जिल्हा परिषद कोल्हापूर : बूट, टाय आणि आकर्षित करणारे रंगीत गणवेश, रंगरंगोटी केलेल्या उंच इमारती, बागबगीचा यामुळे खासगी शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये मुलांना घालण्याकडे पालकांचा कल वाढत असल्यानेे जिल्हा परिषद, महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्या शाळांमधील मुलांची संख्या कमी होताना दिसत आहे. मात्र, यावर्षी जिल्हा परिषद शाळांना 'अच्छे दिन' आले आहेत. यावर्षी जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या 7 हजार 118 ने वाढली आहे.
कोरोनामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांनादेखील शक्य आहे त्याठिकाणी ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो. डिजिटल शाळांमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद आघाडीवर आहे. तरीही दुर्गम व डोंगराळ भागात अजूनही रेंज उपलब्ध होत नसल्याने काही शाळांमधील मुलांचे शिक्षण बंदच आहे.
गुणवत्तेत अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूर जि.प.च्या शाळा पुढे आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत अजूनही कोल्हापूर जिल्हा परिषदेतील शाळांतील मुलांची संख्या अधिक असते. जिल्हा परिषदेच्या काही शाळांमधील शिक्षक विविध उपक्रम राबवितात, शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी जादा तास घेतात. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा जि.प.शाळांवर विश्वास आहे. जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीनेही विशेष उपक्रम राबविले जातात. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या वाढली आहे. करवीर तालुक्यात सर्वाधिक 1790 पटसंख्या वाढली आहे. आजरा तालुक्यातील पटसंख्या मात्र गेल्या वर्षीपेक्षा 67 ने कमी झाली आहे.
तालुकानिहाय वाढलेली पटसंख्या
तालुका पटसंख्या
भुदरगड 236
चंदगड 460
गडहिंग्लज 295
गगनबावडा 41
हातकणंगले 1091
कागल 706
करवीर 1790
पन्हाळा 647
राधानगरी 185
शाहूवाडी 559
शिरोळ 1175