Latest

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : राजकीय सरमिसळीने जीव टांगणीला

अमृता चौगुले

कोल्हापूर; संतोष पाटील : नेत्यांतील राजकीय ईर्ष्या, विधानसभेच्या जोडण्या, प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढण्याची रणनीती, मार्मिक टोलेबाजी, जिव्हारी लागणारी टीका अशा वातावरणात जिल्हा बँकेच्या राजकारणात ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक ) कधी नव्हे ते प्रथमच राजकीय सरमिसळीने टोक गाठले आहे. शाहूवाडी आणि शिरोळ तालुका संस्था गटासह इतर नऊ गटांतील निवडणूक उत्कंठावर्धक ठरली. 15 पैकी तब्बल 13 जणांतील कोण निवडून येईल, याची खात्री नसल्याने उमेदवारांसह नेत्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

भाजप जिल्हा बँकेच्या राजकारणात काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेल्याने बिनविरोध नाही झाली, तरी एकतर्फी होईल अशी वाटणारी ही निवडणूक उत्कंठापूर्ण वळणावर आली. मागील पंधरा दिवसांत शिवसेनेने दोन्ही काँग्रेसवर मार्मिक टीका करत अक्षरश: खिजवले. दोन्ही आघाड्यांत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना असे सर्वपक्षीय उमेदवार आहेत. यामुळेच दोन्ही आघाड्यांत बुद्धिबळाच्या पटातील अडीच घरांचा खेळ रंगला. एकमेकाचा गेम करण्यासाठी पडद्यामागे जोरदार घडामोडी घडल्या. आमदारकीची गणिते समोर ठेवून राजकीय ताकद पणाला लावली गेली. यातून क्रॉस वोटिंग आणि सिंगल वोटिंगची जोडणी घातली गेली. ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक )

प्रक्रिया गटात खा. संजय मंडलिक आणि बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांचे पारडे जड मानले जाते. येथील निवडणूक जनसुराज्य आणि मागील काही दिवसांपासून काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली आहे. बँक-पतसंस्था गटात आ. प्रकाश आवाडे, अनिल पाटील, प्रा. अर्जुन आबिटकर यांच्यातील तिरंगी लढत कुरघोड्यांच्या राजकारणामुळे गाजणार आहे. शिवसेनेसाठी येथील विजय प्रतिष्ठेचा आहे. आ. प्रकाश आवाडे यांची भविष्यातील राजकीय दिशा येथील निकालानंतर स्पष्ट होईल. इतर शेती संस्था, व्यक्ती सभासद गटात सुरुवातील भैया माने यांच्यासाठी एकतर्फी वाटणारी लढत क्रांतिसिंह संपतराव पवार-पाटील यांच्यामुळे चुरशीची झाली आहे. या गटात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक )

महिला गटातील दोन जागांसाठी माजी खासदार निवेदिता माने, श्रृतिका काटकर, रेखा कुराडे, लतिका शिंदे यांच्यात सामना रंगला. निवेदिता माने यांच्या विरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्याने लढत रंगतदार झाली. पी. जी. शिंदे यांना पालकमंत्री सतेज पाटील यांचा असलेल्या विरोधाकडे दुर्लक्ष करत खा. संजय मंडलिक यांनी लतिका शिंदे यांना उमेदवारी दिली. श्रृतिका काटकर यांच्यासाठी आ. पी. एन. पाटील आणि आ. विनय कोरे गट सक्रिय होता. येथील एका जागेवरील निकाल सत्ताधार्‍यांसाठी धक्का देणारा होऊ शकतो.

अनुसूचित जाती-जमाती गटात ऐनवेळी एन्ट्री केलेल्या उत्तम कांबळे यांनी चुरस वाढवली आहे. आमदार राजू आवळे यांची बँकेतील वाटचाल आरपीआयच्या गावागावातील नेटवर्कमुळे खडतर होऊ शकते. विमुक्त जाती- विशेष मागास प्रवर्ग गटात 'गोकुळ'चे संचालक विश्वास जाधव यांनी राजकीय अनुभव आणि संपर्काच्या जोरावर ताकद लावली आहे. जाधव यांच्या 'गोकुळ'च्या जुन्या नेटवर्कमुळे सत्ताधारी आघाडीला येथील जागा वाचवताना टोकाचा प्रयत्न करावा लागला आहे. या गटात विश्वास जाधव यांचा विजय झाल्यास तो विरोधी आघाडीच्या पथ्यावर पडेल. जाधव यांच्यामुळे इतर गटातील अजून तीन जागांवर परिणाम होऊ शकतो. इतर मागासवर्गीय गटातील विजयसिंह माने आणि रवींद्र मडके यांच्यातील लढत तुलनेने दुर्लक्षित होती. मात्र, पॅनेलमधील इतर दहा जागांचा प्रभाव येथील गटातील निवडीवर होऊ शकतो.

संस्था गटातही चुरस ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक )

शिरोळ तालुक्यात राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि गणपतराव पाटील यांच्या लढतीत गणपतराव पाटील यांना सर्वपक्षीयांनी दिलेली साथ यड्रावकरांना धक्का देणार काय, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. शाहूवाडीत सर्जेराव पाटील-पेरीडकर आणि रणवीर गायकवाड यांच्यातील लढत लक्षवेधी आहे. आजरा तालुका संस्था गटात अशोक चराटी आणि सुधीर देसाई यांच्यात चुरस आहे. भुदरगड तालुक्यात राष्ट्रवादीचे रणजित पाटील आणि यशवंत नांदेकर यांच्या लढतीत राष्ट्रवादी बाजी मारण्याची शक्यता आहे. गडहिंग्लज तालुक्यात सुरुवातीला संतोष पाटील यांचे पारडे जड मानले जात होते; मात्र मतदानापूर्वी काही दिवस विनायक पाटील यांनी जलदगतीने केलेल्या जोडण्या धक्कादायक निकाल देऊ शकतात. पन्हाळा तालुक्यातून आमदार विनय कोरे यांच्या विजयाची औपचारिकता बाकी आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT