Latest

खडकवासला : कुत्र्यांचा महिन्याभरात पाचशे जणांना चावा

अमृता चौगुले

खडकवासला, पुढारी वृत्तसेवा: खडकवासला, उत्तमनगरसह किरकटवाडी, धायरी, नांदेड परिसरात मोकाट कुत्र्यांच्या दहशतीने नागरिक भयभीत झाले आहेत. गेल्या महिनाभरात अंगणात खेळणार्‍या लहान मुलांसह महिला, ज्येष्ठ नागरिकांसह पाचशेहून अधिक जण कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. चाव घेतलेल्यांपैकी तीनशे रुग्णांवर एकट्या खडकवासला आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहेत.त्यामुळे परिसरात रुग्णालयात कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या रुग्णांना देण्यात येणार्‍या एआरबी लसीची मागणी वाढली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने खडकवासला आरोग्य केंद्रात लसीचा जादा पुरवठा केला आहे. नव्याने पालिकेत समावेश करण्यात आलेल्या या परिसरात पालिकेच्या जुन्या हद्दीतील मोकाट कुत्री सोडण्यात येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

खडकवासला येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वीस ते पंचवीस जणांवर उपचार करण्यात येत आहेत. इतर आजारांपेक्षा कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रात 24 तास सेवा सज्ज केली आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. वंदना गवळी, डॉ. शब्दा शिरपूरकरसह डॉक्टर, कर्मचार्‍यांवर अशा रुग्णांचा ताण वाढला आहे. खडकवासला आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वंदना गवळी म्हणाल्या, 'कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वीसहुन अधिक रुग्ण दररोज उपचारासाठी येत आहेत. यातील सहा ते सात रुग्ण नवीन असतात. रुग्णांना मोफत लस देण्यात येत आहे. कुत्र्याने चावा घेतलेल्या रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये, यासाठी वेळोवेळी लस देण्यात येत आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने लसीचा पुरेसा साठा केला आहे. गेल्या महिनाभरात तीनशेहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले. खडकवासला केंद्राशिवाय शिवणे, सिंहगड रोड, पुणे भागातील खासगी तसेच इतर सरकारी रुग्णालयात कुत्र्यांनी चावा घेतलेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.'

पादचारी, दुचाकीस्वार जखमी

खडकवासला धरणाखालील रस्ता, कोल्हेवाडी, किरकटवाडी, जेपीनगर, खडकवासला बाह्यवळण रस्ता, कोंढवे धावडे, कोपरे, शिवणे आदी ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट सुरू आहे. मुख्य तसेच आडबाजूच्या रस्त्यावर दबा धरून बसलेले कुत्र्यांचे कळप रात्री दुचाकीचालकांवर तसेच पादचार्‍यांवर हल्ला करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT