Latest

काँग्रेसची गळती

backup backup

उदयपूरमधील चिंतन शिबिरात पक्षाच्या भविष्यातील वाटचालीसंदर्भात काही दिशा ठरवल्यानंतरसुद्धा काँग्रेसला लागलेली गळती थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. आम्ही 'ना चिंता ना चिंतन' या अग्रलेखात त्या शिबिराची चिकित्सा केली होती. काँग्रेस पक्ष हे बुडणारे जहाज असल्यामुळे 2014 पासूनच या जहाजावरील अनेक उंदरांनी इकडे-तिकडे विशेषतः बहुतेकांनी भाजपमध्ये उड्या मारल्या. संघर्ष करून पूर्ववैभव प्राप्त करता येईल, या भरवशावर पक्षात राहिलेल्यांपैकी अनेकांचा भ्रमनिरास झाला किंवा पक्षनेतृत्वाने आपला भ्रमनिरास केला, असे त्यांना वाटू लागले. त्यामुळे नंतरही अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली.

राजकारणातील आयाराम-गयाराम संस्कृतीला कोणत्याही निवडणुकीच्या तोंडावर उधाण येत असते. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पाहायला मिळाले. परंतु, काँग्रेस सोडण्यासाठी आता काही कारण लागत नाही. खूप दिवसांत काँग्रेस नेतृत्वाला धक्का दिला नाही, असे भाजपच्या नेतृत्वाला वाटले की, पक्षनेतृत्वाच्या जवळचा एखादा नेता नेतृत्वाच्या निष्क्रियतेवर टीका करून काँग्रेसचा त्याग करतो. हे एवढे रुळलेले आहे की, आजही राष्ट्रीय, राज्य पातळीवरील काही डझन काँग्रेस नेते आपल्याला कधीही भाजपमधून बोलावणे येईल, याची वाट बघत भगवा कुर्ता शिवून तयार असतील!

ज्येष्ठ नेते आणि कायदेतज्ज्ञ कपिल सिब्बल यांच्या काँग्रेस सोडण्यामध्ये फरक एवढाच आहे की, त्यांनी काँग्रेस सोडल्यानंतर भाजपमध्ये न जाता समाजवादी पक्षाचा पर्याय निवडला. त्या अर्थाने आपली भाजपविरोधातली मोहीम यापूर्वी सुरू होती तशीच पुढे सुरू राहील, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. वैचारिक भूमिका हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न असला, तरी त्यांनी अनेक दशकांपासून ज्या पक्षाद्वारे राजकारण केले आणि त्या पक्षाकडून अनेक महत्त्वाची पदे भूषवली त्या काँग्रेस पक्षाला त्यांनी सोडचिठ्ठी दिली. अलीकडच्या काळात गुजरातमधून हार्दिक पटेल, पंजाबमधून सुनील जाखड, अश्विनी कुमार, उत्तर प्रदेशात आरपीएन सिंह अशा प्रमुख नेत्यांनी काँग्रेसचा त्याग केला आहे. पैकी जाखड, अश्विनी कुमार आणि आरपीएन सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर हार्दिक पटेलही भाजपमध्ये जाण्याच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

काँग्रेस हा राष्ट्रीय पातळीवरील मोठा पक्ष आहे आणि सत्तेत नसला, तरी देशपातळीवर त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. अनेक वर्षे केंद्रात मंत्रिपदे भूषवलेले, राज्यांमध्ये मुख्यमंत्रिपदे भूषवलेले अशा दर्जाचे डझनावारी नेते पक्षात आहेत. त्यामुळे असा एखादा नेता गेल्यामुळे पक्षाला फरक पडत नाही, हे खरे असले, तरीसुद्धा सिब्बल यांच्यासारखा नेता पक्ष सोडून जातो, त्यामागची कारणे पक्षाला विचारात पाडणारी आहेत. कोणत्याही राजकीय पक्षासाठी एकेक कार्यकर्ता महत्त्वाचा असतो. त्यामुळे सिब्बल यांच्यासारख्या नेत्याचे महत्त्व पक्षनेतृत्वाला कळत नसेल तर काय? सिब्बल जे प्रश्न विचारत राहिले, ते पक्ष नेतृत्वाला अडचणीचे ठरू लागल्यामुळे नेतृत्वाने त्यांना दुर्लक्षित केले. त्यामुळेच या पक्षात लोकशाही उरली आहे कुठे, असा प्रश्न पडतो.

काँग्रेसची सत्ता असताना महत्त्वाची मंत्रिपदे सांभाळणार्‍या प्रमुख मंत्र्यांमध्ये त्यांचा समावेश होता. त्या अर्थाने ते काँग्रेसच्या सत्तेचे मोठ लाभार्थी होते. 2014 मध्ये काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर या लाभाची गंगाजळी आटली. त्यात लोकसभेतील पराभवामुळे त्यांचे राजकारण पक्षनेतृत्वाच्या मेहेरबानीवर अवलंबून होते. त्यातून येणार्‍या अस्वस्थतेमुळेच ते सतत पक्षनेतृत्वाविरुद्ध बोलत राहिले असावेत आणि त्यातून त्यांच्याबद्दलची नाराजी वाढत गेली असावी. काँग्रेसअंतर्गत जो 'जी-23' नावाचा गट स्थापन झाला आणि ज्या गटाने काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदी गांधी कुटुंबाव्यतिरिक्त अन्य व्यक्तीच्या नियुक्तीची मागणी केली, त्या गटाचे सिब्बल हेच म्होरके होते. या गटाच्या स्थापनेनंतर त्यासंदर्भाने प्रसारमाध्यमांतून काँग्रेस नेतृत्वाबद्दल, तसेच त्यांच्या कार्यशैलीबद्दल माध्यमांतून चर्चा होत राहिली.

सिब्बल यांनी पक्षाविरोधात प्रसारमाध्यमांमध्ये न बोलता पक्षाच्या व्यासपीठावर मतभेद व्यक्त करावेत, असे पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह अन्य ज्येष्ठ नेत्यांनी वारंवार बजावलेे; मात्र सिब्बल यांनी बंडखोर भूमिका कायम ठेवून पक्षनेतृत्वावरील टीका सुरू ठेवली. उदयपूरमध्ये 13 ते 15 मे या कालावधीत झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरासाठी निमंत्रण देऊनही सिब्बल उपस्थित राहिले नाहीत. शिबिर संपल्यानंतर दुसर्‍याच दिवशी त्यांनी राजीनामा दिला; परंतु त्यांच्या राजीनाम्याची बातमी दहा दिवसांनी बाहेर फुटली, जेव्हा ते समाजवादी पक्षाकडून राज्यसभेसाठी अर्ज दाखल करायला गेले.

उदयपूरचे शिबिर सुरू असतानाच सुनील जाखड यांनी राजीनामा दिला. याचा अर्थ उदयपूरच्या शिबिरादरम्यान दोन मोठ्या नेत्यांनी पक्षाचा त्याग केला. पक्षाच्या द़ृष्टीने ते बंडखोर म्हणजे पक्षशिस्त न पाळणारे नेते असले, तरी प्रत्यक्षात हे दोघेही प्रभावी नेते होते, हे नाकारून चालणार नाही. केवळ निवडणुकीतील जय-पराजयावर नेत्याचे मोठेपण ठरत नसते, तर इतर अनेक पातळ्यांवर पक्षाला त्यांचा कितपत उपयोग होतो, हेही महत्त्वाचे असते. त्या द़ृष्टिकोनातून विचार केला, तर कायद्याची लढाई अनेक पातळ्यांवर तीव्र बनली असताना, त्या आघाडीवरील एक महत्त्वाचा नेता पक्ष सोडून जाणे नुकसानकारक आहे.

सध्याच्या स्थितीत काँग्रेसकडून सिब्बल यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणे शक्य नव्हते. आयुष्यभर सत्ता उपभोगल्यानंतर पडत्या काळातील थोडीशी उपेक्षाही सहन होण्यापलीकडे काँग्रेसच्या नेत्यांचा अहंकार पोहोचला, असाही याचा एक अर्थ होतो. सिब्बल हे प्रातिनिधिक उदाहरण. 'जी-23'मध्ये उघड सहभागी नसलेले परंतु पूरक भूमिका असलेले आणखीही अनेक नेते आहेत. अशांची संख्या तीन डझनांपर्यंत जाऊ शकेल. हे सगळे केवळ सत्ता नसल्यामुळे नाराज आहेत, या भ्रमातून बाहेर पडून काँग्रेस नेतृत्वाने त्यांच्याशी संवाद वाढवला नाही, तर नजीकच्या काळात काँग्रेसमध्ये फक्त गांधी आणि वधेरा ही दोन कुटुंबेच राहतील!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT