Latest

ट्रकचालकाची मुलगी बनली अधिकारी, ‘MPSC’तून मिळविलं उपविभागीय जलसंधारण अधिकारी पद

दीपक दि. भांदिगरे

जालना; पुढारी वृत्तसेवा : मनाचा ठाम निश्चय, जिद्द आणि चिकाटी ठेवली तर कुठलीही गोष्ट शक्य होऊ शकते. हिस्वन खुर्द येथील सामान्य कुटुंबात जन्मलेल्या प्रियंका कपूरचंद राजपूत या तरुणीने हे सिद्ध करून दाखवून दिले. एका ट्रकचालकांची मुलगी ते उपविभागीय जलसंधारण अधिकारी अशी मजल मारून कुटुंबियांचेच नव्हे तर हिस्वन खुर्दचे नावदेखील तिने उंचावले.
शासकीय अधिकारी व्हायचे, असे ध्येय मनाशी बाळगून प्रियंका राजपूत हिने तिच्या आयुष्याची सुरुवात केली. तिचे प्राथमिक शिक्षण सिध्देश्‍वर (सिल्लोड) शाळेत तर माध्यमिक शिक्षण हिस्वन खुर्द येथे झाले आहे. औरंगाबाद येथे तिने स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी संपादन केली केली आहे.

साखर कारखान्यावर उसाची वाहतूक करणार्‍या ट्रकवर चालक असणार्‍या आपल्या बापाला कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी खाव्या लागणार्‍या खस्ता पाहून लहानपणी व्यथित झालेल्या लहानग्या लेकीने लहानपणीच आपली परिस्थिती बदलण्याचा चंग बांधला होता. बालपणी पाहिलेले स्वप्न अखेर खडतर प्रयत्नांनंतर अखेर पूर्णत्वास गेले आहे.

राज्य लोकसेवा आयोगाने नुकत्याच जाहीर केलेल्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेत हिस्वन खुर्द (ता. जि. जालना) येथील प्रियंका कपूरचंद राजपूत हिची उपविभागीय जलसंधारण अधिकारी वर्ग-1 या पदावर निवड झाली आहे. या निवडीबद्दल ग्रामस्थाच्या वतीने गावात मिरवणूक काढून तिचे स्वागत करण्यात आले. माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी प्रियंकाच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या.

घरात अठरा विश्व दारिद्र्य, कमावणारे दोन हात आणि खाणारे दहा. कुटुंबाचा गाडा चालविताना आई वडिलांना करावी लागणारी कसरत, कुठल्याही परिस्थितीत यश मिळवायचे हा चंग बांधून पाच वर्षांपूर्वी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली. खूप मेहनत घेऊन देखील दोन वेळा यशाने हुलकावणी दिली. परीक्षेतील अपयशाने जेवढे व्यथित होत होते, त्या पेक्षा कितीतरी अधिक लोकांच्या टोमण्याने व्हायचे. अपयशाला घाबरून न जाता पुन्हा नव्या जोमाने तयारी लागत, यश मिळेल असा धीर वेळोवेळी माझ्या आई वडिलांनी दिला. कुटुंबातून मिळणारे पाठबळ याबाबतीत खूप महत्त्वाचे आहे. माझे कुटुंब माझ्या पाठीशी नसते तर कदाचित हे यश मी मिळवू शकले नसते, हे सांगतांना प्रियंकाला आपला हुंदका आवरता आला नाही.

प्रयत्नांमधील सातत्य आपल्याला यशापर्यंत पोहोचवते. ध्येय निश्चितीनंतर ध्येयप्राप्तीसाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न आणि या प्रयत्नांमधील सातत्य आपल्याला यशापर्यंत पोहोचवते. सध्याच्या परिस्थितीचा बाऊ न करता ही परिस्थिती मला बदलायची आहे, असा ठराव केला की आपला प्रवास यशाच्या दिशेने सुरू होतो.

-प्रियंका राजपूत, नवनिर्वाचित अधिकारी

पहा व्हिडिओ : कोल्हापूरच्या शाहू मिलमध्ये चित्र-शिल्पातून दिला जातोय शाहू विचारांना उजाळा | शाहू कृतज्ञता पर्व

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT