Latest

कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस सह चार एक्स्प्रेस गाड्या कायमच्या बंद होणार

Arun Patil

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेससह कोल्हापुरातून सुटणार्‍या चार एक्स्प्रेस गाड्या कायमच्या बंद होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. कोल्हापूर व मिरज येथून सुटणार्‍या पाच पॅसेंजर गाड्या एक्स्प्रेस म्हणून धावणार आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा मात्र रेल्वेकडून अद्याप करण्यात आलेली नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च 2020 पासून देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यावेळी संपूर्ण रेल्वे सेवाही बंद करण्यात आली. काही महिन्यांनंतर रेल्वेने टप्प्याटप्प्याने स्पेशल ट्रेन म्हणून केवळ आरक्षित प्रवाशांसाठी रेल्वे गाड्या सुरू केल्या.

सुमारे दीड वर्षांनंतर त्या गाड्या नियमित करण्यात आल्या आहेत. रेल्वेने मार्च 2020 मध्ये बंद केलेल्या काही गाड्या अद्याप सुरू केलेल्या नाहीत. यामध्ये कोल्हापुरातून सुटणार्‍या चार एक्स्प्रेस आणि चार पॅसेंजरचा समावेश आहे.

भारतीय रेल्वेच्या नव्या धोरणानुसार, प्रवाशांचा प्रतिसाद कमी असलेल्या गाड्या बंद करण्यात येत आहेत. याशिवाय 150 कि.मी.पेक्षा जादा अंतरावर धावणार्‍या पॅसेंजर गाड्या यापुढे एक्स्प्रेस म्हणून सोडण्याचा विचार सुरू आहे. काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात येत आहे. या सर्व निर्णयाचा फटका कोल्हापूरलाही बसणार आहे. कोल्हापूर-बंगळूर राणी चन्नमा एक्स्प्रेस कायमची बंद करण्यात आली आहे. या गाडीत बदल करून ती आता मिरज-बंगळूर अशी धावत आहे.

मार्च 2020 मध्ये बंद झालेल्या कोल्हापूर-मुंबई-सह्याद्री एक्स्प्रेससह कोल्हापूर-मनगुरू, कोल्हापूर-बिदर, कोल्हापूर-सोलापूर या गाड्या आता दोन वर्षे होत आली, पण पुन्हा सुरू झालेल्या नाहीत. सहयाद्री एक्स्प्रेस वगळता अन्य तीन गाड्यांना अपेक्षित प्रवासी मिळत नसल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. सह्याद्री एक्स्प्रेस पुण्यापासून पुढे मुंबईपर्यंत पॅसेंजर सारखीच धावत असते. या गाडीला पुणे-मुंबई मार्गावर दैनंदिन प्रवास करणारे नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिक, व्यापारी यांचीच अधिक गर्दी असते. यामुळे आरक्षित प्रवाशांची संख्या कमी आहे.

पुणे ते मुंबई या मार्गावर सकाळी सहा ते दुपारी साडेबारा आणि मुंबई ते पुणे या मार्गावर सांयकाळी पाच वाजून 50 मिनिटे ते रात्री दहा अशी रेल्वे धावत असते. या कालावधीत या मार्गावरील वाहतूक अधिक असते. यासर्व पार्श्वभूमीवर सह्याद्री एक्स्प्रेस रद्द करण्याच्या रेल्वेकडून यापूर्वीच हालचाली होत होत्या.

कोल्हापुरातून सुटणार्‍या सह्याद्रीसह चार एक्स्प्रेस बंद

कोल्हापूर स्थानकातून सुटणार्‍या सह्याद्री एक्स्प्रेसह कोल्हापूर-बिदर, कोल्हापूर-सोलापूर आणि कोल्हापूर-मनगुरू या गाड्या बंद होणार आहेत, अशीच चर्चा सुरू आहे. कोल्हापूर-बंगळुरू राणी चन्नम्मा एक्स्प्रेस यापूर्वीच बंद झाली आहे.

कोल्हापूर-पुणे पॅसेंजर आता होणार एक्स्प्रेस

यापुढे फक्त 150 कि.मी.पर्यंतच पॅसेंजर रेल्वे धावणार आहेत. 150 कि.मी.च्या पुढे धावणार्‍या पॅसेंजरचे एक्स्प्रेसमध्ये रूपांतर होणार आहे. त्यानुसार कोल्हापूर-पुणे पॅसेंजरसह मिरज-हुबळी पॅसेंजर, मिरज-परळी पॅसेंजर, मिरज-कॅसलरॉक पॅसेंजरचा एक्स्प्रेसमध्ये विस्तार होणार आहे. मात्र याबाबत रेल्वेने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. दरम्यान गाड्या बंद करण्याबाबत अथवा गाड्यांचा विस्तार करण्याबाबत, श्रेणी वाढवण्याबाबत अद्याप कोणतेही परिपत्रक रेल्वे कडून काढण्यात आलेले नाही, तशी कोणतीही घोषणा केली नसल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

कोल्हापूर-पुणे पॅसेंजर आता होणार एक्स्प्रेस

यापुढे फक्त 150 कि.मी.पर्यंतच पॅसेंजर रेल्वे धावणार आहेत. 150 कि.मी.च्या पुढे धावणार्‍या पॅसेंजरचे एक्स्प्रेसमध्ये रूपांतर होणार आहे. त्यानुसार कोल्हापूर-पुणे पॅसेंजरसह मिरज-हुबळी पॅसेंजर, मिरज-परळी पॅसेंजर, मिरज-कॅसलरॉक पॅसेंजरचा एक्स्प्रेसमध्ये विस्तार होणार आहे. मात्र याबाबत रेल्वेने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. दरम्यान, गाड्या बंद करण्याबाबत अथवा गाड्यांचा विस्तार करण्याबाबत, श्रेणी वाढवण्याबाबत अद्याप कोणतेही परिपत्रक रेल्वेकडून काढण्यात आलेले नाही. तशी कोणतीही घोषणा केली नसल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT