पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर त्यांच्या शरीरात मिळालेल्या गोळ्या व घटनास्थळी सापडलेल्या रिकाम्या पुंगळ्या बॅलेस्टिक एक्सपर्टला दाखवून याचे शस्त्र कसे असेल, याबाबत विचारणा केली का? 7.6 एमएमच्या गोळ्या कोणत्या शस्त्रातून फायर होतात? शरीरातील गोळ्यांचा प्रवास कसा झाला, त्यानुसार त्या गोळ्या किती अंतरावरून मारल्या असतील, हे बॅलेस्टिक एक्सपर्टला विचारले का? अशा प्रश्नांची सरबत्ती बचाव पक्षाच्या वतीने सीबीआयचे तत्कालीन तपासी अधिकारी एस. आर. सिंग यांच्यावर मंगळवारी उलटतपासणीदरम्यान करण्यात आली. त्यावर 'नाही' असे सांगत डॉ. दाभोलकर तसेच कुटुंबीयांकडून जिवाला धोका असल्याबाबत तक्रार नोंदविली नसल्याची माहिती सिंग यांनी दिली.
या प्रकरणात डॉ. वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर आरोप निश्चिती करण्यात आली आहे. डॉ. दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणातील, सीबीआयचे तत्कालीन तपासी अधिकारी एस. आर. सिंग यांची विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात बचाव पक्षाच्या वतीने अॅड. प्रकाश साळशिंगीकर यांनी उलटतपासणी घेतली. उलटतपासणीदरम्यान, अॅड. साळशिंगीकर यांनी डॉ. दाभोलकर यांची नरेंद्र महाराज व त्यांच्या अनुयायांसोबत वैमनस्य होते का, अशी विचारणा केली.
त्यावर सिंग यांनी हो असे उत्तर दिले. ज्या वेळी खून झाला त्या वेळी घटनास्थळाजवळ नरेंद्र महाराजांचे कोणी अनुयायी होते का, याबाबत तपास केला का, या प्रश्नावर सिंग यांनी नाही, असे सांगितले. त्यांचे, एका महिलेबरोबर न्यायालयात वाद सुरू होते. याखेरीज, जुलै 2013 मध्ये बोगस डॉक्टरांविरोधात त्यांनी आंदोलन छेडले होते. तसेच, अंधश्रध्दा निर्मूलन समितीतील गैरव्यवहारातून त्यांचा खून झाल्याच्या शक्यतेने तपास केला का? आदी प्रश्नावर सिंग यांनी नाही, असे सांगितले. याप्रकरणाची पुढील सुनावणी बुधवारी (दि. 23) होणार आहे.
हेही वाचा :