Latest

MGNREGA wages | कामगारांसाठी आनंदाची बातमी! मनरेगा मजुरी दरात १० टक्क्यांपर्यंत वाढ, जाणून घ्या महाराष्ट्रात किती वाढ?

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA), २००५ अंतर्गत आर्थिक वर्ष २०२४-२०२५ साठी अकुशल कामगारांसाठी नवीन मजुरी दर जाहीर केले आहेत. कामगारांच्या मजुरी दरात राज्यनिहाय ३ ते १० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. नवीन मजुरी दर १ एप्रिल २०२४ पासून लागू होतील. (MGNREGA wages) याबाबतची अधिसूचना ग्रामीण विकास मंत्रालयाने जारी केली आहे.

मनरेगा अंतर्गत महाराष्ट्रातील मजुरी दर प्रतिदिन २७३ रुपयांवरून २९७ रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. ही वाढ २०२३-२४ च्या तुलनेत २०२४-२५ मधील वाढ ८.८ टक्क्यांची आहे.

गोव्यात सध्याच्या मजुरीच्या दरापेक्षा सर्वाधिक १०.५६ टक्क्यांची कमाल वाढ करण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी ३.०४ टक्क्यांची सर्वात कमी वाढ केली आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्राने हा निर्णय घेतला आहे.

चालू वर्षात (आर्थिक वर्ष २०२३-२०२४) राज्यनिहाय वाढीचा विचार करता, गोव्यात १०.५६ टक्क्यांची म्हणजे ३४ रुपयांची कमाल वाढ करण्यात आली आहे. गोव्यात आता आर्थिक वर्ष २०२४-२०२५ साठी प्रतिदिन मजुरी दर ३५६ रुपये असेल. येथे सध्या प्रतिदिन मजुरी दर ३२२ रुपये आहे.

आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या तीन राज्यांमध्येही मनरेगाच्या मजुरी दरात सुमारे १० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. कर्नाटकमध्ये नवीन मजुरी दर प्रतिदिन ३४९ रुपये असेल. जो सध्याच्या ३१६ रुपये दरापेक्षा १०.४४ टक्क्यांनी अधिक आहे.

एकूणच, मजुरीमध्ये सुमारे ७ टक्क्यांची सरासरी वाढ करण्यात आली आहे. सध्याच्या देशातील सरासरी मजुरी दर प्रतिदिन २६७.३२ रुपयांवरून २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी २८५.४७ रुपये असेल. (MGNREGA wages)

लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात आदर्श आचारसंहिता लागू असल्याने मजुरी दर अधिसूचित करण्यासाठी ग्रामीण विकास मंत्रालयाने निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती. याबाबत मंजुरी मिळाल्यानंतर हे दर अधिसूचित करण्यात आल्याचे सुत्रांनी म्हटले आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT