Latest

विजयस्तंभ अभिवादन सोहळा आज ; प्रशासकीय यंत्रणा सज्ज

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक अनुयायी येण्याचा अंदाज असून, त्यादृष्टीने तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्यासह विविध विभागांच्या प्रमुखांनी कार्यक्रमस्थळाची पाहणी केली. तसेच कोरोना पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करा, तसेच येणार्‍या सर्व अनुयायांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 1 जानेवारी रोजी सकाळी मान्यवरांकडून अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर समता सैनिक दल, महार बटालीयन सेवानिवृत्त सैनिक, आर्मी सलामी व मानवंदना कार्यक्रम होणार आहे. सकाळी 8 नंतर येणार्‍या सर्व अनुयायांसाठी अभिवादनाकरिता खुले असणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विस्डम बुकफेअर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने पुस्तक विक्री केंद्र उभारण्यात आले आहे. सवलतीच्या दरात पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या बुकफेअरचे उद्घाटन सोमवारी सकाळी 9.30 वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. बुक फेअरमध्ये 246 बुक स्टॉल असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'प्रॉब्लेम ऑफ रुपी' ग्रंथाला शंभर वर्षे होत असल्याने हा ग्रंथ व त्यातील विचार जास्तीत जास्त अनुयायांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.

स्वच्छतेसाठी काळजी
परिसरातील विविध ठिकाणी एकूण 2 हजार 200 तात्पुरत्या शौचालयांची उभारणी करण्यात आलेली आहे. वापराच्या पाण्यासाठी 40 टँकर आणि स्वच्छतेसाठी 40 सक्शनमशिन व 15 जेटिंग मशिन ठेवण्यात आले आहेत. रस्त्यावर कचरा साचू नये, याकरिता 500 कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. स्वच्छतेसाठी 200 सफाई कामागार नियुक्त करण्यात आले आहेत. कचरा उचलण्याकरिता 80 घंटागाड्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

100 खाटा आरक्षित
यंदा अधिकचे अनुयायी येण्याची शक्यता लक्षात घेऊन सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. 29 ठिकाणी आरोग्य कक्ष उभारण्यात आले असून, 20 फिरते दुचाकी आरोग्य पथक, 50 रुग्णवाहिका, 90 तज्ज्ञ डॉक्टर आणि 200 आरोग्य कर्मचारी नियुक्त केले आहेत. तर खासगी रुग्णालयात 100 खाटा आरक्षित करण्यात आल्या आहेत.

हिरकणी कक्षाची व्यवस्था
स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, याकरिता दीडशे पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. मानवंदना देण्यासाठी येणार्‍या माता-भगिनींची काळजी घेण्यात आली असून, एकूण पाच हिरकणी कक्ष उभारण्यात येत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT