Latest

कोल्हापूर : कळंबा कारागृहात कैद्याला बेदम मारहाण; सातार्‍याच्या 4 कैद्यांवर गुन्हा

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : 'मोका'अंतर्गत कारवाईचा बडगा उगारलेल्या आणि कळंबा कारागृहात बंदिस्त असलेल्या सातारा जिल्ह्यातील दोन गुन्हेगारी टोळ्यांमध्ये सोमवारी सकाळी जीवघेणा राडा झाला. सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली. मात्र, दगडफेक, शिवीगाळ, आरडा-ओरडा आणि अंगावर धावून जाण्याच्या प्रकारामुळे तणावाची स्थिती होती. या हल्ल्यात मल्लिक ऊर्फ दत्तात्रय रामचंद्र जाधव (वय 54, रा. सातारा) हा कैदी जखमी झाला आहे.

कळंबा कारागृह अधिकारी सतीश दिनकर माने यांनी सोमवारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद केली आहे. सलिम ख्वाजासाहेब शेख, रोहन राजेंद्र जाधव, समाधान राजेंद्र जाधव, प्रतीक संजू जाधव (रा. सातारा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांतर्गत धुमसणार्‍या पूर्ववैमनस्यातून थरारक प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

अनपेक्षित हल्ल्याने तणाव

कैदी दत्तात्रय जाधव याला मधुमेहाचा त्रास असल्याने सोमवारी सकाळी त्याला वैद्यकीय तपासणी व उपचारांसाठी नेण्यात आले होते. तपासणीनंतर त्याला कारागृहातील सर्कल क्रमांक 6 मधील बॅरेकमध्ये नेण्यात येत होते. कैद्यासमवेत सुरक्षा रक्षक बॅरेकसमोरील रिकाम्या जागेकडे येत असताना चारही कैद्यांनी अचानक जाधव याच्यावर हल्ला केला. त्याच्यावर विटा, दगडांचा मारा करण्यात आला. तसेच धक्काबुक्कीही करण्यात आली.

अधिकारी, रक्षकांची तारांबळ

अनपेक्षितपणे घडलेल्या प्रकारामुळे अधिकारी, सुरक्षा रक्षकांची तारांबळ उडाली. सुरक्षा रक्षकांनी बळाचा वापर करून हल्लेखोर कैद्यांना तातडीने बॅरेकमध्ये बंदिस्त केले. कारागृह अधीक्षक पांडुरंग भुसारी यांच्यासह अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर सुरक्षा यंत्रणांनी कारागृहातील सर्वच बॅरेकची झडती घेतली.

सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

या प्रकारामुळे कारागृहातील सुरक्षा यंत्रणेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT