Latest

जोतिबा डोंगर : पाडव्याच्या मुहूर्तावर पहिली मानाची सासनकाठी जोतिबावर

Arun Patil

जोतिबा डोंगर ; पुढारी वृत्तसेवा : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शनिवारी जोतिबा डोंगरावर मानाच्या पहिल्या सासनकाठीचे आगमन झाले. या सासनकाठीसह जोतिबा परिसरातील सासनकाठ्या दिमाखात उभ्या करण्यात आल्या. श्रींची राजेशाही थाटातील सरदारी सालंकृत आकर्षक महापूजा बांधण्यात आली. यावेळी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती.

गेली दोन वर्षे कोरोनामुळे चैत्र यात्रा रद्द केली होती. त्यामुळे जोतिबा डोंगरावर सासनकाठी आणण्यास प्रशासनाने बंदी घातली होती. यंदा चैत्र यात्रेला प्रशासनाने परवानगी दिल्यामुळे भाविकांमध्ये उत्साह आहे.

शनिवारी सकाळी अकरा वाजता 'जोतिबाच्या नावानं चांगभलं'च्या गजरात निगवे दुमाला (ता. करवीर) येथील हिम्मतबहाद्दूर चव्हाण यांची मानाची सासनकाठी डोंगरावर दाखल झाली. भाविकांनी मंदिराभोवती प्रदक्षिणा काढल्यानंतर सासनकाठी सदरेजवळ उभी केली.

यावेळी संग्रामसिंह चव्हाण, रणजितसिंह चव्हाण, रणवीरसिंह चव्हाण, सरपंच राधा बुणे, देवस्थान समितीचे व्यवस्थापक दीपक म्हेतर यांच्यासह पुजारी व ग्रामस्थ उपस्थित होते. दुपारी 12 वाजता तोफेच्या सलामीने नवीन पंचांगाचे जोतिबाच्या मुख्य पुजार्‍यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. ग्रामोपाध्ये केरबा उपाध्ये यांनी पंचांग वाचन केले.
12 एप्रिलपासून डोंगरावर चैत्र यात्रेसाठी भाविक येण्यास सुरुवात होतील. 16 एप्रिल हा यात्रेचा मुख्य दिवस आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT