Latest

औरंगाबाद : सिडको-हडकोचा पाणी प्रश्न पेटला; भाजप कार्यकर्ते रस्त्यावर, सत्ताधारी, प्रशासनाविरोधी घोषणाबाजी

मोनिका क्षीरसागर

औरंगाबाद, पुढारी वृतसेवा  : उन्हाळा सुरू होताच शहरातील पाण्याचा प्रश्न पुन्हा पेटला आहे. सिडको- हडको भागाला तब्बल आठ दिवसानंतर पाणी मिळत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. त्यामुळे भाजपने सिडको एन-५ येथील पाण्याच्या टाकीसमोर सोमवारी (दि.४) आंदोलन केले. यावेळी सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जोपर्यंत आयुक्त निवेदन स्विकारणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

शहराचा पाणी प्रश्न गेल्या काही दिवसांपासून गंभीर बनला आहे. शहरात दररोजच्या पाण्याची गरज २०५ एमएलडी असून, आज घडीला केवळ ११० एमएलडी पाणी मिळते. जुन्या दोन्ही पाणी पुरवठा योजना जीर्ण झाल्या आहेत. पाइपलाइन फुटणे, तांत्रिक बिघाड नित्याचे झाले आहे. त्यामुळे शहरात कांही भागात पाच दिवसांनी, तर काही भागात आठ दिवसांनी पाणी मिळत आहे. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढली आहे. त्यात नळाला अत्यल्प पाणी मिळत असल्याने नागरिक संतप्त आहेत.

भाजपने सर्वपक्षीय आंदोलनाचे आवाहन केले होते. मात्र फक्त भाजपचेच कार्यकर्ते सकाळी ९.३० वाजता. सिडको एन-५ येथील पाण्याच्या टाकीसमोर जमा झाले. ' पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, सिडको- हडकोला पाणी मिळालेच पाहिजे, यासह सरकार, प्रशासनाच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात आमदार अतुल सावे, माजी नगरसेवक शिवाजी दांडगे, महेश माळवदकर, राज वानखेडे, मनिषा मुंडे, बालाजी मुंडे, नितिन चित्ते यांच्यासह भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. मात्र आंदोलन करणाऱ्यांचे अद्याप समाधान झालेले नाही.

प्रशासकाच्या बंगल्यावर आंदोलनाचा इशारा

सकाळी साडे नऊ वाजल्यापासून आंदोलन सुरू होते. मात्र महापालिकेचा एकही अधिकारी आंदोलनाकडे फिरकला नाही. त्यामुळे आमदार अतुल सावे यांनी संताप व्यक्त केला. अधिकारी आले नाहीत तर प्रशासकाच्या बंगल्यावर जाऊन आंदोलन करू, असा इशारा सावे यांनी यावेळी दिला.

हेही वाचलत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT