Latest

ड्रोन टेक्नॉलॉजीमध्ये करा करिअर

Arun Patil

आजघडीला शेतीत औषधांची फवारणी करण्यापासून लग्न समारंभात फोटो, शूटिंग ते हवाई हल्ले करण्यापर्यंत ड्रोनची व्याप्ती वाढली आहे. अशा ड्रोन तंत्रज्ञानासंबंधी माहिती जाणून घेऊ…

ड्रोन म्हणजे रिमोटने चालणारे लहान विमान. ड्रोनचा अर्थ आहे नर मधमाशी. हा विमानासारखा असतानाही विमान नसतो. हा उडणारा रोबो असतो. सामान्यपणे देखरेख करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जातो आणि त्याची रेंज शंभर किलोमीटरपर्यंत असते. जीपीएस सिस्टीमच्या माध्यमातून काम करणार्‍या ड्रोनची कार्यक्षमता वेगवेगळी असते.

भारतात ड्रोन टेक्नॉलॉजीचा बाजार वेगाने वाढत चालला आहे. 2023 पर्यंत भारतातील ड्रोनचा बाजार हा सुमारे 18 टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज वर्तविला आहे. यात अनेक कंपन्या गुंतवणूक करत आहेत. आगामी काळात एक लाखाहून अधिक रोजगारांची निर्मिती होऊ शकते.

औद्यागिक संघटना 'फिक्की'च्या अहवालानुसार, येत्या चार-पाच वर्षांत ड्रोनशी निगडित एक लाख नोकर्‍या तयार होतील. त्याचे क्षेत्र एरियल फोटोग्राफी, सिनेमेटोग्राफी, शेती, थ्री-डी मॉडेलिंग, आर्टिफिशियल इंटिलिजन्स आणि मॅन्युफॅक्चरिंग असणार आहे. आगामी काळात भारत हा जगातील सर्वात मोठा ड्रोनचा आयातदार देश होण्याची शक्यता आहे. ड्रोन टेक्नॉलॉजी क्षेत्रात कमी कौशल्यापासून ते उच्च कौशल्य बाळगणार्‍या युवकांची गरज भासणार आहे.

ड्रोनचा उपयोग

ड्रोनचा उपयोग अनेक कामांसाठी केला जातो. शहरात जमिनींचे सर्वेक्षण करणे, जंगल आणि वन्यजीवांची देखरेख, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गर्दीवर लक्ष ठेवणे, सीमेची देखरेख, रस्त्याचे सर्वेक्षण, उंच टॉवर आणि भुयारी मार्गाचे सर्वेक्षण आदींसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

शेतीत होणारी बचत

* ड्रोनचा उपयोग हा पिकांचे योग्य आकलन करण्याबरोबरच कोणत्या ठिकाणी किती पाणी आहे, खत, कीटकनाशकांची गरज आहे, याचा अचूक अंदाज बांधण्यासाठी केला जातो.

* पिकांचे योग्य आकलन केल्याने शेतकर्‍यांना औषधांची अचूक फवारणी करण्यासाठी मदत मिळेल. या आधारावर शेती उत्पन्न वाढण्यास मदत मिळेल. तसेच खर्चातही 85 टक्के कपात येईल.

कायदा आणि सुव्यवस्था

* अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी देशातील मोठ्या महानगरात मोर्चा, आंदोेेेलने, मिरवणूक यावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा उपयोग होतो.

* त्याचबरोबर वाहतूक नियंत्रणासाठी देखील ड्रोनचा उपयोग केला जातो.

* दंगल आणि हिंसाचाराच्या काळातही स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची मदत घेतली जाते. अनेक राज्यांत त्याचा यशस्वीपणे वापर केला आहे.

ड्रोनचे प्रशिक्षण

* मानवरहित प्रणाली वेगळी नसते. मात्र, नियंत्रण कक्षातून ड्रोनला काळजीपूर्वक हाताळावे लागते. यासाठी दक्ष लोकांची गरज असते.

* देशात सुमारे 40 हजार ड्रोन आहेत. त्यास प्रशिक्षित वैमानिक वहन करत आहेत. त्यांना दरमहा 30 ते 40 हजार वेतन मिळते.

* अनेक महाविद्यालयांत मानवरहित प्रणालीत किंवा उड्डाण प्रशिक्षण शिबिरात ड्रोनचाही समावेश केला आहे.

* ड्रोन पायलट किंवा सिस्टीम इंजिनिअरसारखे विशेष प्रशिक्षण पूर्ण करणार्‍या युवकांना रोजगार मिळणे किंवा स्वत:चा उद्योग करणे सोपे आहे.

* भारतात ड्रोन पायलटचे वय 18 पेक्षा कमी असू नये आणि एखाद्या वैमानिकाप्रमाणे त्यांना प्रशिक्षण देणे आणि परवाना देणे गरजेचे आहे.

अपर्णा देवकर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT