Latest

उत्सवाचा सन्मान

backup backup

आधी न्यायालयाचे निर्बंध आणि नंतर दोन वर्षे कोरोना संक्रमण या पार्श्‍वभूमीवर यंदाचा दहीहंडी उत्सव प्रचंड उत्साहात साजरा झाला. दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याची घोषणा सरकारने केल्यामुळे यंदाच्या उत्सवाचा उत्साह द्विगुणीत झाला. समूहभावनेचा उत्तम आविष्कार म्हणून ओळखल्या जाणार्‍या दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याच्या निर्णयाचे स्वागत. ज्या ठाणे शहरात पारंपरिक दहीहंडी उत्सवाला कॉर्पोरेट इव्हेंटचे स्वरूप आले आणि उत्सवाच्या माध्यमातून अनेकजण आमदार-खासदार झाले, त्याच शहरातील लोकप्रतिनिधी असलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे त्यांनी दहीहंडी उत्सवासाठी जे-जे करणे शक्य ते सगळे केलेले दिसते. दहीहंडीला केवळ खेळाचा दर्जा देऊन ते थांबलेले नाहीत, तर सर्व सरकारी-निमसरकारी, नगरपालिकांच्या रुग्णालयांतून जखमी 'गोविंदां'वर मोफत उपचार, दहा लाखांचे विमा कवच याबरोबरच सरकारी नोकर्‍यांमध्ये खेळाडूंसाठी असलेल्या पाच टक्के आरक्षणामध्ये दहीहंडी खेळाडूंचा समावेश, अशा अनेक घोषणा केल्या.

महाराष्ट्राचा उत्सव म्हणून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखले जाणारे जे प्रमुख उत्सव आहेत, त्यामध्ये दहीहंडीचा समावेश होतो. दहीहंडीच्या उत्साही थरांची छायाचित्रे आणि चलतचित्रांचे जागतिक पातळीवर आकर्षण असते. मुंबईतला दहीहंडी उत्सव पहायला तर देशविदेशांतून पर्यटक येतात. सर्वसामान्य कुटुंबांतील मुले अनेक आठवडे दहीहंडीची तयारी करीत असतात आणि जास्तीत जास्त थर लावून हंडी फोडण्याचा सराव करीत असतात. मुळात श्रीकृष्ण जन्माष्टमीशी संबंधित असलेला हा दहीहंडीचा उत्सव सगळीकडेच उत्साहात, परंतु साधेपणाने साजरा केला जात होता. गेल्या काही वर्षांत त्याला इव्हेंटचे स्वरूप आले. मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील कलावंतांना दहीहंडीसाठी आणून गर्दी खेचली जात असल्याने त्यातूनच मोठमोठ्या बक्षिसांची आणि पर्यायाने उंचावरील दहीहंडीची स्पर्धा सुरू झाली. आयोजकांच्या ईर्ष्येमुळे अपघात होऊ लागले. उंचावरून पडून गोविंदांचे मृत्यू होऊ लागले, त्याचप्रमाणे अनेक गोविंदा जखमी आणि जायबंदी होऊ लागले.

नंतरच्या काळात अशा जखमींच्या आयुष्याची फरफट होत असल्याचे समोर आले. त्याविरोधात अनेकांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानेही याचे गांभीर्य ओळखून दहीहंडीच्या थरांवर निर्बंध घातले. काही राजकीय पक्षांनी त्यासंदर्भात ओरड केली; परंतु न्यायालयाने घेतलेला निर्णय गोविंदांच्या सुरक्षिततेशी निगडित होता. राजकीय नेत्यांना दहीहंडीचे आयोजन करून गर्दी जमवणे आणि त्याआधारे राजकारण साधणे एवढ्यापुरताच हेतू होता. जखमी होणार्‍या किंवा दुर्दैवाने मृत्यू होणार्‍या गोविंदांच्या कुटुंबीयांवर जो प्रसंग गुदरतो त्याच्याशी त्यांना काही देणेघेणे असण्याचे कारण नव्हते. त्याला आता सरकारी धोरणात्मक संरक्षण मिळाले. मात्र, राजकीय पातळीवरील या बेजबाबदारपणामुळेच दहीहंडीसंदर्भातील सरकारच्या निर्णयाचे फारसे उत्साहात स्वागत होताना दिसत नाही.

दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा द्यावा, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून दहीहंडी पथके आणि गोविंदांकडून करण्यात येत होती. यापूर्वी 12 ऑगस्ट 2015 रोजी तत्कालीन क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी या खेळाला साहसी खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला होता. विधानसभेत या निर्णयाला विरोध झाला होता. कारण, खेळाचा दर्जा देण्यासाठीची आवश्यक ती पूर्तता झाली नव्हती. खेळाला मान्यता देताना त्याला नियमाच्या चौकटीत बसवणे, त्यासाठीच्या अटी तयार करणे आवश्यक असते. यासंदर्भात अहवालही सादर करण्यास सांगण्यात आले होते; परंतु नंतरच्या काळात दहीहंडी उत्सव न्यायालयाच्या निर्बंधांच्या कचाट्यात सापडला. कोरोनाकाळात तर उत्सव झालाच नाही. दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवरून गेले आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार आले. सणांच्या तोंडावर सरकार सत्तेवर आले. त्यांनी जे निर्णय घेतले, त्यामध्ये सणांवरील निर्बंध उठवण्याच्या निर्णयांचा उल्लेख करावा लागेल. त्यातूनच मग दहीहंडी उत्सवाला खेळाचा दर्जा देण्याबरोबरच अनेक सवलतींचा वर्षाव करण्यात आला.

भाजप-शिवसेना युतीच्या सात वर्षांपूर्वीच्या निर्णयाच्या अनुषंगानेच आता शासकीय आदेश काढून दहीहंडी उत्सवाला साहसी खेळाच्या चौकटीत बसवण्यात आले. दहीहंडी हा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा उत्सव म्हणूनच ओळखला जातोे. मनोरे उभारायचे आणि हिमतीने हंडी फोडून दहीकाला खायचा यातच सगळ्यांचा आनंद सामावला होता. मातीच्या हंडीच्या खापराचा तुकडा मिळाला तर तो धान्याच्या कणगीत ठेवला जायचा, त्यामुळे बरकत येते अशी भाबडी समजूत; परंतु काळ बदलला तसे या उत्सवाचे स्वरूप बदलले. त्याचे बाजारीकरण झाले. आधीपासून तो लोकोत्सव होताच; परंतु त्याला कॉर्पोरेट चकाकी आणि सेलिब्रिटींमुळे झळाळी आली. तोच प्रवास दहीहंडीला खेळाच्या दर्जापर्यंत घेऊन आला. स्पेन, चीन आदी देशांमध्ये पिरॅमिड प्रकाराचा खेळात समावेश आहे, त्याचाच आधार दहीहंडीसाठी घेण्यात आला. सरकारने दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिल्यामुळे मानवी मनोर्‍यांचा हा रोमहर्षक खेळ वर्षभर खेळता येणार आहे.

आता या खेळाचीही संघटना निर्माण होईल, नियम, अटी आणि शर्ती तयार होतील. प्रो-गोविंदा लीगची घोषणा करून सरकारने दहीहंडीला अधिक व्यापक स्तरावर नेण्याचा प्रयत्न केला आहे. एका मराठी उत्सवाचा हा सन्मान सगळ्यांनाच भावणारा असला तरीसुद्धा त्यातील जोखमीचा भाग कसा कमी करणार हा खरा प्रश्‍न आहे. गोविंदांना खेळासाठी प्राणास मुकावे लागणार नाही, याची पुरेपूर दक्षता घ्यावी लागेल. केवळ मोफत उपचार आणि विमा कवच एवढे करून सरकारची जबाबदारी संपणार नाही. जास्तीत जास्त उंच मनोर्‍यांचा थरार रोमहर्षक असला तरी त्यातील थरांची ईर्ष्या गोविंदांच्या जिवावर बेतल्याचे अलीकडे अनेकदा आढळून आले आहे. या खेळातील जोखीम कमी होईल आणि गोविंदांसाठीचा धोका शून्यावर येईल, तेव्हाच खर्‍या अर्थाने सगळे घटक या खेळाचा मनसोक्‍त आनंद घेऊ शकतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT