Latest

आयपीएल मिनी लिलावात अजिंक्य, विलियम्सन अनसोल्ड राहण्याची शक्यता

Arun Patil

बंगळूर, वृत्तसंस्था : आयपीएल 2023 च्या हंगामाची बीसीसीआयपासून संघ मालकांपर्यंत सर्वजण जोरदार तयारी करत आहेत. या हंगामापूर्वी 23 डिसेंबरला एक मिनी लिलाव होणार आहे. या लिलावासाठी जगभरातून 991 खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत. यातील 714 नावे ही भारतीय खेळाडूंची आहेत. तर 277 विदेशी खेळाडूंची नावे आहेत. संघ यामधील नावे शॉर्टलिस्ट करतील आणि त्यांच्यावर बोली लावतील. हा मिनी लिलाव असल्याने काही तासांतच तो संपण्याची शक्यता आहे. दरम्यान, या लिलावात आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही खेळाडूंवर जास्त लक्ष असणार आहे. यातील काही खेळाडूंना छप्पर फाडके बोली लागेल तर काही अनसोल्ड राहतील. जे या लिलावात अनसोल्ड राहण्याची, म्हणजे ज्यांना कोणताच संघ विकत घेण्याची शक्यता नाही अशा खेळाडूंविषयी..

अजिंक्य रहाणे

भारतीय कसोटी संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे या आयपीएल लिलावात अनसोल्ड राहण्याची शक्यता आहे. गेल्या तीन हंगामात त्याने 18 सामन्यांत मिळून 254 धावाच केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट देखील 104 इतकाच आहे. गेल्या हंगामात त्याला बेस प्राईसला खरेदी करण्यात आले होते.

केन विलियम्सन

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन गेल्या हंगामात सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार होता. मात्र त्याची टी-20 क्रिकेट प्रकारात फारशी चांगली कामगिरी होत नाही. 2022 च्या हंगामात त्याने 93 च्या स्ट्राईक रेटने 216 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून देखील टी-20 मध्ये त्याची कामगिरी उल्लेखनीय झालेली नाही.

मोहम्मद नबी

अफगाणिस्तानचा कर्णधार अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी हा टी-20 क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. मात्र, आयपीएलमध्ये त्याला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याने 17 सामन्यांत 13 विकेटस् आणि 180 धावा केल्या आहेत. केकेआर संघात असलेल्या नबीला गेल्या हंगामात एकाही सामन्यात संधी देण्यात आली नव्हती.

डेव्हिड मलान

डेव्हिड मलान हे आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. मात्र, आयपीएलमध्ये त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 14 अर्धशतके आणि एक शतक ठोकले आहे. वन-डेतही त्याचे रेकॉर्ड दमदार आहे. असे असले तरी त्याला आयपीएलमध्ये एखादा खरेदीदार मिळेल असे वाटत नाही.

जेसन रॉय

इंग्लंडचा स्फोटक सलामीवीर जेसन रॉय गेल्या काही काळापासून चांगल्या फॉर्ममध्ये नाही. त्याला इंग्लंड टी -20 संघातून देखील बाहेर करण्यात आले आहे. इंग्लंडच्या टी-20 वर्ल्डकप विजेत्या संघात देखील तो नव्हता. त्यामुळे तो आयपीएलच्या 2023 च्या लिलावात देखील अनसोल्ड राहण्याची दाट शक्यता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT