Latest

गोवा : तब्बल 37 वर्षांनी घरात पेटले दिवे

दिनेश चोरगे

शिवोली , पुढारी वृत्तसेवा :  संपूर्ण गाव लख्ख विजेच्या प्रकाशात वावरत असताना सडये शिवोली येथील एक कुटुंब गेली 37 वर्षे काळोखातच वावरत होते. अनेक जणांकडे विनंती केली, याचना केली. पण, कोणीच काहीच केले नाही. अखेर माजी सरपंच नीलेश वायंगणकर पुढे सरसावले व 37 वर्षांनंतर त्यांच्या घरात दिवे पेटले.

सडये येथे तेरेझा फर्नांडिस व आलेक्स फर्नांडिस हे दाम्पत्य राहते. घर कौलारू. वीज जोडणी द्यावी, म्हणून अनेक जणांकडे याचना केली. पण, वीज काही मिळाली नाही. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी आश्वासने मिळाली. पण, प्रत्यक्षात काहीच झाले नाही, असे तेरेझा फर्नांडिस म्हणतात. अखेर नीलेश वायंगणकर यांनी पुढाकार घेतल्याने वीज मिळाल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले.

आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा या योजनेचा फायदा मिळवून वीज पुरवठा केल्याचे नीलेश वायंगणकर यांनी स्पष्ट केले. या योजनेअंतर्गत कोणीही पाणी व विजेशिवाय वंचित राहू नये, यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. याचाच फायदा घेत स्वयंपूर्ण मित्रांकडून नाहरकत दाखला घेतला.

वीज खात्यानेही पूर्ण सहकार्य केल्यानेच फर्नांडिस कुटुंबाला 37 वर्षांनंतर वीजपुरवठा करणे शक्य झाल्याचे वायंगणकर यांनी स्पष्ट केले. या कामात उपसरपंच विशाखा गोलतेकर व पंच सदस्य अँथनी डिसोझा यांनीही सहकार्य केले. सांजाव उत्सवाच्या दिवशी घरात दिवे पेटल्याने कुटुंबीयांनी सर्वांचे आभार मानले. फादर पीटर सायमन मास्करेनस हे सुद्धा यावेळी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT