Latest

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : हाय व्होल्टेज लढती, चुरशीने मतदान

अमृता चौगुले

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक ) निमित्ताने गावागावांतील राजकारण ढवळून निघाले. संस्था गटातील सहा जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या असल्या तरी ठरावधारकांना इतर गटातील पाच मतांचा अधिकार असल्याने तालुक्यातील ईर्ष्येचे वातावरण कायम असल्याचे बुधवारी झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. जिल्ह्यातील 13 ठिकाणी 40 केंद्रांवर 7,651 पैकी तब्बल 7,498 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शाहूवाडी, गडहिंग्लज आणि भुदरगड तालुका संस्था गटात 100 टक्के मतदान झाले. प्रक्रिया गटात 448 पैकी 446, पतसंस्था गटात 1221 पैकी 1207, इतर संस्था गटात 4115 पैकी 3995 असे सरासरी 98 टक्के चुरशीने मतदान झाले. वाढलेला मताचा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार याची उत्कंठा राजकीय वर्तुळात आहे. 15 जागांसाठी 33 उमेदवारांचे राजकीय भवितव्य शुक्रवारी मतमोजणी दिवशी स्पष्ट होणार आहे.

मंत्री मुश्रीफ व खा. मंडलिक दिवसभर तळ ठोकून ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक )

कागल; पुढारी वृत्तसेवा : येथील शाहू हायस्कूलच्या इमारतीमध्ये घेण्यात आलेल्या मतदान केंद्रावर अतिशय चुरशीने 100 टक्के मतदान झाले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार संजय मंडलिक यांनी मतदान केंद्रावर उशिरापर्यंत तळ ठोकला होता. तिन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या रंगाच्या टोप्या परिधान केल्या होत्या. गटागटाने मतदार मतदानासाठी येत होते. त्यामध्ये महिला मतदारांचाही समावेश होता.

सकाळी साडेआठच्या दरम्यान आमदार हसन मुश्रीफ मतदान केंद्रावर आले होते. उशिरापर्यंत मतदान केंद्रावर आलेल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करत होते. भेटून सूचना करत होते. खा. संजय मंडलिक हे देखील मतदान केंद्रावर उशिरापर्यंत थांबले होते. मतदानासाठी आलेले मतदार या दोन्ही नेत्यांना भेटून मतदानासाठी जात होते. त्यामुळे गर्दी झालेली होती. सत्तारूढ गटाच्या बूथवर कार्यकर्त्यांची दिवसभर गर्दी होती. मतदान केंद्रावर मतदानासाठी दुपारपर्यंत रांगा लागल्या होत्या. दुपारनंतर मतदारांची संख्या कमी झाली होती. सकाळी मात्र उत्साहाने मतदान सुरू झाले होते. तिन्ही गटाचे कार्यकर्ते गटागटाने मतदानासाठी येत होते. सर्व गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये खेळीमेळीचे वातावरण होते. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या कार्यकर्त्यांचा फारसा सहभाग दिसून येत नव्हता. समरजितसिंह यांनी देखील निवडणूक प्रचाराकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. तर माजी आमदार संजय घाटगे हे बराच वेळ मंत्री मुश्रीफ यांच्याशी चर्चा करीत बूथवर बसलेले होते.

मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांचे तीन रंग ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक )

ना. मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांनी पांढर्‍या टोप्या, खासदार मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांनी भगव्या टोप्या तर अपक्ष उमेदवार अनिलराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी पिवळ्या टोप्या परिधान केल्या होत्या. या तीन रंगाची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.

दुपारी जिल्हा पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे यांनी मतदान केंद्राला भेट दिली. यावेळी पोलिस निरीक्षक संजय गोरले, सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे व इतर अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, ना. हसन मुश्रीफ, खा. संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे व समरजितसिंह घाटगे यांनीही कागलमध्ये मतदान केले.

खा. मंडलिक – ना. मुश्रीफ भेट… ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक )

ना. मुश्रीफ मतदान केंद्रावरील आपल्या बूथमध्ये सकाळी लवकर येऊन बसले होते. काही वेळाने खासदार मंडलिक देखील मतदान केंद्रावर आले. मंत्री मुश्रीफ हे बूथमध्ये येऊन बसलेले आहेत, अशी माहिती कार्यकर्त्यांनी मंडलिक यांना दिली. त्यावेळी मंडलिक यांनी तत्काळ जाऊन नामदार हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. याबाबतची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागून राहिली होती.

करवीर : शक्तिप्रदर्शनाने 98 टक्के मतदान ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक )

कोल्हापूर : करवीर तालुका व कोल्हापूर शहराचे मतदान प्रतिभानगर, रेड्याची टक्कर येथील महापालिकेच्या पद्मभूषण वि. स. खांडेकर प्रशालेमध्ये घेण्यात आले. करवीर तालुक्यात चुरशीने 98 टक्के मतदान झाले.

करवीरचे चार तर शहराचे दोन अशा सहा केंद्रांवर मतदान घेण्यात आले. राखीव गटातील 251 पैकी 249 जणांनी मतदान केले. केंद्र क्रमांक 19 मध्ये प्रक्रिया संस्था गटातील 45 पैकी 44, पतसंस्था गटातील 98 पैकी 97 व राखीवमधील 143 पैकी 141 जणांनी मतदान केले. केंद्र क्रमांक 20 मध्ये गट नंबर चारमधून 300 पैकी 295 व राखीवमधून 300 पैकी 295 जणांनी मतदान केले. गट नं.4 व राखीवमधील प्रत्येकी 293 पैकी 289 जणांनी मतदान केले.

कोल्हापूर शहरातील मतदान दोन केंद्रांवर घेण्यात आले. केंद्र क्रमांक 22 प्रक्रिया संस्था गटातील 20 पैकी 20, पतसंस्था गटातून 210 पैकी 207 व राखीवमधील 230 पैकी 227 मतदारांनी मतदान केले. केंद्र क्रमांक 23 मध्ये गट नंबर चार मधील 168 पैकी 143 व राखीवमधील 168 पैकी 143 मतदारांना मतदान केले.

हातकणंगले : 82 टक्के

हातकणंगले : जिल्हा बँकेसाठी ईर्ष्येने सरासरी 82 टक्के मतदान झाले. शाहू आघाडी व शाहू परिवर्तनच्या सर्वच राजकीय नेतेमंडळीनी कार्यकर्त्यासह केंद्रावर उपस्थिती दर्शवली. किरकोळ वाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. येथील श्री रामराव इंगवले हायस्कूलमध्ये मतदान झाले. विकास संस्थेकरिता 140 पैकी 140 मतदारांनी हक्क बजावला. 1024 पैकी 840 मतदारांनी मतदान केल्याने सरासरी 82 टक्के मतदान झाले.

गडहिंग्लज ः 100 टक्के मतदान

गडहिंग्लज ः तालुक्यात सेवा संस्था गटात सर्वच सर्व 106 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गडहिंग्लजला कृषी व पणन गटात 7 पैकी 7 मतदान, नागरी बँका, पतसंस्था गटात 85 पैकी 81 तर इतरमध्ये 275 पैकी 272 मतदान झाले. गडहिंग्लजला सेवा संस्था गटातून अप्पी पाटील व संतोष पाटील या विद्यमान संचालकांमध्ये लढत झाली. संतोष पाटील यांनी मतदारांना सहलीवर नेले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी मतदारांसोबत शक्तिप्रदर्शन केले होते.

शाहूवाडी : सेवा संस्था गटात 100 टक्के

बांबवडे : जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी शाहूवाडी तालुक्यात सेवा व शेती संस्था गटात 100 टक्के मतदान झाले. इतर संस्था गटात सरासरी 96 टक्केच्या सरासरीने अत्यंत चुरशीने मतदान झाले. सकाळी 8 वाजता मतदानास सुरुवात झाली. सेवा संस्था गटात मोठी चुरस होती. या गटात उदय साखर कारखाना संचालक रणवीर गायकवाड विरुद्ध विद्यमान संचालक सर्जेराव पाटील-पेरीडकर असा सरळ सामना होता. त्यामुळे दोन्ही गट दिवसभर सक्रिय होते.

चंदगड : दोन्ही गटाकडून रस्सीखेच

चंदगड ः तालुक्यातून चुरशीने 99 टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत झाली. सकाळच्या पहिल्या सत्रात तिन्ही केंद्रांवर मतदारांची काहीशी गर्दी झाली होती. एक एक मतदान मिळवण्यासाठी दोन्ही गटाकडून रस्सीखेच सुरू होती. मतदारांना मतदानस्थळी आणण्यासाठी खास गाड्यांची सोय करण्यात आली होती.

राधानगरी : 98.41 टक्के मतदान

राधानगरी : तालुक्यातून चुरशीने 98.41 टक्के मतदान झाले. 697 सभासदांपैकी 685 सभासद मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादीचे ए. वाय. पाटील यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. येथील राजर्षी शाहू विद्यामंदिर येथील केंद्रावर चुरशीने मतदान झाले.

पन्हाळा : 98 टक्के मतदान

पन्हाळा : तालुक्यातील चार मतदान केंद्रांवर 98 टक्के मतदान झाले. पन्हाळा तालुक्यातील 872 पैकी 852 मतदान झाले. विकास संस्था गटात 244 पैकी 243, प्रक्रिया व पणन संस्था गटात 84 पैकी 83, पतसंस्था व बँक गटात 110 पैकी 108 इतके मतदान झाले. इतर संस्था गट व वैयक्तिक मतदान गटात एकूण 433 पैकी 423 जणांनी मतदान केले. मतदान केंद्राबाहेर आमदार विनय कोरे, अरुण नरके, चेतन नरके उपस्थित होते.

शिरोळमध्ये वादावादी, हुज्जत, हमरीतुमरीने तणाव

शिरोळ : शाब्दिक वादावादी, दोन गटांत हुज्जत, हमरीतुमरी, नेत्यांच्या नावाचा जयघोष, हुल्लडबाजी, फटाक्यांची आतषबाजी अशा वातावरणात मतदान झाले. येथील पद्माराजे विद्यालयात मतदान प्रक्रियेला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. सहकारी सेवा संस्था, नागरी बँका व पतसंस्था, पाणीपुरवठा कृषी पणन व शेतीमाल प्रक्रिया संस्था आणि इतर अशा चार गटांच्या संचालक पदासाठी बुधवारी चढाओढीने व चुरशीने मतदान झाले. दुपारी तीन वाजेपर्यंत चार गटांत 98 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली, तर सेवा संस्था गटात 100 टक्के मतदान झाले.

सकाळच्या पहिल्या टप्प्यात दत्त साखरचे चेअरमन, उमेदवार गणपतराव पाटील, संजय पाटील-यड्रावकर, माजी खा. निवेदिता माने, माजी खा. राजू शेट्टी, माजी आ. उल्हास पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक निंबाळकर, दिलीपराव पाटील तर दुसर्‍या टप्प्यात आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, स्वरूपाताई यड्रावकर यांनी मतदानाचा हक्क बजावला.

तुमचा काय संबंध?

राष्ट्रवादीचे माजी सरचिटणीस चंगेजखान पठाण यांनी मतदान केंद्रावर जाऊन बनावट मतपत्रिका असून तपासणी करावी, अशी मागणी करताच संजय पाटील-यड्रावकर यांनी आपण मतदार आहात का, आपले मतदान आहे का, तुमचा काय संबंध आहे, असे खडसावत पठाण यांना मतदार केंद्राबाहेर काढून पोलिसांकडे तक्रार केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT