Latest

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : उद्या मतमोजणी; उत्कंठा शिगेला

अमृता चौगुले

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक ) चुरशीने 98 टक्के मतदान झाले. बुधवारी रात्री उशिरा जिल्ह्यातील सर्व 40 मतदान केंद्रांवरील मतपेट्या मतमोजणी केंद्रावर दाखल झाल्या. रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉल येथे शुक्रवारी (दि. 7) सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. टोकाची ईर्ष्या आणि आरोप-प्रत्यारोपांनी निवडणूक गाजल्याने निकालाबाबत उत्कंठा आहे.

जिल्हा बँकेच्या ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक ) 15 जागांसाठी 33 उमेदवार रिंगणात होते. संस्था गटात 67 ते 244 इतके मतदार आहेत. यामुळे येथील निकाल मतपत्रिकांची विभागणी झाल्यानंतर लगेच लागणार आहे. यानंतर पणन आणि प्रकिया गटातील 448 मतांची मोजणी होणार आहे. बँक आणि नागरी पतसंस्था गटात 1,221 मतदान आहे. या गटातील निकाल जाहीर झाल्यानंतर इतर संस्था गटातील निकाल लागेल. इतर संस्था गटात चार हजार मतपत्रिका आहेत.

सर्व मतदार आपल्या गटासह राखीव गटातील महिला दोन मते, विमुक्त जाती/ विशेष मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती-जमाती, तसेच इतर मागासवर्गीय गटासाठी मतदान केल्याने या चार गटांत सुमारे 7,651 सरासरी प्रत्येक गटात मतपत्रिका आहेत. यामुळे या चार गटांतील पाच जागांचा निकाल उशिरा जाहीर होणार आहे.

200 कर्मचारी तैनात ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक )

मतमोजणीसाठी सुमारे दोनशे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ठरावधारक हाच उमेदवाराचा प्रतिनिधी असेल. मतमोजणी केंद्रावर मोबाईल नेण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मतमोजणी केंद्रासह तालुक्याच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. कोरोनामुळे विजयी मिरवणुका, जल्लोष आदींवर बंदी आहे. हुल्लडबाजी तसेच गाडीची पुंगळी काढून फिरणार्‍यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

मतदान झाले…. आकडेमोड सुरू! ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक )

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी बुधवारी चुरशीने 98 टक्के मतदान झाल्याने विजयाचा गुलाल नेमका कोण उधळणार, यांची आकडेमोड सुरू झाली आहे. महाविकास आघाडीतच फूट पडली असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशा लढतीत कोणाची सरशी होणार, याची आकडेमोड करण्यात कार्यकर्ते रात्री उशिरापर्यंत मग्न होते.

राज्यात सत्तेत असणार्‍या महाविकास आघाडीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीनिमित्त फूट पडली. छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी विरुद्ध राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडी अशी लढत झाली. 15 जागांसाठी 33 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ तसेच शिवसेनेचे खा. संजय मंडलिक यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली. जिल्ह्यात 40 केंद्रांवर मतदान झाले. कोणत्या गावातून कोणत्या कार्यकर्त्यांनी किती मतदार आणले, ठरलेली मते किती, काठावरची मते किती याचा अंदाज बांधताना कार्यकर्तेही विचारात पडले आहेत. कोणत्या गटातून कोणाला किती मते मिळतील, याचा मतदानापूर्वीचा अंदाज व प्रत्यक्ष मतदान झाल्यानंतरची स्थिती याचा ताळमेळ घालण्याचे काम बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. यावेळी 98 टक्के मतदान झाल्याने मतदारांचा नेमका कौल काय असावा, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. त्यामुळे नेत्यांसह कार्यकर्त्यांना वेध लागले आहेत ते मतमोजणीच्या दिवसाची.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT