Latest

कोल्हापूर ; ‘चेन्‍नमा’पाठोपाठ ‘सह्याद्री एक्स्प्रेस’ ही बंद करणार

Arun Patil

कोल्हापूर ; अनिल देशमुख : कोल्हापूर-बंगळूर मार्गावर धावणारी 'राणी चेन्‍नमा एक्स्प्रेस' बंद केली. आता कोल्हापूर-मुंबई मार्गावरील मार्च 2020 पासून बंद असलेली 'सह्याद्री एक्स्प्रेस'ही कायमची बंद केली जाणार आहे. यासह कोल्हापूर-सोलापूर, कोल्हापूर-हैदराबाद (मणुगुरू) आणि कोल्हापूर-बिदर या गाड्याही बंदच केल्या जाणार आहेत. कोल्हापूर स्थानकातून अन्य मार्गांसाठी नव्या गाड्या सुरू करण्याचे प्रयत्न तर राहू दे; पण ज्या गाड्या सुरू होत्या, त्यातील पाच गाड्या बंद आहेत. हाच कोल्हापूरचा विकास म्हणायचा का, असा सवाल आहे.

धार्मिक आणि पर्यटनद‍ृष्ट्या राज्यातील प्रमुख ठिकाण म्हणून कोल्हापूरचा लौकिक आहे. औद्योगिक आणि सामाजिकद‍ृष्ट्याही कोल्हापूरचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोल्हापूरला भेट देणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यटक, भाविक वाढत असताना, औद्योगिक, सामाजिक कारणांनी देशभरातील प्रमुख ठिकाणांशी कोल्हापूरचे नाते द‍ृढ होताना, कोल्हापुरातून विविध मार्गांवर रेल्वे सुरू होण्याची गरज आहे. मात्र, कोल्हापूरबाबत नेमके उलटेच होत आहे. नव्या गाड्या सुरू करणे राहिले दूरच; आहे त्यापैकी काही गाड्या बंद करण्याचा घाट घातला जात आहे.

कोल्हापूर कर्नाटकची राजधानी बंगळूरशी थेट रेल्वेने जोडले होते. कोल्हापूर-बंगळूर या मार्गावर दररोज राणी चेन्‍नमा एक्स्प्रेस धावत होती. कोरोनाच्या निमित्ताने सर्वच रेल्वे गाड्या बंद केल्या. त्यानंतर टप्प्याटप्याने सुरू केल्या, त्यात प्रवाशांचे कारण दाखवत ही गाडीच बंद केली. ही गाडी सध्या मिरज-बंगळूर अशी धावते.

या गाडीला प्रवासी नव्हते, असा रेल्वेचा दावा पूर्ण खरा आहे, असे म्हणणे संयुक्‍तिक नाही. देशभरात ज्या ज्या गाड्या धावतात, त्यांना गाडी सुटते ते ठिकाण आणि गाडी थांबणारे अखेरचे स्थानकाचे ठिकाण अशी थेट प्रवाशांची संख्या 70-80 टक्केही नसते. तरीही या गाड्या धावत असतात. मग 'राणी चेन्‍नमा'साठी हा निकष का? याचा जाब कोणीतरी विचारायला हवा होता.

कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस मार्च 2020 पासून अद्याप सुरू झालेली नाही. पुढे ही गाडी सुरू होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. कारण सह्याद्री आणि महाराष्ट्र एक्स्प्रेस 'इंटरलिंक' होत्या. महाराष्ट्र एक्स्प्रेस सुरू झाली आणि सह्याद्री अद्याप सुरू नाही, याचा अर्थ जवळपास ही गाडी बंद केली आहे. त्याची अधिकृत घोषणा मात्र अद्याप झालेली नाही.

यामुळे अजूनही ही गाडी सुरू करण्याची संधी आहे. त्यासाठी फक्‍त राजकीय ताकद दाखवावी लागणार आहे. कोल्हापूर-पुणे मार्गावर तसेच पुढे पिंपरी चिंचवड, निगडी, देहू रोड, लोणावळा, कर्जत ते अगदी कल्याण, ठाणेपर्यंत प्रवास करणार्‍यांसाठी तसेच मुंबईतून पुण्यापर्यंत आणि मुंबई व पुण्यातून कोल्हापूरसाठी येणार्‍या प्रवाशांना ही गाडी महत्त्वाची आहे.

कोल्हापूर-सोलापूर मार्गावर सकाळी गाडी होती. त्याला चांगला प्रतिसाद होता. पण ती गाडी बंद केली आणि रात्री सुरू केली. यामुळे या गाडीला म्हणावा तसा प्रतिसाद प्रारंभी मिळाला नाही. तरीही कोल्हापूर-सोलापूर आणि पर्यायाने पंढरपूर मार्गासाठी ही गाडी आवश्यकच आहे, तीही बंद केली आहे. कोल्हापूर तेलगंणाची राजधानी हैदराबादशी थेट जोडणारे आणि आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीपासून काही अंतरावर असलेल्या मणुगुरूपर्यंत धावणारी कोल्हापूर-हैदराबाद एक्स्प्रेसही बंद करण्यात आली आहे. अशीच अवस्था कोल्हापूर-बिदर या साप्ताहिक गाडीचीही करण्यात आली आहे. याबाबत लोकप्रतिनिधींचा आवाज उठणार का, असाही सवाल केला जात आहे. (क्रमश:)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT