर काम सुरू आहे. 1.05 लाख कोटींचे 131 प्रकल्प महाराष्ट्रासाठी निश्चित करण्यात आले आहेत. त्यात सागरमाला कार्यक्रमांतर्गत 46 प्रकल्पांस 278 कोटींचे वित्तीय सहाय्य देण्यात येईल.तसेच ससून डॉकसह सिंधुदुर्ग आणि रायगडच्या बंदरांच्या आधुनिकीकरणासाठी काम सुरू असल्याचे केंद्रीय मंत्री सोनोवाल यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT