Latest

कोल्हापूर-मिरज मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण, पण दुहेरीकरण होणार का?

Arun Patil

कोल्हापूर ; अनिल देशमुख : कोल्हापूर-मिरज मार्गाचे विद्युतीकरण झाले. पण, विद्युतीकरणाबरोबरच दुहेरीकरणाचीही मागणी होती. विद्युतीकरण पूर्ण झाले; पण दुहेरीकरणाचे काय? कोल्हापूर-मिरज दुहेरीकरण होणार का? असे अनेक प्रश्‍न आहेत. पुणे विभागातील प्रमुख मार्गांचे दुहेरीकरण करण्यात येत आहे. त्यात केवळ कोल्हापूर-मिरज हा मार्ग बाजूला पडला आहे.

पुणे-मिरज या मार्गाचे दुहेरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. याबरोबर मिरज-लोंढा या मार्गाचेही काम सुरू आहे. येत्या दोन वर्षांत ही कामे पूर्णही होतील. त्यामुळे गाड्याची संख्या, गती वाढणार. पण त्याचा फायदा कोल्हापूरला फारसा होणार नाही. कारण कोल्हापूर-मिरज हा सध्या एकेरी मार्ग असल्याने नव्या गाड्या सोडणे, गाड्यांची गती वाढवणे याला मर्यादा येणार आहे.

कोल्हापुरातून नव्या गाड्यांबरोबर पुणे स्थानकातून सोडण्यात येणार्‍या काही गाड्यांचा कोल्हापूरपर्यंत विस्तारही करता येणे शक्य आहे. मात्र, कोल्हापूर-मिरज आणि मिरज-पुणे या मार्गावर सध्या एकेरीच वाहतूक सुरू असल्याने त्यालाही मर्यादा असल्याचे कारण रेल्वेकडून पुढे केले जाते. यापूर्वी एकेरी मार्गावरूनच गाड्या धावतात, त्यांची संख्या गेल्या काही वर्षांत तिपटीने वाढली आहे. आणखी दोन-तीन वर्षांनंतर मिरज-पुणे असा दुहेरी मार्ग उपलब्ध होणार आहे. मात्र, त्यावेळी कोल्हापूर-मिरज हा मार्ग एकेरी असल्याचे कारण पुढे येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

सध्या कोल्हापूर-मिरज या 48 कि.मी.च्या अंतरावर दररोज 26 गाड्यांची ये-जा सुरू असते. याखेरीज मालवाहतूक वेगळीच. यामुळे या मार्गाचे दुहेरीकरण करणे भविष्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. सध्या रेल्वेकडे दुहेरीकरणासाठी जमीन उपलब्ध आहे. काही ठिकाणचा अपवाद वगळता बहुतांशी ठिकाणी जमिनीची समांतर पातळीही करून ठेवलेली आहे. यामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीवरील दोन मोठे पूल आणि काही ठिकाणचे छोटे पूल वगळता अन्य ठिकाणच्या कामाला फारसा वेळ लागणार नाही.

रेल्वेकडे निधीचा तुटवडा असल्याचे कारण दिले जाते. मात्र, कोल्हापूर ते मिरज हे अंतर केवळ 48 कि.मी.चे आहे. त्यात क्रॉसिंग स्टेशनची संख्या आणखी वाढवून टप्प्याटप्प्याने काम करता येऊ शकते. असे झाले तर एक-दोन वर्षांत किमान कोल्हापूर ते रुकडी आणि रुकडी ते जयसिंगपूर या मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण होऊ शकते. यादृष्टीने प्रयत्न झाले तरी दोन-तीन वर्षांत वेगळे चित्र दिसेल. (क्रमश:)

क्रॉसिंग स्टेशन कागदावरच

एकेरी मार्गामुळे कोल्हापूर-मिरज मार्गांवर अनेक गाड्यांचा क्रॉसिंगसाठी वेळ जातो. याकरिता रुकडी ते हातकणंगले आणि हातकणंगलेे ते जयसिंगपूर या दरम्यान दोन क्रॉसिंग स्टेशन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. क्रॉसिंग स्टेशन म्हणजे काही अंतर दुहेरी मार्ग बांधण्यात येतो. यामुळे क्रॉसिंगसाठी लागणारा वेळ आणखी कमी होऊ शकतो. पण, या स्टेशनची केवळ घोषणाच झाली. त्याची अमंलबजावणी अद्याप झालेली नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT