Latest

अनुभव : मृत्यूनंतर देवा-धर्माला काहीच अर्थ उरत मनाही, हेच खरं!

backup backup

एखाद्या रुग्णालात डाॅक्टरांना वेगवेगळे अनुभव येत असतात. त्यातून बऱ्याच घटना त्यांच्यासमोर घडत असतात. असाच विचार करायला लावणारा डाॅ. प्रकाश कोयडे यांचा स्वानुभविक लेख जरूर वाचा…

तीन दिवसांपूर्वी 'आयसीयू'मध्ये राऊण्ड घेत असताना अगदी दोन बोटांत धरता येणारे, तळहातापेक्षाही लहान आकाराचे हे 'बायबल' एका सफाई कर्मचाऱ्याने माझ्या हाती दिले. मी डोळ्यानेच खुणावलं‌.

"किती नंबर?"

"बारा नंबर!"

बारा नंबर बेडची साफसफाई, सॅनिटायझेशन सुरू होतं. नुकतीच बॉडी पॅक करून स्ट्रेचरवर ठेवली होती. पुढील रुग्णासाठी बेड तयार करत असताना, मामाला बेडच्या खाली हे अगदी छोट्या आकाराचे 'बायबल-नवा करार' हे पुस्तक सापडले. हे असं काही हाती लागायची पहिलीच वेळ नाही. आतापर्यंत भरपूर वेळा अशी छोटीछोटी धार्मिक पुस्तकं रुग्णाच्या उशाशी सापडली आहेत. ही पोस्ट वाचत असलेल्या बऱ्याच डॉक्टरांनाही हा अनुभव आला असेलच.

कधी बायबल, कधी गीता, कधी कृष्णचरित्र, कधी कुठल्यातरी दर्ग्याचं माहात्म्य किंवा बाबाचं चरित्र… जवळपास सगळ्याच धर्माचं बरंच काहीबाही सापडत असतं. कधी कधी एखाद्या देवाचा फोटो रुग्णाच्या उशाशी ठेवलेला असतो. रुग्णाची परिस्थिती फारच गंभीर असेल, अगदी शेवटचा प्रवास सुरू असेल, तर नक्कीच काही ना काही ठेवलंच जातं. काही लोक कुठूनतरी उतरवून आणलेले लिंबू हळूच बेडखाली ठेवून देतात, तावीज उशाला ठेवतात, डॉक्टरांची नजर चुकवून मुठीत छोट्या पुडीत लपवून आणलेला अंगारा, बुक्का लावतात. हळूच नजर उतरवात पण… आम्हाला सगळं दिसतं!

आम्हाला सगळं माहीत असतं. दररोज स्पंजिंग करताना स्टाफला या गोष्टी दिसतात. पण, साधारणपणे दुर्लक्ष केलं जातं. त्या गोष्टींचा रुग्णाच्या आजारावर किंवा उपचारावर काही फरक पडत नसेल तर, त्याकडे फार लक्ष दिलं जात नाही.प्रत्येकाची कशावर तरी श्रद्धा असतेच. कुठंतरी विश्वास असतोच.

आपला रुग्ण आयसीयुमध्ये अत्यवस्थ अवस्थेत असताना आपण काहीच करू शकत नाही आणि यातून प्रचंड हतबलता आलेली असते. केवळ पैसा आणि लागेल त्या वस्तू पुरवणं, यापलिकडे काहीच करता येत नाही. अशावेळी कुठेतरी आशेचा किरण म्हणून या गोष्टी घडत जातात. कितीतरी वेळा त्या रुग्णाला माहितही नसतं की, आपल्या उशाशी आपला धर्मग्रंथ किंवा भारलेलं लिंबू किंवा तावीज ठेवला आहे. ही त्या नातेवाईकांची श्रद्धा असते.

बेशुद्धावस्थेत किंवा कोमात असलेल्या रुग्णाच्या कपाळावर नातेवाईकांकडून अंगारा लावताना वाटते की हे अर्थहीन आहे. पण, त्यांना थांबवू वाटत नाही. एकदा एक स्त्री अगदीच हळू आवाजात बेशुद्ध पेशंटच्या बाजूला उभे राहून हात जोडून काहीतरी पुटपुटत होती. 'आराधी गीत' असावं ते‌. तिला थांबवणं किंवा बाहेर जायला लावणं मला तरी ठीक वाटलं नाही. आपापल्या श्रद्धा असतात.

आपण जरी या गोष्टी मानत नसू तरी ते आपल्यापुरतंच ठेवलं जातं. डॉक्टर आस्तिक असो की नास्तिक नातेवाईकांच्या श्रद्धेला कोणी नाकारत नाही. असे बरेच जण बघायला मिळतात ज्यांनी आयुष्यात देवा-धर्माचं नाव कधी उच्चारलंही नाही. ते अशा बिकट परिस्थितीत प्रचंड धार्मिक बनतात. नवस सायास करतात. वाटेल ते करायला तयार होतात. असे अनुभव आम्हाला लोकांना येतच असतात.

एखाद वेळी असंही होतं की, एखादा माणूस मरतो किंवा डिस्चार्ज होतो. पण, त्याचं धार्मिक पुस्तक तसंच चुकून बेडखाली राहून जातं आणि तिथे दुसऱ्याच कोणत्यातरी धर्माचा रुग्ण झोपवला जातो. तो रुग्ण नेमकं कोणत्या देवाच्या कृपेने वाचला किंवा मेला आता ते त्या देवालाच ठाऊक! सगळ्याच धर्माचे मार्ग शेवटी एकाच ठिकाणी येऊन पोचतात हे याचं एक उत्तम उदाहरण!

तर अनुभव असा की, जोपर्यंत माणूस जिवंत तोपर्यंत नातेवाईकांच्या श्रद्धेचा विचार केला जातो. पेशंट एकदा का मृत्यू पावला की, त्यानंतर जे काही हाती लागेल… हे धर्मग्रंथ, लिंबू, तावीज वगैरे साधन सामुग्री शेवटी कचऱ्याच्या डब्यात फेकून दिली जाते. विशेष म्हणजे नातेवाईकसुद्धा हे विसरून जातात की, आपण काहीतरी इथं ठेवलं होतं. त्यामुळे मृत्यूनंतर देवा-धर्माला काहीही अर्थ उरत नाही, हेच खरं!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT